Ash Gourd Juice: अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की, दररोज सलगपणे तीन आठवडे कोहळ्याच्या (ash gourd) रसाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. पण हे खरे आहे का? ‘सॅटविक मूव्हमेंट’च्या सह-संस्थापक सुबा सराफ यांच्या मते, जर एखाद्या महिलेने तीन आठवडे दररोज कोहळ्याच्या रसाचे सेवन केले, तर तिचे पोट कमी होईल आणि दीर्घकालीन आजारांचा धोकाही कमी होईल. याबाबत दी इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमने पोषण तज्ज्ञांना विचारण्याचे ठरवले.
आहारतज्ज्ञ व प्रमाणित मधुमेह शिक्षिका कनिक्का मल्होत्रा म्हणाल्या, “कोहळा ही कमी कॅलरीजची भाजी आहे, ज्यामध्ये भरपूर फायबर आहे आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी तो एक उत्तम पर्याय आहे. त्यातील उच्च फायबरमुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे तुमची खाण्याची इच्छा कमी होते आणि वजन प्रभावीपणे कमी करण्यासाठी ती महत्त्वाची बाब आहे.”
सोप्या शब्दांत सांगायचे तर, त्यातील उच्च फायबर सामग्री पचनास मदत करू शकते आणि तृप्ती वाढवू शकते. वजन व्यवस्थापनाच्या उद्दिष्टांना समर्थन देते.
“कोहळ्याचा रस त्याच्या नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठीदेखील ओळखला जातो, जो पाण्याचे प्रमाण कमी करण्यास आणि पोट फुगण्यास मदत करतो; ज्यामुळे तीन ते चार आठवड्यांत तुमचे पोट सपाट होते”, असे मल्होत्रा म्हणाल्या. “याव्यतिरिक्त, ते पाचक एंझाइम उत्तेजित करून आणि बद्धकोष्ठता व आम्लता यांसारख्या समस्यांपासून मुक्त होऊन निरोगी पचनास मदत करते. त्याचे अल्कधर्मी स्वरूप पोटातील आम्ल पातळी संतुलित करते, पचन सुरळीत करते आणि जेवणानंतर अस्वस्थता कमी करते,” असे मल्होत्रा म्हणाल्या.
“त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात, चयापचय वाढवतात आणि कालांतराने व्हिसरल फॅट कमी करण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स तुमच्या आहारात एक उत्तम भर घालू शकतात. परंतु, दीर्घकालीन परिणामांसाठी नियमित व्यायाम आणि संतुलित जेवण योजनेसह हा उपाय करणे आवश्यक आहे,” असे मल्होत्रा यांनी सांगितले.
जीवनसत्त्वे , खनिजे व अँटिऑक्सिडंट्स यांनी भरलेले हे कमी कॅलरीजयुक्त पेय त्याच्या थंड गुणधर्मांसाठीदेखील ओळखले जाते, ज्यामुळे हे पेय उष्ण हवामानात संक्रमणादरम्यान शरीराचे तापमान संतुलित करण्यासाठी एक आदर्श पर्याय ठरतो.
काय लक्षात घ्यावे?
- इतर कोणत्याही अन्न आणि पेयांप्रमाणे, प्रमाण व दर्जा लक्षात ठेवा आणि ते जास्त प्रमाणात घेऊ नका.
- पचनाचा त्रास टाळण्यासाठी कोहळ्याचा रस कमी प्रमाणात घ्या.
- जर तुम्हाला काही आजार असतील किंवा तुम्ही औषधे घेत असाल, तर आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असे मल्होत्रा म्हणाल्या.
- प्रभावी, दीर्घकालीन परिणामांसाठी संतुलित आहार आणि व्यायामासह या रसाचा दिनचर्येत समावेश करा.