Weight Gain and Cashews : लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना काजू खायला आवडते. काजू चवीला स्वादिष्ट असतात. याच कारणामुळे इतर ड्रायफ्रुट्सपेक्षा काजू अधिक लोकप्रिय आहेत. काजू हे अनेक पदार्थांमध्ये दिसून येतात. गोड पदार्थांत आवर्जून काजूचा समावेश केला जातो. एवढेच काय तर एखादा पदार्थ आकर्षक दिसावा यासाठीसुद्धा काजूचा वापर केला जातो.
काजू हा अत्यंत पौष्टिक असून, त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. काजूचे सेवन केल्याने आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला मिळतात; जे मेंदूच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. त्याशिवाय रोग प्रतिकारशक्ती वाढवणे, हाडे व स्नायू मजबूत करणे आणि अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास काजू मदत करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल नामपल्लीच्या डाएटिशियन सनोबर सिद्राह यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना काजूचे आरोग्यदायी फायदे आणि काजू खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत, याविषयी सविस्तर माहिती दिली. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

२८ ग्रॅम काजूमध्ये काय असते?

  • कॅलरी- १५७
  • फॅट्स- १२.४ ग्रॅम
  • सॅच्युरेटेड फॅट्स- २.२ ग्रॅम
  • मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स- ७.७ ग्रॅम
  • पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स- २.२ ग्रॅम
  • सोडियम- ३ मिलिग्रॅम
  • कर्बोदके- ८.६ ग्रॅम
  • फायबर- १ ग्रॅम
  • साखर- १.७ ग्रॅम
  • प्रोटिन्स- ५.२ ग्रॅम
  • व्हिटॅमिन ई- ०.३ मिलिग्रॅम
  • व्हिटॅमिन के- ९.५ मायक्रोग्रॅम
  • कॅल्शियम- १० मिलिग्रॅम
  • लोह- १.७ मिलिग्रॅम
  • मॅग्नेशियम- ८३ मिलिग्रॅम
  • फॉस्फरस- १६८ मिलिग्रॅम
  • पोटॅशियम- १८७ मिलिग्रॅम
  • झिंक- १.६ मिलिग्रॅम
  • तांबे- ०.६ मिलिग्रॅम
  • मॅंगनीज- ०.५ मिलिग्रॅम

हेही वाचा : बाळाच्या शांत झोपेसाठी स्तनपान कसं फायदेशीर आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

काजूचे फायदे

डाएटिशियन सनोबर सिद्राह यांनी सांगितलेले काजूचे काही फायदे खालीलप्रमाणे :

हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले : काजूमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड व पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. त्यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकासुद्धा कमी होतो.

वजन नियंत्रण : काजूमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते तरीसुद्धा ते वजन नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. यात असलेल्या प्रोटिन्स आणि फायबरमुळे फार भूक लागत नाही.

पोषत तत्त्व : काजूमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे यांसारखे अनेक पोषक घटक असतात; जे हाडे आणि स्नायू यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.

अँटीऑक्सिडंट्स : काजूमध्ये व्हिटॅमिन ई व के यांसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. ते शरीराला तणावमुक्त ठेवण्यास मदत करतात आणि आजारांपासून दूर ठेवतात.

चांगली झोप : काजू हा ट्रिप्टोफॅनचा (Tryptophan) प्रमुख स्रोत आहे; जो सेरोटोनिन आणि मेलाटोनिन बनवण्यास मदत करतो. त्यामुळे चांगली झोप येते आणि व्यक्तीचा मूडसुद्धा चांगला असतो.

हेही वाचा : व्यक्तीच्या वयापेक्षा त्याच्या हृदयाचे वय जास्त असेल तर येऊ शकतो हार्ट अटॅक? कसे जाणून घ्यायचे हृदयाचे वय? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात …

मधुमेहाचे रुग्ण काजू खाऊ शकतात का?

सनोबर सिद्राह सांगतात, “मधुमेहाचे रुग्ण काजू खाऊ शकतात. काजूमध्ये मध्यम आकाराचा ग्लायसेमिक इंडेक्स असतो; ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर प्रभाव दिसून येतो. काजूमध्ये फायबर आणि प्रोटिन्स असतात; जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
परंतु, मधुमेहाच्या रुग्णांनी एका ठरावीक प्रमाणातच काजूचे सेवन करावे. त्यातील कर्बोदके आणि कॅलरी यांचे प्रमाण लक्षात घेऊन काजू खावे.

काजूमुळे वजन वाढते का?

काजू इतर ड्रायफ्रूट्सप्रमाणे नाही. त्यात कॅलरीचे प्रमाण अधिक असते. प्रमाणाबाहेर काजूचे सेवन केल्यामुळे वजन वाढू शकते; पण संतुलित आहाराचा भाग म्हणून एका ठरावीक प्रमाणात काजूचे सेवन केल्याने वजन वाढत नाही.

डाएटिशियन सिद्राह सांगतात, “काजू हे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. कारण- काजूमध्ये चांगले फॅट्स, फायबर व प्रोटिन्स असतात; जे भूक नियंत्रित करण्यास मदत करतात. काजूचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने चांगली पोषण तत्त्वे मिळू शकतात आणि वजनही वाढण्याची शक्यता कमी असते.

डाएटिशियन सिद्राह यांच्या म्हणण्यानुसार काजूचे सेवन करताना काही गोष्टी लक्षात ठेवा …

  • काजूमध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे काजूचे सेवन
    कमी प्रमाणात करावे.
  • काही व्यक्तींना काजूची ॲलर्जी असू शकते. काजू खाण्यापूर्वी ॲलर्जीविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
  • जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल, तर ताजे किंवा चव नसलेले काजू खा. अशा वेळी काजूचे सेवन करताना सोडियमची मात्रा लक्षात घ्या.
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating cashews can cause weight gain read what dietitian said ndj