तुम्हाला तयार झालेल्या अन्नपदार्थावर, आणखी थोड्या चवीसाठी मीठ भुरभुरवण्याची सवय आहे का? जर असेल तर सावध राहा. कारण या लहानश्या वाटणाऱ्या सवयीने तुम्ही टाईप-२ च्या मधुमेहाला स्वतःहून आमंत्रण देत आहात, असं अभ्यास आणि संशोधन सांगत आहे. केवळ साखरच नव्हे, तर मीठदेखील तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवण्यास मदत करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण जे मीठ खातो, त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे सोडियम क्लोराईड हे खनिज असून, शरीरातील द्रवाचे, मसल्सचे आणि हृदयाचे कार्य संतुलित ठेवण्याचे काम करत असते. पण, यासोबतच जर मिठाचा अतिवापर केला, तर उच्च रक्तदाब आणि हृदयविकरासारख्या समस्या उद्भवू शकतात.

आता नवीन माहितीनुसार मिठाच्या अति वापरामुळे टाईप-२ च्या मधुमेहाचा धोका उद्भवू शकतो, असे समोर आले आहे. एजिलस डायग्नॉस्टिक्सचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक [president and mentor, Agilus Diagnostics] डॉक्टर अविनाश फडके, ‘इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम’सोबत बोलताना म्हणतात की, मिठाचा सतत वापर केल्यास शरीर अधिक प्रमाणात पाणी धरून ठेवतं, ज्याचा परिणाम मूत्रपिंड आणि हृदयावर होतो. हा त्रास मधुमेहींना होत असल्याने त्यांना मधुमेह नियंत्रणात ठेवणं अवघड होतं.

हेही वाचा : दिवाळीसाठी २० मिनिटांत बनवा खास चॉकलेट पिस्ता बर्फी; पहा काय आहे प्रमाण

असंच गुरुग्राममधील आर्टेमिस हॉस्पिटलमधील एंडोक्राइनोलीजीचे चीफ, [chief- endocrinology, Artemis Hospital, Gurugram] डॉक्टर धीरज कपूर यांचंदेखील म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोडियमच्या अति सेवनाने, रेनिन-एंजिओटेन्सिन-अल्डोस्टेरॉन [renin-angiotensin-aldosterone system] प्रणाली कार्यरत होते, ज्यामुळे जळजळ, ऑक्सिडेटिव्ह ताण [oxidative stress] यांसारख्या समस्या उद्भवतात, ज्यामुळे मधुमेहाचा धोकादेखील वाढतो. “यासोबतच जेव्हा सोडियमचे जास्त प्रमाणात सेवन होते तेव्हा प्रक्रिया केलेले पदार्थ व कॅलरीजचे अतिसेवन या सर्व गोष्टी एकाच वेळी घडत असतात. त्यामुळे या सर्व पदार्थांचे सेवन एकत्रितपणे होत असल्याने जाडी वाढणे, स्थूलता येणे यांसारख्या समस्या निर्माण होऊन आपोआप मधुमेह होण्याचा धोका वाढत असतो”, असंदेखील ते म्हणतात.

अमेरिकेच्या मधुमेह असोसिएशननुसार ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी आहारात सोडियमचे प्रमाण कमी ठेवावे. “दिवसाला २३०० मिलिग्रॅम, म्हणजेच एक लहान चमचा इतकेच मीठ आपल्या आहारात घ्यावे”, असं नोएडामधील फोर्टिस हॉस्पिटलचे एंडोक्राइनॉलॉजीचे सल्लागार, [consultant – endocrinology, Fortis Hospital, Noida] डॉक्टर राकेश कुमार प्रसाद सांगतात. त्याचसोबत मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना मधुमेहासोबत जर उच्च रक्तदाब किंवा किडनीच्या समस्या असतील, तर मिठाचा वापर कमी करावा.

टुलाने विद्यापीठाने केलेल्या आणि मायो क्लिनिकने प्रसिद्ध केलेल्या नवीन अभ्यासानुसार ते वरील गोष्टीशी सहमती दर्शवतात. या विषयाबद्दल समजण्यासाठी अकरा ते बारा वर्षांमध्ये, युके बायो बँकमध्ये चार लाखांहून अधिक तरुणांवर अभ्यास केल्यानंतर निकाल काहीसा असा समोर आला होता. ज्या व्यक्ती, ‘कधीतरी गरज वाटल्यास आणि नेहमीच’ मीठ वरून टाकून खातात त्यांच्यामध्ये, ज्या व्यक्ती ‘केव्हातरी किंवा कधीच वरून मीठ न लावता पदार्थ खाणाऱ्यांच्या तुलनेत टाईप-२ मधुमेह होण्याची शक्यता अनुक्रमे १३ टक्के, २० टक्के ३९ टक्के अशी आहे.

अभ्यासातून निघालेल्या निष्कर्षाला समजावत, प्रमुख लेखक आणि टुलेन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि ट्रॉपिकल मेडिसिनचे अध्यक्ष, [Dr Lu Qi, lead author and chair at Tulane University School of Public Health and Tropical Medicine] डॉक्टर लू क्यूई म्हणतात की, पहिल्यांदाच आपल्या जेवणाच्या टेबलवर असलेल्या मिठाचा डबा बाजूला ठेवल्यास, टाईप-२ मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी त्याची मदत होऊ शकते हे समोर आले आहे.

