Uric Acid: युरिक ऍसिडच्या रुग्णांना थंडीत अधिक त्रास जाणवतो. याचे मुख्य कारण म्हणजे थंडीत अगोदरच वातावरणात गारवा असल्याने पाणी कमी प्यायले जाते. परिणामी किडनीला शरीरातील फेकून द्यायचे पदार्थ बाहेर टाकता येत नाही. म्हणूनच अनेकांना याच दिवसांमध्ये बद्धकोष्ठचा त्रास सुद्धा जाणवतो. अशावेळी नीट लक्ष न दिल्यास युरिक ऍसिडचे शरीरातील प्रमाण वाढून किडनी निकामी होण्याचा धोका असतो. जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा युरिक ऍसिड शरीरात खड्यांसारखे जमा होऊ लागते. यामुळे सांधेदुखी, पायाला सूज, पोटाचे, हृदयाचे विकार असे त्रास उद्भवू शकतात. युरिक ऍसिड वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे आपला आहार.
थंडीच्या दिवसात आता बाजारात छान हिरवेगार मटार आले आहेत. पावभाजीचा बेत आखण्यासाठी हा थंडीचा महिना सर्वात बेस्ट मानला जातो. इतरही वेळेस मटार पुलाव, मटार पनीर, मटारची कचोरी असे पदार्थ घरोघरी केले जातात. मात्र हे मटार तुमच्या किडनीवर काय परिणाम करता हे माहीत आहे का? युरिक ऍसिडचा त्रास असल्यास आपण मटार खावे का याच प्रश्नावर आज तज्ज्ञांचा सल्ला जाणून घेऊयात..
युरिक ऍसिडचा त्रास असल्यास मटार खावे का?
मटार हे ओले असतील तर ते थंडीच्या दिवसात आणि सुकवलेल्या हिरव्या वाटाण्याच्या रूपात म्हणजेच कडधान्य म्हणून वर्षभर खाल्ले जाऊ शकतात. मटारमध्ये प्युरीनचे प्रमाण अधिक असते. मात्र युरिक ऍसिडच्या रुग्णांना शक्य तितकं कमीत कमी प्युरीन शरीरात जाण्याची काळजी घ्यायची असते. मटारच्या रूपात जर अतिरिक्त प्युरीन आपल्या शरीरात गेले तर यामुळे पुन्हा सांधेदुखी, सूज असे त्रास जाणवू शकतात.
आहारतज्ज्ञांच्या माहितीनुसार, १०० ग्रॅम मॅटरमध्ये जवळपास २१ मिलिग्रॅम प्युरीन असते. यामध्ये अन्य प्रोटॉनचे प्रमाणही मुबलक (प्रति १०० ग्रॅमला ७.२ मिलिग्रॅम) असते. त्यामुळे अगदीच मटार वर्ज्य करण्याची गरज नाही पण एका दिवसात ५० ग्रॅम पर्यंत मटारचे सेवन मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करावा.
युरिक ऍसिडची लक्षणे
शरीरात युरिक ऍसिड वाढल्याने सांधे दुखीचा त्रास सुरु होतो, विशेषतः उठताना बसताना या व्यक्तींना सतत आधार घ्यावा लागतो व तरीही वेदना कमी होत नाहीत. बोटांना सूज येणे, गाठ झाल्याचे वाटणे, हातापायाच्या बोटांमध्ये सतत काहीतरी टोचतंय असं वाटणे ही सर्व युरिक ऍसिड वाढल्याची लक्षणे आहेत. तुम्हालाही सतत थकवा जाणवत असल्यास युरिक ऍसिडचे प्रमाण वाढणे हे मुख्य कारण असू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)