Beetroot Juice Benefits: पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी (पेन स्टेट), यूएसच्या नवीन क्लिनिकल ट्रायलनुसार दररोज बीटरूटचा रस प्यायल्याने रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होऊ शकते. पण त्याहीपेक्षा मोठा फायदा हा रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना म्हणजेच मेनोपॉज आलेल्या किंवा सोप्या शब्दात सांगायचं तर, ज्यांना पाळी येणे बंद झाले आहे अशा महिलांना सर्वात मोठा फायदा होऊ शकतो. बीटरूटच्या रसात नायट्रेटचा मुबलक साठा असल्याने हृदयाला जोडलेल्या रक्तवाहिन्या रुंद होतात परिणामी रक्तप्रवाह सुरळीत होऊ शकतो. हृदयाला रक्ताचा पुरवठा नीट झाल्याने हृदयावरील ताण कमी होऊ शकतो व परिणामी हृदयविकाराचा धोका कमी होतो असेही या अभ्यासात सांगण्यात आले आहे. या अभ्यासात समोर आलेली माहिती खरी आहे का, याविषयी डॉक्टरांचे मत आज आपण जाणून घेणार आहोत.
नवी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे एंडोक्राइनोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार, डॉ सप्तर्षि भट्टाचार्य यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी काही समस्या साधारण पहिल्या वर्षात उद्भवत असतात. हार्मोन थेरपीसारख्या उपचारांसह यावर पहिल्या वर्षात उपचार करता येऊ शकतो पण दीर्घकाळ ही थेरपी चालू राहिल्यास कर्करोग व स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. अशावेळी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याला (कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थला) चालना देण्यासाठी बीटाचा रस नैसर्गिक व सुरक्षित उपचार पद्धती प्रदान करतो.
रजोनिवृत्ती आणि हृदयाच्या आरोग्याचा काय संबंध आहे?
रजोनिवृत्ती हा हृदयविकाराचा धोका वाढवणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. इस्ट्रोजेन हा हार्मोन हृदयाचे संरक्षण करतो, धमन्यांच्या भिंती लवचिक ठेवण्याचे काम सुद्धा हा हार्मोन करतो. पण रजोनिवृत्ती दरम्यान जेव्हा इस्ट्रोजेनची पातळी कमी होते आणि आपण हृदयाची संरक्षणात्मक ढाल गमावतो.
बीटरूटचा रस स्त्रियांच्या हृदयासाठी कसा चांगला आहे?
‘फ्रंटियर्स इन न्यूट्रिशन’ मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, बीटरूटच्या रसाचे दररोज सेवन केल्याने रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. नायट्रेट-समृद्ध बीटाचा रस रक्तवाहिन्या रुंद करण्यास मदत करतो आणि रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांचे संरक्षण करतो. अभ्यासात असे आढळून आले आहे की, बीटरूटच्या रसाचे सेवन केल्याने रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांना आरोग्यासाठी दीर्घकालीन संरक्षण मिळवता येऊ शकते.
बीटरूटमधील नायट्रेट काय काम करते?
बीटरूटच्या रसामध्ये असलेले नायट्रेट रक्तातील नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होते, ज्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होतात, रक्त प्रवाह सुधारतो आणि रक्तदाब कमी होतो. तसेच या नायट्रेटमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म सुद्धा आहेत.
बीटरूटच्या रसाचे फायदे व लक्षात घ्यायच्या गोष्टी
१) बीटाच्या रसामुळे स्टॅमिना वाढण्यास मदत होते. प्रौढांमध्ये व्यायाम करण्याची सहनशक्ती वाढवण्यास सुद्धा बीटाचा रस कामी येऊ शकतो.
२) २०१६ च्या अभ्यासात असे दिसून आले होते की एका आठवड्यासाठी दररोज ७० मिली बीटरूटचा रस घेतल्याने हृदय मजबूत होण्यास मदत होऊ शकते.
३) बीटाचा रस हा मुळातच कमी कॅलरीजयुक्त आहेत. यात नैसर्गिक स्वरूपातील साखर असते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी सेवन करताना मर्यादा पाळायला हव्यात.
४) २०१४ च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, २२५ मिलीलीटर बीटरूटचा रस (अर्ध्या कपपेक्षा थोडा कमी) प्यायल्याने जेवणानंतरची ग्लुकोजची पातळी लक्षणीय प्रमाणात कमी होते.
हे ही वाचा<< खूप रागावल्यावर खरंच हृदयविकाराचा झटका येतो का? तळपायाची आग मस्तकात जाताना नेमकं शरीरात घडतं काय?
५) बीटाच्या रसातील अँटिऑक्सिडंट्स कॅन्सर आणि फॅटी लिव्हरपासून तुमचे रक्षण करतात.
६) हा रस पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, जस्त आणि तांबे यांसारख्या खनिजांचे समृद्ध भांडार आहे. तसेच हा फोलेट, बी व्हिटॅमिनचा एक चांगला स्रोत आहे. यामुळे खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण सुद्धा कमी होते.