मिठाच्या अति वापरामुळे टाईप-२ चा मधुमेह होत असल्याचं समोर आलं असेल तरीही या गोष्टीवर अजून जास्त अभ्यास होणं गरजेचं आहे, असं डॉक्टर क्यूई म्हणतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, मिठामुळे व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त अन्न ग्रहण करते; परिणामी व्यक्ती लठ्ठ, स्थूल होण्याचे प्रमाण वाढते.

संशोधनामधून, साध्या मिठाच्या वापरामुळे वाढलेला बॉडी मास इंडेक्स [बीएमआय] आणि कंबर व हिपच्या आकारातही वाढ झाल्याचं समोर येतं.

हेही वाचा : दिवाळीत बनवा हटक्या चवीचे शंकरपाळे; मैद्याऐवजी हा पदार्थ वापरून बनवा कुरकुरीत; घ्या रेसिपी….

दरम्यान, डॉक्टर फडके यांच्या मते जे मधुमेह नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी मिठाचा अतिवापर जास्त धोक्याचा असू शकतो.

याची काय कारणं असू शकतात पाहा :

१. उच्च रक्तदाबाची वाढणारी पातळी :

मिठाच्या जास्त वापरामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाणदेखील वाढत असते. ज्यांना मधुमेहाच त्रास आहे, त्यांना मधुमेहासोबत उच्च रक्तदाबाचा त्रासदेखील असू शकतो. तुमच्यात उच्च रक्तदाबाची समस्या आधीपासून असल्यास मिठाचा अतिवापर मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास अडथळा निर्माण करतो.

२. हृदयावर येणार ताण :

शरीरात सोडियमचे प्रमाण वाढताच रक्ताच्या प्रमाणातदेखील वाढ होते, याचा परिणाम थेट हृदय व रक्तवाहिन्यांवर होतो. या गोष्टीचा सर्वाधिक धोका मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना असतो, कारण मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराची समस्या उद्भवण्याची सर्वात जास्त शक्यता असते.

३. मूत्रपिंडावर होणार परिणाम :

मिठाच्या अति सेवनाने किडनीवर विपरीत परिणाम होऊन त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते, ज्यामुळे तुमची किडनी खराब होऊन याचा परिणाम मूत्रपिंडावर होऊ शकतो.

४. वजन आणि पचनावरील नियंत्रण

मिठाचा जरी शरीरातील ग्लुकोजवर थेट परिणाम होत नसला, तरीही ज्या आहारात मिठाचा अधिक वापर होतो, त्या आहारामधून कॅलरीजचे जास्त प्रमाणात सेवन होते. ज्यामुळे तुमच्या वजनात वाढ होऊन त्याचा नकळत परिणाम शरीरातील साखरेच्या पातळीवर होत असतो.

दरम्यान बरेच डॉक्टर आहारातील सोडियमचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला देत असतांना, यासोबतच इतर काही महत्वाच्या गोष्टींकडे देखील लक्ष दिले पाहिजे, असं डॉक्टर फडके सांगतात.

कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे?

लोकांना जागृत करणे :

आजार असणाऱ्या व्यक्तींना मिठाच्या अति सेवनाचे दुष्परिणाम सांगितले पाहिजेत. याचप्रमाणे कोणत्या पदार्थांमध्ये सोडियम अधिक प्रमाणात दडलेलं आहे, याबद्दलदेखील त्यांना जागरूक करून त्यावर नियंत्रण केल्याने होणारे फायदे सांगायला हवेत.

आहारात आवश्यक बदल :

आहारामध्ये प्रक्रिया न केलेले पदार्थ, ताज्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. ज्यामध्ये नैसर्गिकरित्या सोडियमचे प्रमाण कमी असते, असे पदार्थ खाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. पदार्थांना मिठाव्यतिरिक्त इतर व्यंजनांनी चव आणल्यास उच्च रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

खरेदी करताना विचार करून वस्तू घ्याव्या :

एखाद्या वस्तूच्या खोक्यावर काय लिहिले आहे ते समजून घेतले पाहिजे. ज्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असेल, असे पदार्थ शोधावे. यासाठी थोडं मार्गदर्शन करावे.

घरगुती अन्नपदार्थ :

अन्न घरी शिजवून खाल्ल्याने त्यात मिठाचे प्रमाण किती हवे हे आपल्या हातात असते.

हवाबंद डब्यातील पदार्थ :

ज्या खोक्यांवर ‘नो सॉल्ट ॲडेड’ म्हणजेच, ज्या पदार्थांमध्ये मिठाचा समावेश नसेल, असे पदार्थ घेण्याचा प्रयत्न करावा. तसे करता आले नाही, तर बंद बाटलीतील पदार्थ पाण्याने एकदा धुवून घेतल्यास त्यातील सोडियम निघून जाण्यास मदत होईल.

त्यामुळे यापुढे केव्हाही अन्नपदार्थांवर वरून मीठ घालायचा विचार आला, तर चवीसोबत शरीरातील साखरेचे प्रमाणदेखील वाढेल एवढं लक्षात ठेवा व काळजी घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating extra amount of salt can cause type 2 diabetes dha
Show comments