Drinking water with food : पचनाशी संबंधित अनेक समज आणि गैरसमज खूप लवकर पसरतात. असाच एक समज आहे की, जेवणाबरोबर किंवा त्यानंतर पाणी प्यायल्याने पोटातील ॲसिड खूप पातळ होते, ज्यामुळे अन्न पचण्यास अवघड जाते आणि आपली पचनक्रिया बिघडते; याशिवाय पोटाच्या इतर समस्यासुद्धा वाढतात.

खरंतर पोटातील ॲसिडचे काम हे पाण्याच्या सेवनाकडे दुर्लक्ष करून पचनाचे कार्य सुरळीत पार पाडणे आहे. शरीरात हायड्रेशनची (पाण्याची) योग्य मात्रा राखण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे आणि पाणी हे पचनास अडथळा आणण्याऐवजी उलट मदत करू शकते. याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे इंटर्नल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. राकेश गुप्ता यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती सांगितली आहे.

पोटात गॅस्ट्रिक ॲसिड तयार होते. विशेषत: हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होते, जे अन्न पचवण्यास, पचन क्रियेस फायदेशीर असलेले एन्झाइम सक्रिय करण्यास आणि पोटातील हानिकारक बॅक्टेरिया मारण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. पोटातील आतील भाग हा अत्यंत ॲसिडिक असतो, ज्याचा पीएच सहसा १.५ ते ३.५ पर्यंत असतो, जो पचनासाठी अत्यंत आवश्यक आहे.

हेही वाचा : उपवासामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते? करवा चौथचा उपवास करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

पोटातील ॲसिड आणि पाणी

पोट हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे, जो आपण खाल्लेले अन्न आणि द्रव सामावून घेतो. जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ खाता किंवा द्रव पिता, तेव्हा ते पदार्थ किंवा द्रव सामावून घेण्यासाठी पोटाचा आकार वाढतो. पण, जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा पोटामध्ये गेलेले पाणी द्रव व पदार्थ एकजीव करते.

पोटाकडे ॲसिडिक वातावरण राखण्याची उत्तम क्षमता आहे. अन्न हे पोटाला खूप जास्त गॅस्ट्रिक ॲसिड तयार करण्यास प्रोत्साहन देते, ज्यामुळे पचनासाठी गरजेचे पीएच तयार करण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने पोटातील पदार्थांचा आकार थोड्या वेळासाठी वाढू शकतो, पण गॅस्ट्रिक ॲसिड शरीराच्या सर्व गरजा पूर्ण करते आणि पचनक्रिया सुरळीत ठेवते.

पचनक्रियेसाठी पाणी कसे फायदेशीर आहे?

संपूर्ण आरोग्यासाठी हायड्रेशन ही अत्यंत आवश्यक बाब आहे. जेवण करण्यापूर्वी, दरम्यान आणि त्या नंतर पाणी पिणे अनेक प्रकारे अन्न पचनास मदत करू शकते. पाणी पोषक तत्वांचे विघटन करण्यास मदत करते आणि पोटातील एन्झाइमॅटिक प्रक्रियेस प्रोत्साहन देते. पाण्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते, तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पचनक्रियेनंतर संपूर्ण शरीरात पोषक द्रव्ये वाहून नेण्यास पाणी मदत करते.

हेही वाचा : “रात्री ९.३० वाजता ध्यान करते अन् १० वाजता झोपते”, समंथा रुथ प्रभुच्या दिनचर्येबाबत काय म्हणाले तज्ज्ञ?

जेवणाबरोबर पाणी पिण्याचे काय फायदे आहेत?

जेवणाबरोबर पाणी प्यायल्याने अन्न मऊ होते, जे पचायला सोपे जाते तसेच पाणी तुम्हाला पोट भरण्यास मदत करू शकते; ज्यामुळे तुम्ही खूप जास्त खाणे टाळू शकता आणि वजन नियंत्रणात ठेवू शकता. याशिवाय जेवणाबरोबर पाणी प्यायल्याने टाळू (Palate) स्वच्छ राहते, ज्यामुळे तुम्ही खात असलेल्या पदार्थाची चव वाढते आणि तुम्ही जेवणाचा अधिक चांगला आनंद घेऊ शकता.

जर तुम्हाला सतत पचनाशी संबंधित समस्या येत असतील तर तुमच्या जवळच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पाणी आणि पोटातील ॲसिड यांच्यातील संबंध समजून घ्या, जेणेकरून तुम्ही तुमच्या आहाराच्या सवयींमध्ये आवश्यक बदल करू शकता.