Benefits Of Drinking Raisin Water: सकाळची सुरुवात अनेकदा तुमच्या दिवसाचा मूड ठरवत असते. म्हणजे बघा ना सकाळी पोट स्वच्छ असेल, मनासारखा नाष्टा झाला असेल, चुकून ट्रेनमध्ये जागा मिळाली असेल की आपला दृष्टिकोनच सकारात्मक होऊ लागतो की नाही? तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात गोड व्हावी यासाठी आम्ही आज आपल्याला एक उपाय सुचवणार आहोत. तसं पाहायला गेल्यास हा उपाय काही नवीन नाही उलट वर्षानुवर्षे आपल्या आज्या, आई, हे उपाय करत आहेत. फक्त त्याला आता उजेडात आणण्याची वेळ आली आहे. हा उपाय म्हणजे मनुक्याचे पाणी. आता मनुका किंवा वाळलेली द्राक्षे हे विविध पोषक तत्वांचे स्त्रोत आहेत. पाण्यात भिजवल्यावर यातील काही पोषक घटक जसे की जीवनसत्त्वे आणि खनिजे पाण्यात सुद्धा उतरतात. आहारतज्ज्ञ डॉ भारती शाह भट्ट, एचसीजी हॉस्पिटल्स, भावनगर यांनी इंडियन एक्सस्प्रेसशी संवाद साधताना मनुका पाणी पिण्याचे फायदे अधोरेखित केले आहेत. यांची एक झलक पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे

डॉ भट्ट सांगतात की, मनुक्यामध्ये फायबर असते जे शरीराला पचनासाठी व मलनिर्मितीसाठी गती प्रदान करते. यामुळे आतड्यांच्या हालचाली सुधारून बद्धकोष्ठ कमी होण्यास मदत होऊ शकते. मनुक्याचे पाणी पचनसंस्थेला डिटॉक्स करण्यासाठी व आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंच्या वाढीसाठी मदत करते. परिणामी आतड्यांचे एकूणच आरोग्य सुधारण्यास हातभार लागतो.

मनुका भिजवलेले पाणी हे लोहाचा एक उत्तम स्रोत असू शकते, विशेषत: ज्यांच्या रक्तात लोहाची कमतरता आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरते. संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी लोह महत्त्वपूर्ण भूमिका बजावते व या लोहाचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी मनुक्याचे पाणी फायदेशीर ठरते.

शरीरात पोटॅशियम हे रक्तदाब आणि द्रव संतुलन राखण्यासाठी आवश्यक आहे. मनुक्याच्या पाण्यामुळे शरीराला पोटॅशियमचा पुरवठा होऊ शकतो.

मनुक्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी सारखे जीवनसत्त्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कामी येतात.

मनुक्याचे पाणी कधी व किती प्यावे?

डॉ भट्ट यांनी सांगितले की, एका भांड्यात मूठभर मनुके (शक्यतो सेंद्रिय) भिजवावे. मनुके रात्रभर किंवा सुमारे ८ ते १२ तास भिजू द्या. सकाळी,एका ग्लासमध्ये पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी किंवा दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात मनुक्याचे पाणी पिऊ शकता. तुम्ही भिजवलेले मनुके चावून खाऊ शकता कारण त्यातही उत्तम पौष्टिक मूल्य असतात.

मनुक्याचे पाणी पिताना कोणत्या गोष्टींची घ्याल काळजी?

तुम्ही ऐकलं असेल की एखादी गोष्ट कितीही फायदेशीर असली तरी त्याचा अतिरेक केल्याने ती घातकच ठरते. हाच नियम मनुक्यांसाठी सुद्धा लागू होतो. आपण जर वरील फायदे वाचून आजपासूनच मनुक्याचे पाणी सेवन करायला सुरु करणार असाल तर त्याआधी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. जसे की..

साखरेचे प्रमाण: मनुक्यामध्ये नैसर्गिक साखर असते, म्हणून संयम महत्त्वाचा आहे, विशेषत: मधुमेह असणाऱ्यांनी मनुक्याचे सेवन करताना एकतर आपल्या आरोग्य स्थितीशी परिचित असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा व दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त सेवन करू नये.

१०० ग्रॅम मनुक्यांमध्ये ३०० कॅलरीज असतात त्यामुळे जी मंडळी वजन कमी करण्याच्या मोहिमेवर आहेत त्यांनी मनुक्याचे सेवन टाळावे. तसेच जर तुम्हाला रक्तदाबाचा किंवा ब्लड शुगरचा त्रास असेल तर मनुके खाणे टाळावे.

मनुक्याचे सेवन केल्यावर दातांमध्ये कण राहू नयेत यासाठी आपण दात घासणे व चूळ भरणे आवश्यक आहे.

एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की मनुक्याच्या पाण्याचे सेवन ही तुमच्या आरोग्याला हातभार लावणारी जोड असू शकते. कोणत्याही फायद्यांसाठी याच उपायावर पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. हा चमत्कारिक उपाय नाही पण यामुळे आपल्या शरीराला फायबर, आवश्यक जीवनसत्वे व अँटिऑक्सिडंट्सचा पुरवठा होऊ शकतो.

हे ही वाचा<< शेवग्याच्या शेंगा व भाजीमध्ये दडलेले फायदे वाचा, एका दिवसात किती व कसा खावा शेवगा? तज्ज्ञांनी सांगितलं कॅलरीजचं सूत्र

तुम्ही शरीराचे हायड्रेशन वाढवण्यासाठी आणि संभाव्य आरोग्य फायदे मिळवण्यासाठी हा नैसर्गिक आरोग्यदायी पर्याय नक्कीच विचारात घेऊ शकता. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला सुद्धा आवर्जून घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drinking raisin water magical powerhouse every morning how much manuka to eat in a day weight loss constipation remedies svs