Should You Have Papaya With Seeds : कमी बिया असलेला पपई मिळावा यासाठी वाट बघणारे तुमच्या-आमच्यासारखे सामान्य जन; जर आपल्याला कुणी सांगितलं की, तुम्हाला उलट पपई बियांसह खाल्ल्यावरच फायदा होऊ शकतो, तर तुमचा विश्वास बसेल का? आम्हालाही खरं वाटलंच नव्हतं. पण, सोशल मीडियावर मात्र पपईच्या बिया खा, असं ओरडून ओरडून सांगणाऱ्यांची गर्दी वाढली होती. अशा वेळी खरं काय ते समोर आणायचं, असं आम्ही ठरवलं आणि तज्ज्ञांकडून याविषयी माहिती घेतली. याच माहितीच्या आधारे आपण आज पपईच्या बियांचं सेवन करावं का? केल्यास त्यानं फायदा होईल की अपाय हे सगळं जाणून घेऊ…
पपई खाण्याचे फायदे काय?
झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल, मुंबई येथील आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, पपईमध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे व एन्झाइम्स असतात; ज्यामुळे पचनास मदत होते, प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचेचे आरोग्यही सुधारण्यास साह्य मिळते. त्याशिवाय पपईमध्ये अ व क ही जीवनसत्त्वे आणि फोलेटसारखे पोषक घटकदेखील असतात. पपईमधील प्रथिने पचनास मदत करतात आणि शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी फायदेशीर म्हणूनही ओळखली जातात. पटेल यांनी असंही म्हटलं की, जर डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणात आपण पपईचे नियमित सेवन केले, तर डोळ्यांच्या आरोग्यापासून ते कर्करोगाचा धोका कमी करण्यापर्यंत बहुढंगी फायदे मिळू शकतात.
पपईच्या बिया खाव्यात का?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सर्व दाव्यांविरुद्ध माहिती आहारतज्ज्ञ पटेल यांनी आम्हाला दिली. त्या म्हणतात की, पपईच्या बिया खाल्ल्यानं पचनास त्रास होऊ शकतो. त्याशिवाय ओटीपोटात दुखणे, त्रास होणे, पोटात गोळा येणे अशी लक्षणेसुद्धा दिसून येऊ शकतात. त्यामुळे बियांशिवाय पपई खाणं हे सर्वोत्तम म्हणता येईल.
मात्र, दुसरीकडे मदर्स लॅप आयव्हीएफ सेंटर नवी दिल्ली आणि वृंदावन येथील IVF स्पेशलिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शोभा गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पपईच्या बिया खाण्याचे काही फायदे आहेत. विशेषतः महिलांसाठी याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, असे म्हणता येईल. पपईच्या बियांमध्ये एन्झाइम्स, अँटिऑक्सिडंट्स व आरोग्यदायी चरबी हे शरीरास आवश्यक घटक असतात. त्यामुळे यकृताचे कार्य सुधारू शकते. तसेच यातील दाहविरोधी (अँटी इन्फ्लेमेंटरी) गुणधर्म शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतात.
दरम्यान, इथे डॉ. गुप्ता यांनी असंही सांगितलं की, हे सर्व परिणाम हे व्यक्तिसापेक्ष बदलू शकतात. त्यामुळे कुणाला फायदा झाला म्हणून प्रत्येकाला तो होईलच, असं नाही. त्याशिवाय समजा जरी तुम्ही पपईच्या बियांचं सेवन करणार असाल तरी तुम्ही अतिसेवन तर करूच नये; अन्यथा त्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते. पपईच्या बियांचे प्रमाणाबाहेर सेवन केल्यामुळे पोटात विषारी द्रवसुद्धा निर्माण होऊ शकतो.
या सगळ्या माहितीतून निष्कर्ष काढायचा झाल्यास, पिकलेली पपई मासिक पाळीचे नियमन करण्यास मदत करू शकते; पण कच्ची पपई गर्भधारणेदरम्यान टाळली पाहिजे. कारण- त्यातील लेटेक्स गर्भाशय आकुंचित होण्याचा धोका वाढवू शकते, ज्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्याशिवाय गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या किंवा गर्भवती असलेल्या महिलांनी पपईच्या बिया टाळणेच योग्य आहे.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे व तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. आपल्यासाठी योग्य काय हे जाणून घ्यायचे असल्यास आपल्या आरोग्य स्थितीशी परिचित असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरेल.)