having milk and jaggery before bedmilk and jaggery before bed : आपल्यातील अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध पिणे प्रचंड आवडते. आयुर्वेददेखील झोपण्यापूर्वी दूध पिण्याची शिफारस करते. पण, घश्याच्या संबंधित आजारांना लक्षात ठेवून… तर दूध व गूळ हे आयुर्वेदिक कॉम्बो आरोग्यासाठी एक नैसर्गिक पॉवरहाऊस आहे. हे प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होऊ शकते. तसेच, असे दूध प्यायल्याने ॲनिमिया / रक्ताल्पता बरा होण्यास, गॅस्ट्रिक समस्या दूर होण्यास मदत होते. एकूणच तुमचे आतडे निरोगी ठेवायचे असेल, आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर हा एक सोपा मार्ग आहे; असे एका सोशल मीडिया पोस्टमध्येसुद्धा लिहिण्यात आले आहे.
पण, या दाव्यात काही तथ्य आहे का?
याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने आयुर्वेद अभ्यासक डॉक्टर डिंपल जांगडा यांच्याशी चर्चा केली. डॉक्टर डिंपल जांगडा यांच्या म्हणण्यानुसार, दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे एक अमिनो आम्ल असते; जे सेरोटोनिन, मेलाटोनिन हार्मोन्स सोडून चांगली झोप लागण्यास मदत करू शकतात. तसेच दूध ( Milk ) उच्च दर्जाचे प्रथिनेदेखील प्रदान करते; जे स्नायूंच्या दुरुस्ती आणि त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. दुधामध्ये बी१२, डी सारख्या जीवनसत्त्वांची उपस्थिती अनुक्रमे मज्जातंतूंच्या कार्यास, हाडांच्या आरोग्यास समर्थन देतात,” असे डॉक्टर डिंपल जांगडा म्हणाल्या आहेत.
गूळ याला गूर असेही म्हणतात, गूळ ऊसाच्या शुद्ध रसातून तयार केला जातो. गूळ हा साखरेला एक आरोग्यदायी व उत्तम पर्याय मानला जातो. कारण ते मिनरल्स, जीवनसत्त्वांच्या स्वरूपात पोषण टिकवून ठेवतात. गूळ पाचन अग्नीलादेखील उत्तेजित करतो आणि कफ संतुलित करण्यास मदत करतो. गूळ हे न पचलेले अन्न, आतड्यात साचलेल्या विषारी पदार्थांना शरीराबाहेर काढून टाकण्यासदेखील मदत करतो; असे डॉक्टर डिंपल जांगडा म्हणाल्या आहेत.
तर डॉक्टर जांगडा यांच्या मते, दूध ( Milk ) व गूळ पचनसंस्थेतील कोरडेपणा, जास्त उष्णता, अतिरिक्त थंडी कमी करण्यास मदत करून शरीरात शांतता व स्थिरता वाढविण्यास मदत करतात आणि झोपेच्या समस्या, निद्रानाशासाठीदेखील एक उत्कृष्ट पर्याय म्हणून ओळखले जातात; असे डॉक्टर डिंपल जांगडा म्हणाल्या आहेत.
हैदराबाद एलबीनगर येथील ग्लेनेगल्स अवेअर हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉक्टर श्वेता बिराली यांनी सांगितले की, गूळ व दुधाचे सेवन हाडे, दात मजबूत ठेवण्यासाठी प्रोत्साहन देते.तसेच हे मिश्रणाचे दूध कमी प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे, विशेषत: ज्यांना रक्तातील साखर वाढण्याची चिंता आहे. कारण गुळात नैसर्गिक गोडवा असला तरीही रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकतो. दुग्धशर्करा असहिष्णू किंवा दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असलेल्या व्यक्तींनी हे मिश्रण टाळावे आणि बदाम किंवा नारळाच्या दुधासारख्या पर्यायांचा विचार करावा. तसेच १५ दिवसांतून एकदा अधूनमधून गुळासोबत दूध पिणे चांगले ठरू शकते. पण, या दुधाचे रोज सेवन करू नये, अशी शिफारससुद्धा करण्यात आली आहे, असेदेखील डॉक्टर बिराली म्हणाल्या आहेत.
तसेच मुंबईच्या फॉझिया अन्सारी, झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ या वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगतात की, कॅल्शियम व लोह यांच्यातील संभाव्य परस्परसंवादामुळे दूध (Milk ) व गूळ मिक्स करून पिणे चांगला पर्याय असू शकत नाही. दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, जे गुळामध्ये आढळणाऱ्या नॉन-हेम आयर्नचे शोषण रोखू शकते; ज्यामुळे गुळाचे एकत्र सेवन केल्यास त्याचे पौष्टिक फायदे कमी होतात. त्यामुळे दूध व गूळ यांच्या एकत्र सेवनाचे जसे आरोग्यदायी फायदे आहेत तसे तोटेसुद्धा आहेत. त्यामुळे जीवनशैलीतील बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
© IE Online Media Services (P) Ltd