Dark Chocolate Side Effects : चॉकलेट्स खायला कोणाला आवडत नाहीत? गोड खाणाऱ्यांना तर चॉकलेट खाण्यापासून थांबवणे म्हणजे कठीण आहे. पण, तुम्ही रोज डार्क चॉकलेट (Dark Chocolate) खात असाल, तर तुमचे नुकसान होऊ शकते. त्याशिवाय वजन कमी करू पाहणाऱ्यांनी तर डार्क चॉकलेट खाण्यापासून काही पावले मागे ठेवली पाहिजेत. तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली आणि सुरक्षित, आरोग्यदायी अनुभवासाठी डार्क चॉकलेटच्या सेवनाची आयडियल फ्रिक्वेन्सी समजून घेतली.
बंगळुरूच्या ॲस्टर व्हाईटफिल्ड हॉस्पिटलच्या, सल्लागार, इंटर्नल मेडिसिन, डॉक्टर एस. एम. फयाझ (Dr. S. M. Fayaz) यांनी सांगितले की, दररोज डार्क चॉकलेट खाणे आरोग्यदायी असू शकते. फक्त ते जर माफक प्रमाणात खाल्ले तरच. डार्क चॉकलेटमध्ये (Dark Chocolate) भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. विशेषत: फ्लेव्होनॉइड्स, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास, जळजळ कमी करण्यास व मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात. पण, डार्क चॉकलेटमधील उच्च कोको कन्टेन्ट (७० टक्के किंवा त्याहून अधिक) आणि कमी जोडलेल्या साखरेसह डार्क चॉकलेट निवडणे महत्त्वाचे आहे; जेणेकरून त्याचे आरोग्यदायी फायदे वाढतील.
डॉक्टरांच्या मते, डार्क चॉकलेटचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामध्ये सुधारित हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य समाविष्ट आहे. कारण- त्यात अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत, ते मेंदूचे कार्य सुरळीत करते. त्यामुळे मेंदूमध्ये रक्तप्रवाह वाढतो. त्याचबरोबर डार्क चॉकलेट खराब कोलेस्ट्रॉल, रक्तदाब कमी करतात व हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. त्याव्यतिरिक्त डार्क चॉकलेट इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास, मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
डार्क चॉकलेट रोज खाल्ल्याने आरोग्याला धोका उद्भवतो का? (Dark Chocolate)
डार्क चॉकलेटचे रोज सेवन कमी प्रमाणात न केल्यास आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. डार्क चॉकलेटमधील कॅलरीज, चरबीयुक्त कन्टेन्टमुळे त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे काही व्यक्तींमध्ये पोट फुगणे, बद्धकोष्ठता यांसारख्या गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्यादेखील उद्भवू शकतात. डार्क चॉकलेटमध्ये कॅफिन असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास झोपेचा त्रास, अस्वस्थता निर्माण होऊ शकते, असे डॉक्टर म्हणतात.
डार्क चॉकलेटचे किती सेवन करावे? (Dark Chocolate)
डॉक्टरांच्या मते, दररोज १ ते २ औंस (ounces- म्हणजे ३० ते ६० ग्रॅम) तुम्ही डार्क चॉकलेटचे सेवन करू शकता. हे प्रमाण तुम्हाला अतिरेक न करता, आरोग्यदायी लाभांचा आनंद घेण्यास मदत करील. संतुलित आहाराचा भाग म्हणून इतर पौष्टिक पदार्थांसह आणि निरोगी मर्यादेत एकंदर कॅलरीजचे सेवन राखणे सुनिश्चित करते.