Almond Benefits for Skin: बदाम हे असे एक ड्रायफ्रूट आहे; ज्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बदामामध्ये असंख्य पोषक घटक असतात; जे शरीराच्या अनेक गरजा पूर्ण करतात. बदाम लोक स्नॅक्स म्हणून खातात किंवा मिठाई अथवा खिरीसारख्या खाद्यपदार्थांमध्ये मिसळून खातात. त्याच वेळी बरेच लोक बदाम भिजवून, त्याची साले काढून खातात. व्हिटॅमिन ई, फायबर, मॅग्नेशियम, प्रथिने, मॅंगनीज, तांबे, फॉस्फरस यांसारखे सूक्ष्म पोषक घटक बदामामध्ये आढळतात. हे सर्व पोषक घटक शरीराला रोगांशी लढण्याची ताकद देतात आणि तुम्हाला निरोगी ठेवतात. बदाम त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत, असे मानले जाते. मग काय बदाम खाल्ल्याने सुरकुत्या आणि असमान त्वचा, टोन कमी होण्यास मदत होऊ शकते का? याच विषयावर त्वचाविषयक तज्ज्ञ व कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. गीतिका मित्तल गुप्ता यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
तज्ज्ञ सांगतात, “बदाम एक असे ड्रायफ्रूट आहे; जे बहुतेक लोकांना खायला आवडते. बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात अनेक पोषक घटक असतात. बदाम अँटीऑक्सिडंट्स, निरोगी चरबी, जीवनसत्त्वे व खनिजे यांनी समृद्ध आहे. बदामामध्ये निरोगी अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे व खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बदाम खाणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे त्या सांगतात. बदाम हा व्हिटॅमिन ‘ई’चा उत्कृष्ट स्रोत आहे. रोज बदाम खाल्ल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होते.
“बदाम खाणे आरोग्यासाठी कितीही फायदेशीर मानले जाते. पण, याचे त्वचेसाठी विशेष फायदे आहेत. वास्तविक बदामातील ओमेगा-३ त्वचेला टोनिंग करण्यासाठी उपयुक्त आहे. बदामातील तेल हे सुरकुत्या कमी करते आणि नंतर त्वचा सुधारते. व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट्ससोबतच बदामामध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात; ज्यामुळे तुमचे तारुण्याचे वय अनेक वर्षे वाढून, वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत मिळते आणि शरीरातील मुक्त रॅडिकल्स सहजपणे रोखू शकते. ही बाब वृद्धत्वाच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि चमकदार त्वचा मिळविण्यास मदत करते.
(हे ही वाचा : इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा ३६ तासांचा उपवास; यामुळे वजन होतं झटपट कमी? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या…)
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी (UC) च्या संशोधनाचा दाखला देत, फायटोन्यूट्रिएंट केमिस्ट डॅन गुबलर म्हणाले की, दररोज अर्धा कप बदाम खाणे हे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि त्वचेचा रंग सुधारण्याचे एक प्रभावी माध्यम असू शकते. या संशोधनात रजोनिवृत्तीचा काळ ओलांडलेल्या महिलांचा वेगवेगळे गट करून, त्यांच्यावर अभ्यास करण्यात आला. बदामामध्ये आवश्यक पोषक घटक असतात; जे त्वचेचे आरोग्य वाढवतात. त्याशिवाय बदामामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स यांसारखे निरोगी फॅट्स असतात; जे त्वचेला आतून पोषण देण्यास मदत करतात.
बदामाचे सेवन केल्याने त्वचेच्या पेशींना आवश्यक ती पोषक द्रव्ये मिळतात. बदामामध्ये लिनोलिक अॅसिड असते आणि त्याचे सेवन केल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. त्याशिवाय बदाम बारीक रेषा भरून, त्वचेची चमक वाढवता. त्यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या हळूहळू सुरकुत्यामुक्त होण्यास मदत मिळते.
बदाम किती खावेत?
तुमच्या दैनंदिन आहारात अर्धा कप बदामाचा समावेश करू शकता. ते सॅलडमध्ये किंवा स्मूदीमध्ये मिसळूनही तुम्ही खाऊ शकता. मर्यादित स्वरूपात बदामाचे सेवन केल्यास यातील पोषण घटकांमुळे त्वचा नैसर्गिक स्वरूपात उजळते. बदामातील औषधी घटक आपल्या त्वचेची कार्यप्रणाली सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचेच्या पेशींची निर्मिती योग्य पद्धतीने होते. बदामाच्या सेवनामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. कारण- त्यामध्ये त्वचा नैसर्गिक स्वरूपात तरुण ठेवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पोषण घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात बदामाचे सेवन केल्यास तुमचीही त्वचा चिरतरुण राहील.
हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, बदाम त्वचेच्या संपूर्ण आरोग्यासाठी योगदान देऊ शकतात. परंतु, ते संतुलित आहाराचा भाग असले पाहिजेत; ज्यामध्ये विविध पोषकसमृद्ध पदार्थांचा समावेश आहे, असेही तज्ज्ञ शेवटी सांगतात.