Can Eating Late Cause Weight Gain: कितीही ठरवलं तरी आयत्या वेळी येणारी मीटिंग, काम, किंवा अगदी मित्र- मैत्रिणींचे प्लॅन कशा ना कशामुळे रोज रात्रीच्या जेवणासाठी तुम्हालाही उशीर होत आहे का? रोज रात्री जेवल्यावर, “अरे यार आज पण उशिरा जेवलोय, आता काही जेवण पचणार नाही आणि मग परत वजन वाढणार” असा विचार तुमचंही मन खातोय का? तर आजचा हा लेख तुमच्या मनातील अनेक शंका- कुशंका सोडवण्यासाठीच घेऊन आलो आहोत. मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील पोषणतज्ज्ञ पूजा उदेशी, यांनी इंडियन एक्सस्प्रेससाठी लिहिलेल्या लेखात आपल्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. समजा आपलं काम उशिरा संपलं तरी आहाराच्या वेळा व त्यामुळे वजनावर होणारा प्रभाव कसा नियंत्रणात ठेवावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया..

पोषणतज्ज्ञ पूजा सांगतात की, कॅलरी ही शेवटी कॅलरी आहे. ती कधी तुमच्या शरीरात पोहोचते यापेक्षा ती बर्न केली जात आहे की नाही हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. याला अनेक तज्ज्ञ ‘इन/कॅलरी आउट ऑफ वजन’ या सिद्धांताने ओळखतात. त्यामुळे कधी खाताय यापेक्षा तुम्ही काय व किती खात आहात हे पाहणेही महत्त्वाचे आहे. आतापर्यंत, असे कोणतेही मानवी अभ्यास नाहीत जे स्पष्टपणे सांगतात की रात्री खाल्लेल्या कॅलरीमुळे दिवसा लवकर खाल्लेल्या कॅलरीपेक्षा वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.

उशिरा जेवायचे असल्यास ‘या’ गोष्टींचे राखा भान

उशिरा खाणे आणि वजन वाढणे यातील एक संबंध म्हणजे रात्री उशिरा खाणाऱ्यांची एकूणच जास्त प्रमाणात कॅलरी शरीरात ढकलण्याची प्रवृत्ती असते. साहजिकच यामुळे वजन वाढू शकते. तसेच एक लक्षात घ्यायला हवं की, दिवसा उशिरा शरीरात पोहोचणाऱ्या अधिक प्रमाणातील कॅलरी झोपेच्या, पचनाच्या व पुन्हा जागे होण्याच्या सर्कॅडियन लयीच्या विरुद्ध असतात. तुमचा मेटाबॉलिक रेट दिवसाच्या उत्तरार्धात मंदावतो. म्हणजेच तुमचे शरीर कमी चरबी जाळू शकते. त्यामुळे जेव्हा अन्य जबाबदाऱ्यांमुळे दिवसाच्या पूर्वार्धात खाणे शक्य नसेल तर निदान कॅलरीजचे प्रमाण कमी ठेवून प्रथिनेयुक्त पदार्थाचे सेवन वाढवायला हवे. रात्री किंवा संध्याकाळी उशिरा तुम्ही जे खात आहात ते तुमच्या दैनंदिन कॅलरीच्या प्रमाणात भार ठरत नसल्यास आणि व्यायाम व झोपेचे संतुलन राखल्यास वजन वाढण्याची शक्यता नगण्य असते.

उशिरा जेवत असताना तुमचा मूडही ठरवतो पचनाची क्रिया

रात्री उशिरा जेवताना, लोक सहसा चिप्स, सोडा आणि आइस्क्रीम सारख्या कॅलरी-युक्त पदार्थांचे सेवन करतात. तणाव, चिंता, कंटाळा किंवा दुःख यामुळे रात्रीच्या वेळी अतिखाण्याची सुद्धा शक्यता असते. एकतर अतिसेवन व त्यात या मूड स्विंगमुळे हार्मोन्समध्ये होणारे बदल हे पुढे झोपेत व पचनात अडथळा आणतात आणि एकूणच दुसऱ्या दिवशीही आपला मूड खराबच होतो, त्यामुळे तुमच्या जेवणाचे नियोजन करताना आपण काय खातोय या घटकाचा सर्वाधिक विचार करायला हवा.

लवकर जेवल्याने समजा रात्री पुन्हा भूक लागलीच तर..

दरम्यान, काहींना सतत काही ना काही खाण्याची सवय असल्याने दिवसाच्या पूर्वार्धात जेवूनही रात्रीच्या वेळी भूक लागू शकते. अशा स्थितीत तुमची भूक नियंत्रित करण्याचे अनेक मार्ग आहेत. उदाहरणार्थ, संध्याकाळच्या वेळी उच्च-कॅलरी युक्त जेवण केल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटू शकते आणि रात्री उशिरा खाणे टाळता येते, या जेवणाच्या व झोपेच्या वेळेत अंतर असल्याने त्या कालावधी होणारी हालचाल या अन्नाच्या पचनासाठी सुद्धा पुरेसा वेळ देऊ शकते.. आणखी एक मार्ग म्हणजे दिवसभरात आपण वारंवार थोडे थोडे खाऊन आणि रात्री खूप भूक लागण्याचे प्रमाण कमी करू शकता.

हे ही वाचा<< Video: आमटीत गरम दगडाची फोडणी देणं किती फायद्याचं? फोडणीत काय वापरावं, वेळ व खर्चाचं सूत्र पाहा

रात्री उशिरा जेवणाचा रक्तातील साखरेवर होणारा परिणाम

पोषणतज्ज्ञ पूजा उदेशी असेही सांगतात की, संशोधनात असे दिसून आले आहे की संध्याकाळच्या वेळी खाल्लेल्या कार्बोहायड्रेट्समुळे रक्तातील साखरेचे प्रमाण हे जास्त वाढू शकते. याचे कारण असे की झोपेला मदत करणारे हार्मोन मेलाटोनिन रक्तातील ग्लुकोज-नियंत्रित रणारा हार्मोन, इन्सुलिनच्या स्रावात अडथळा आणतो व परिणामी रक्तातील साखरेला बूस्ट मिळतो. यासाठी एक उपाय म्हणजे उशीरा जेवत असल्यास कर्बोदके (कार्ब्स) टाळा. हे सगळं करत असताना तुम्ही उपाशी झोपत नाही याची मात्र खात्री करा.

Story img Loader