Drying Clothes Indoors Health Risks : थंडी आणि पावसाळ्यात सर्वांत मोठी समस्या असते ती म्हणजे ओले कपडे सुकवण्याचे. बऱ्याच जणांना रोजचे ओले कपडे घरात सुकवण्याची सवय असते. त्यासाठी घरात एका विशिष्ट ठिकाणी कपडे सुकवण्यासाठी दोऱ्या बांधल्या जातात, हँगर लटकवण्यासाठी किंवा स्टॅण्ड ठेवण्यासाठी जागा असते. पण, कपडे अशा प्रकारे घरात सुकवल्याने तुम्ही आजारी पडू शकता. याचा अर्थ असा की, कपड्यांच्या ओलाव्यामुळे घरातील वातावरणावर परिणाम होतो. त्याचा आपल्या शरीरावरही विपरीत परिणाम होत असतो.

यावर कंटेंट क्रिएटर जेक यांनी एक रील पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी घरात कपडे सुकवल्याने त्याचा आपल्या शरीरावर कसा विपरीत परिणाम होतो हे सांगितलेय. जेक याने सांगितले, “कपडे कधीही घरात लटकवून सुकत घालू नका. कारण- त्यामुळेच घरात ओलसर वातावरण निर्माण होतं आणि बुरशी येते. विशेषतः बेसमेंट आणि तुम्ही ज्या ठिकाणी कपडे धुता किंवा वाळत घालता, त्या ठिकाणी बुरशी दिसून येते.

परंतु, याने आपल्या शरीरावर काय विपरीत परिणाम होतो आणि घरात कपडे सुकवण्याची सवय कमी करण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊ…

सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी सांगितले की, ओले कपडे घरात सुकवल्याने घरातील आर्द्रतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यामुळे बुरशी वाढण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते. कारण- ज्यावेळी कपडे हवेत सुकत असतात तेव्हा त्यातील आर्द्रतेचे आजूबाजूच्या वातावरणात बाष्पीभवन होते, ज्यामुळे हवेतील बाप्षाचे प्रमाण वाढते.

घरात याचे नेमके काय परिणाम जाणवतात?

१) आर्द्रता वाढते : कपडे सुकताना एकाच कपड्यातून जवळपास दोन लिटर पाणी हवेत सोडले जाऊ शकते. त्यामुळे घरात वाढलेली आर्द्रता बुरशीच्या बीजाणूंसाठी योग्य वातावरण तयार करते, जे ओलसर, दमट परिस्थिती वाढवतात.

२) संक्षेपण : कमी हवेशीर जागांमध्ये बाष्पीभवनामुळे तयार झालेला ओलावा भिंती, छत किंवा खिडक्यांसारख्या थंड पृष्ठभागावर स्थिरावतो, ज्यामुळे ओलसर ठिपके तयार होतात आणि त्यामुळे बुरशीचे प्रमाण वाढते.

३) घरात हळूहळू सर्वत्र बुरशीचे अस्तित्व : घरात कपडे नियमितपणे सुकत घातल्याने ही समस्या आणखी वाढते, ज्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण सतत वाढते आणि घरात हळूहळू सर्वत्र बुरशीचे प्रमाण वाढत जाते.

डॉ. हिरेमठ सांगतात, “बिल्डिंग अँड एन्व्हायर्न्मेंटमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, ज्या घरांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त असते अशा घरांमध्ये बुरशी वाढण्याची शक्यता जास्त असते. पण रोज तुम्ही घरातच कपडे सुकवत असाल, तर आर्द्रतेचे प्रमाण मर्यादेपलीकडे वाढू शकते.

आरोग्याला कोणते धोके निर्माण होतात?

घरातील आर्द्रतेमुळे वाढलेल्या बुरशीच्या संपर्कात आल्याने विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात, विशेषतः ज्या व्यक्तींना आधीच श्वसनाचे आजार, अॅलर्जी किंवा ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमजोर आहे, त्यांना अधिक धोका असल्याचे डॉ. हिरेमठ यांनी सांगितले.

१) श्वसनासंबंधित समस्या

बुरशीचे बीजाणू श्वास घेताना श्वसनमार्गात प्रवेश करतात आणि त्यामुळे श्वसनासंबंधित त्रास होऊ शकतो. खोकला, घरघर व श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे उद्भवू शकतात. दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने दम्यासह दीर्घकालीन श्वसनरोगांचा धोका वाढतो.

२) अ‍ॅलर्जी

बुरशीच्या बीजाणूंमुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते, ज्यामुळे शिंका येणे, नाक वाहणे, डोळ्यांना खाज येणे व त्वचेवर पुरळ येणे अशी लक्षणे उद्भवू शकतात. बुरशीमुळे घरात एखाद्या व्यक्तीस अ‍ॅलर्जी झाली आणि त्या व्यक्तीच्या तुम्ही दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास तुम्हालाही त्याची लागण होऊ शकते.

३) इतर घातक परिणाम

काही बुरशीच्या प्रजाती, जसे की स्टॅचीबोट्रीज चार्टारम (काळी बुरशी), मायकोटॉक्सिन तयार करतात, ज्यामुळे दीर्घकालीन थकवा, डोकेदुखी व रोगप्रतिकार शक्ती कमी होणे यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.

४) असुरक्षित गटांवर परिणाम

लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्यांना बुरशीच्या संपर्कामुळे संसर्ग होण्याचा किंवा त्यांची आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, घरातील ओलसरपणाचा बुरशीचा श्वसनसंसर्ग व दम्याच्या प्रादुर्भावात वाढ होणे याच्याशी थेट संबंध आहे.

बुरशीचा धोका न वाढता घरात कपडे सुकवण्यासाठी काय करावे?

डॉ. हिरेमठ यांनी सांगितले की, घरात ओलावा जमा होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि चांगल्या व्हेंटिलेशन राहावे यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्यास तुम्ही घरात सुरक्षितपणे कपडे सुकवू शकता.

कपडे सुकत टाकता, त्या ठिकाणी आर्द्रतेचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यासाठी घरात तुम्ही डिह्युमिडिफायरचा वापर करू शकता. खिडक्या उघडून, एक्झॉस्ट फॅन वापरून तुम्ही घरातील ओलावा कमी करू शकता. इतकेच नव्हे, तर कपडे सुकवण्यासाठी घरात हवेशीर जागा निवडून हवेचा प्रवाह सुधारा.

हिटेड ड्राईंग रॅक, व्हेंटेड ड्रायर आणि स्मॉलर लाँड्री लोड्सच्या मदतीने तुम्ही पटकन कपडे सुकवू शकता. सिलिका जेल किंवा चारकोल डिह्युमिडिफायर यांसारख्या शोषक पदार्थांच्या मदतीनेही तुम्ही घरातील आर्द्रता कमी करू शकता.

घरात बुरशी वाढण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी नियमित तपासणी करा. घरात ओलावा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी घरातील तापमान १८-२२°C दरम्यान ठेवा.

Story img Loader