वैद्य अश्विन सावंत
मागील काही वर्षांमध्ये समाजात एक अनिष्ट प्रथा पडली आहे, ती म्हणजे भर हिवाळ्यात आईस्क्रीम खाण्याची. मुळात आइस्क्रीम हा बर्फासारखा थंडगार पदार्थ, जो पूर्वापार खाल्ला जात आहे. उन्हाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खाण्याची मजा काही औरच! आईस्क्रीमचा गारेगार स्पर्श, स्वादिष्ट चव शरीराला असा काही असीम आनंद देते की उन्हाळा सुसह्य होतो. पण हिवाळ्यात आईस्क्रीम का?
याची सुरुवात झाली तीन-चार दशकांपूर्वी, जेव्हा आईस्क्रीम खाण्याची पद्धत होती ती फक्त उन्हाळ्यात. लोक उन्हाळा आला की आईस्क्रीम खायचे आणि थंडाव्याचा आनंद घ्यायचे. पण लोक जर वर्षातून फक्त उन्हाळ्यात आईस्क्रीम खात असतील तर आईस्क्रीम उत्पादकांचे कसे चालणार? त्यांचा व्यवसाय कसा बहरणार? नफा कसा वाढणार? यावर जालिम उपाय त्यांनी शोधला तो म्हणजे लोकांना वर्षाचे बारा महिने आईस्क्रीम खाण्याची चटक लावायची? पण हिवाळ्यात लोक कसे आईस्क्रीम खाणार? त्यासाठी मदतीला आल्या दूरदर्शनवरील जाहिराती? कारण १९८०-९० च्या आसपास दूरदर्शनवरच्या जाहिराती समाजाला जीवनात कसं जगावं, काय खावं, काय करावं याचं मार्गदर्शन करु लागल्या होत्या.
हेही वाचा >>>रोज एक वाफवलेला आवळा खाल्ल्याने वजन कमी होते? मधुमेही व्यक्तीने आवळा का खाल्ला पाहिजे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
जाहिरातींवरच लोकांचे मेंदू, विचार पोसले जात होते आणि त्या विचारांवर लोकांचे आचारण ठरत होते. कसे जगायचे, शरीराची निगा कशी घ्यायची, काय खायचे, काय प्यायचे यांचे निर्णय लोक घेत होते जाहिरातींच्या मार्गादर्शनाने, जे आजतागायत सुरु आहे. तर त्याच जाहिरातींना बळी पडल्याने लोकांना भर हिवाळ्यात गारेगार आईस्क्रीम खाण्याची सवय लागली, खरं तर योजनाबद्ध पद्धतीने ही सवय लावण्यात आली आणि आता हिवाळ्यातसुद्धा लोक सर्रास आईस्क्रीम खाऊ लागले आहेत.
वास्तवात हेमंत-शिशिर या थंड ऋतूंमध्ये शरीरामध्ये शीतत्व वाढवणारा थंड गुणांचा आहार हा कालविरुद्ध आहे आणि अर्थातच आरोग्यास हानीकारक आहे, हे आयुर्वेदाने सांगितले आहेच. (चरकसंहिता१.२६.८९)
’हिवाळ्यात अहिम भोजन योग्य’, म्हणजे नेमकं काय? (सुश्रुतसंहिता ६.६४.२४)
हेही वाचा >>>Health Special : रिहॅबिलिटेशन रुग्णांसाठी का महत्त्वाचं?
सुश्रुतसंहितेने हेमंत ऋतूमध्ये अहिम भोजन योग्य असा सला दिलेला आहे, तर त्याविषयी समजून घेऊ. हिम म्हणजे थंड आणि अहिम म्हणजे थंड नसलेले, तर हिवाळ्यात थंड नसलेले असे भोजन घ्यावे. याचा अर्थ हिवाळ्यात शरीरामध्ये गारवा वाढलेला असताना गरम अन्नपदार्थांचे सेवन करावे हा तर आहेच अर्थात जेवताना अन्न गरम असावे असा होतोच. त्याशिवाय या दिवसांत कदापि थंड आहार सेवन करु नये हासुद्धा अर्थ होतो.
थंड झालेल्या भोजनामुळे शरीरामध्ये गारवा वाढण्याची शक्यता आणि महत्त्वाचं म्हणजे थंड भोजन पचायला कठीण असल्याने हा सल्ला दिलेला आहे. सर्वसाधारणतः जठराचे तापमान ९९.६ अंश फॅरनहाईट फॅरनहाईट इतके असते, जे थंड आहार घेतल्यावर घटते. ज्यामुळे अन्नाचे घुसळण, सूक्ष्म कणांमध्ये रुपांतर, त्यावर पाचक स्त्रावांची प्रक्रिया या सर्व क्रिया बिघडतात, अन्नाचे व्यवस्थित पचन होऊ शकत नाही आणि अन्नाचे व्यवस्थित पचन नाही म्हणजे अस्वास्थ्याची आणि विविध रोगांची सुरुवात हे तर सरळ गणित आहे.
इथे हिवाळा असतानाही थंड आईस्क्रीम खाणार्या, चील्ड बीअर पिणार्या, शीतपेये वा थंडगार पाणी पिणार्या मंडळींनी त्या गार अन्नपदार्थांमुळे स्वास्थ्यावर किती विपरित परिणाम होत असेल याचा विचार करावा.