Benefits Of Apple Cider Vinegar: सोशल मीडियावरील ट्रेंड्समुळे का होईना अत्यंत गुणकारी असे ऍपल सायडर व्हिनेगर (ACV) मागील काही वर्षांमध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. दीर्घकालीन आजारांवर या पेयाचा उत्तम प्रभाव असल्याचे सुद्धा काही निरीक्षणांमधून समोर आले आहे. पण म्हणतात ना एखादी चांगली- वाईट गोष्ट घडली की तिला जोडून नानाविध अफवा वाऱ्यासारख्या पसरत जातात. हे एसीव्ही म्हणजेच ऍपल सायडर व्हिनेगर वजन कमी करण्यासाठी मदत करू शकते का? याविषयीच्या चर्चा चालू असताना नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ, डॉ. प्रियंका रोहतगी, यांनी इंडियन एक्सस्प्रेसच्या लेखात याविषयी माहिती दिली आहे.
ऍपल सायडर व्हिनेगर व वजनाचा संबंध काय, अभ्यासात दिसले की..
अभ्यासात समोर आलेल्या निरीक्षणानुसार, ४ ते १२ आठवडे दररोज ठराविक प्रमाणात ACV चे सेवन केल्यास, बॉडी मास इंडेक्स, वजन, शरीरातील चरबीचे प्रमाण (BFR), कंबर आणि नितंबाचा घेर, काही न खाल्ल्याच्या स्थितीत रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. BMJ न्यूट्रिशन, प्रिव्हेन्शन अँड हेल्थ मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे आढळून आले आहे की किमान आठ आठवडे १५ मिली ACV चे सेवन केल्याने जास्त वजन असलेल्या किंवा लठ्ठ व्यक्तींमध्ये रक्तातील साखर, ट्रायग्लिसराइड आणि एकूण कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते.
ऍपल सायडर व्हिनेगर वजन कमी करण्यास कशी मदत करते?
ACV मधील प्राथमिक सक्रिय कंपाऊंड, ऍसिटिक ऍसिड हे वजन कमी करण्यासाठी मदत करत असल्याचे मानले जाते. यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण करणाऱ्या लेप्टिन आणि ॲडिपोनेक्टिन सारख्या हार्मोन्सचे उत्पादन वाढते. याव्यतिरिक्त, ऍसिटिक ऍसिड चयापचयाच्या दरम्यान विशिष्ट एन्झाईमची सक्रियता वाढवून फॅट्स बर्न करण्याची शरीराची क्षमता वाढवू शकते. अमेरिकन डायटेटिक असोसिएशनच्या जर्नलमधील आधीच्या अभ्यासात असे आढळून आले होते की, ज्या सहभागींनी जेवणापूर्वी ACV असलेले पेय घेतले होते त्यांनी ACV पेय न घेतलेल्या लोकांच्या तुलनेत जेवणादरम्यान कमी कॅलरीजचे सेवन करूनही वेगाने तृप्त वाटल्याचे सांगितले.
याशिवाय ACV रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकते. जेव्हा आपल्या रक्तातील साखरेची पातळी सतत कमी जास्त होत असते तेव्हा भूक आणि लालसा वाढण्याची शक्यता जास्त असते. ज्यामुळे जास्त खाणे आणि वजन वाढणे असे दोन्हीही धोके वाढू शकतात. ACV मधील ऍसिटिक ऍसिड कार्बोहायड्रेट्सचे पचन मंद करते, ज्यामुळे साखर रक्तप्रवाहात मिसळण्याचे प्रमाणही कमी होते व रक्तातील साखरेची पातळी स्थिर होते. यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता देखील सुधारू शकते, जी शरीराच्या उर्जेसाठी ग्लुकोजचा प्रभावीपणे वापर करण्याच्या आणि चयापचय सुधारण्याच्या क्षमतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
तुमच्या आहारात ACV चा समावेश कसा करावा
डॉ. प्रियंका रोहतगी सांगतात की, ACV चे सेवन करण्याचा सोपा मार्ग म्हणजे पाण्यात, चहा किंवा शेकमध्ये मिसळून आपण पिऊ शकता. साध्या सॅलेडची चव वाढवण्यासाठी सुद्धा याची मदत होऊ शकते. या व्हिनेगरची चव आंबट असते जी दात व अन्ननलिकेवर परिणाम करू शकते, त्यामुळे जेव्हा तुम्ही ACV घेणार असाल तेव्हा ते इतर द्रवासह मिसळून थोडं पातळ व कमी आंबट असेल याची खात्री करा. साधारण आठ आऊंस म्हणजे २३० मिली पाण्यात तुम्ही १ ते २ दोन चमचे ACV मिसळू शकता.
हे ही वाचा<< ७१ किलो वजन दोन वर्षांत कमी करताना प्रसिद्ध सीईओने पाळलं ‘हे’ डाएट; पुन्हा वजन वाढू नये याचं सिक्रेटही सांगितलं
लक्षात ठेवाच!
ACV हे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात मदत करू शकते पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नये. वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम व निरोगी जीवशैली आवश्यक आहे. ज्यांच्या शरीरात पोटॅशियमची कमतरता आहे किंवा ऍसिटिक ऍसिडला शरीर उत्तम प्रतिसाद देत नसेल तर ACV घेणे टाळावे. यासाठी निरीक्षण आवश्यक आहे व तुमच्या आरोग्य स्थितीशी परिचित असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.