Alcohol Increase Risk Of Cancer: ‘न्यूट्रिएंट्स’मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन मेटा-विश्लेषणाने रेड वाईन हा एक आरोग्यदायी अल्कोहोलिक पर्याय आहे या लोकप्रिय समजुतीला धक्का दिला आहे. ४२ अभ्यासांमधील डेटांचे विश्लेषण केल्यानंतर संशोधकांना रेड आणि व्हाईट वाईनमधील एकूण कर्करोगाच्या जोखमीमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण फरक आढळला नाही आणि कर्करोग प्रतिबंधकतेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची वाइन सुरक्षित असल्याचे दिसून आले नाही.

‘ब्राउन युनिव्हर्सिटी’चे प्रमुख लेखक डॉ. युनयाँग चो म्हणाले, “रेझवेराट्रोलसारख्या अँटिऑक्सिडंट्समुळे आरोग्यासाठी निरोगी म्हटल्या जाणाऱ्या रेड वाईनची प्रतिष्ठा टिकत नाही. वाईन कर्करोगाचा धोका कमी करते याचे कोणतेही ठोस पुरावे आम्हाला आढळले नाहीत. त्याशिवाय काही अभ्यासांमध्ये व्हाईट वाईन महिलांमध्ये कर्करोगाच्या उच्च जोखमीशी आणि त्वचेच्या कर्करोगाच्या २२ टक्के वाढीच्या जोखमीशी संबंधित आहे.”

अधिक विश्वासार्ह गट अभ्यासांवर लक्ष केंद्रित करताना, व्हाईट वाईन आणि कर्करोगाच्या वाढीव जोखमी यांच्यातील संबंध अधिक दृढ होतात. परंतु, रेड वाईनमध्ये कोणताही लक्षणीय धोका वाढलेला दिसून आला नाही.

परंतु, जरी सखोल विश्लेषणात सांख्यिकीयदृष्ट्या ही बाब महत्त्वपूर्ण आढळली नसली तरीही दररोज रेड वाईनचा प्रत्येक ग्लास कर्करोगाच्या जोखमीत पाच टक्के वाढीशी जोडला गेला आहे.

या अभ्यासात सहभागी नसलेले मेडिसिन फिजिशियन डॉ. ब्रायन ब्लॅक म्हणाले, “रेड वाईन ‘सुरक्षित’ अल्कोहोल असल्याच्या दाव्यांना हे आव्हान देते. खरा निष्कर्ष असा आहे की, कोणत्याही स्वरूपात अल्कोहोल धोकादायक आहे.”

कर्करोग प्रतिबंधक आघाडीच्या प्रवक्त्याने सांगितले, “हे निष्कर्ष काही सामान्य गैरसमजांना खोडून काढत असले तरीही ही गोष्टी तितकीच खरी आहे की, अल्कोहोलचे सेवन मर्यादित करणे हा कर्करोगाचा धोका कमी करण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे.”