कुठल्याही डेंटल क्लिनिकमध्ये जाऊन आपण निरीक्षण केले तर सर्वात जास्त कानावर पडणारा शब्द असतो, ‘रूट कॅनॉल ट्रीटमेंट’ ज्याला संक्षिप्तरूपात आरसीटी (RCT) असेही म्हणतात. खरे तर आरसीटी हाच सर्वात जास्त प्रचलित शब्द आहे. काही दिवसांतच आरसीटी हे सर्वसामान्य सर्वनाम झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. आज आपण कुणाला विचारले ओकेचा फूलफॉर्म काय तर मला वाटतं बऱ्याच जणांना सांगता येणार नाही. अर्थात ही ओळ वाचल्यानंतर जे जिज्ञासू स्वभावाचे असतील त्यांनी आतापर्यंत गुगल करून शोधलंही असेल किंवा नवीन तरुणांनी ज्यांना मराठीही वाचता येतं व चॅट जीपीटीही वापरतात त्यांनी आतापर्यंत चॅट जीपीटीला कमांडही दिली असणार…
मुद्दा असा की, आपली आरसीटी करून घेण्यासाठीच बहुतांश रुग्ण डेंटिस्टकडे येतात. आमच्याकडे येणाऱ्यातले ७० ते ८०% पेशंट्स हे आरसीटी किंवा एक्सट्रॅक्शनसाठी आलेले असतात. आता हे एक्सट्रॅक्शन का ? अनेकदा आपल्याकडे रुग्णांना प्रश्नच पडत नाहीत किंवा फारच कमी जणांना प्रश्न पडतात. काहींना प्रश्न पडतात पण ते विचारायला घाबरतात, तर एकूणच आपल्या संस्कृतीत प्रश्न टाळले जातात आणि नंतर ते बहुतेकांच्या अंगवळणी पडते. पण प्रश्न पडले पाहिजेत, चर्चाही व्हायला हवी. आणि आरोग्याच्या क्षेत्रात तर हे आवर्जून व्हायला हवे.
हेही वाचा… Health Special: Algophobia टाळता येतो का?
तर आरसीटी किंवा एक्सट्रॅक्शन याला आपण मराठीत दात काढणे किंवा दंतभरण उपचार असे म्हणू शकतो. कुठलीही गोष्ट गळ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत हालचाल करायची नाही “ठेवले अनंत तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान” हे तुकोबारायाचे विपश्यनेचे / ध्यान धारणेचे विचार आपण केवळ सोयीनेच घेतो. त्याच अनुषंगाने जोपर्यंत दातातून तीव्र कळा यायला सुरुवात होत नाही, तोपर्यंत आपण डेंटिस्टकडे चुकनही जात नाही. माझ्या बऱ्याच मुलाखतींमध्ये किंवा दंतोपचार या विषयांवरील चर्चासत्र किंवा भाषणांमध्ये मी नेहमी आवर्जून हा मुद्दा सांगतो की, आपण वर्षातून किमान दोन वेळा दांतांच्या डॉक्टरांना भेटले पाहिजे, तुम्हाला कदाचित दातांचा काही त्रास होत नसेल. तरीही तुम्ही दातांच्या डॉक्टरांकडे गेले पाहिजे, यात तुमचाच फायदा आहे.
हेही वाचा… Health Special: पावसाळ्यात पाणी किती, कोणते व कसे प्यावे?
आयडीए या आमच्या असोसिशनने तर असे सुचितच केले आहे की, किमान दोन वेळा तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन आपले दात स्वच्छ केले पाहिजेत, जेणेकरून तुमच्या हिरड्या सुरक्षित राहतील, त्यातून रक्त येणार नाही, तोंडाला वास येणार नाही. हे फायदे तर आहेतच परंतु सर्वात मोठा फायदा म्हणजे जेव्हा तुम्ही दात स्वच्छ करायला जाता तेव्हा डॉक्टर तुमच्या दातांची तपासणी अशीही करतातच व जेव्हा तपासणी करतांना त्यांच्या लक्षात एखादा दुसरा दात थोडाफार जरी कीड लागलेला दिसला तर लगेच तुमच्या लक्षात आणून देतात. अशा दातांना किडीच्या प्राथमिक अवस्थेतच आपण ट्रीटमेंट सुरू केली तर आपल्या पैशाचीही बचत होते. आपल्याला डेंटिस्टकडे आरसीटी सारख्या ट्रीटमेंटला जिथे जास्त वेळा भेट द्यावी लागते, त्यासाठी घालाव्या लागणाऱ्या खेपा वाचतात. शिवाय कीड प्राथमिक अवस्थेत असतांना तुम्हाला भुल येण्यासाठीचे इंजेक्शन द्यावे लागत नाही. दातांचे इंजेक्शन घेणे हे खूप पेशंटना भितीदायक वाटते. हल्ली चांगल्या प्रतिचे इंजेक्शन वापरता येते की त्यामुळे तुम्हाला फार कमी वेदना होतात. परंतु भीती ही गोष्टच अशी आहे की, ज्यावर अजून इंजेक्शन वा उपाय उपलब्ध नाही.
हेही वाचा… Health Special: पचनक्रियेत पेप्सिनला एवढे महत्त्व कशासाठी?
मी तर बऱ्याचदा विनोदाने माझ्या रुग्णांना म्हणतो की, तुम्हांला दात काढताना किंवा आरसीटी सारखी ट्रीटमेंट घेताना कुठलाही त्रास होणार नाही, याची खात्री मी देतो. त्याचा उपाय माझ्याकडे आहे परंतु तुम्हाला जी दातांच्या ट्रीटमेंटची भिती वाटते त्याचा उपाय किंवा इंजेक्शन अजून उपलब्ध झाले नाही. तेव्हा कृपया घाबरू नका, मी खात्री देतो तुम्हाला उपचार करतांना कसलीही वेदना / त्रास जाणवणार नाही. आपण वर्षातून दोन वेळा डॉक्टरांकडे जाण्याच्या संदर्भात इथे वरती चर्चा केली, तिथेच हेही सांगणे फार महत्वाचे असेल की इतर शारीरिक आजारांची जोपर्यंत लक्षणे आपल्या शरीरावर दिसत नाहीत तोपर्यंत आपण डॉक्टरांकडे जात नाही. थंडी , ताप, खोकला इत्यादी त्रासानंतरच आपण डॉक्टरांकडे जातो. परंतु डेंटिस्टकडे दात स्वच्छ करायला वर्षातून दोनदा गेल्याने तुम्हाला भविष्यात होणाऱ्या दातांच्या आजाराचे निदान अगदी प्राथमिक अवस्थेतच होते, हे विसरू नका. तुम्ही त्यावर आजार गंभीर किंवा अधिक खर्चिक होण्याअगोदरच इलाज करू शकता. ही फार मोठी देणगी किंवा संधी तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता. फक्त त्यासाठी वर्षातून दोन वेळा आपल्या दातांच्या डॉक्टरांकडे तुम्ही गेलेच पाहिजे.