How Sugar Can Harm Liver: साखर खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो याविषयी आजवर अनेक संशोधने झाली आहेत. साखरेचे अतिसेवन हे हृदयविकाराचे सुद्धा कारण ठरू शकते असेही यापूर्वी अभ्यासकांनी अधोरेखित केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का, साखरेचे सेवन तुमच्या लिव्हरचे आरोग्य सुद्धा प्रभावित करू शकते. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात पचनाच्या प्रणाली आहेत ज्या प्रथिने, स्टार्च आणि फॅट्सला ऊर्जेत बदलण्याचे काम करतात. यातून काही वेळा प्रथिने फॅट्स किंवा स्टार्चमध्ये बदलू शकतात. आपल्या जेवणातील अतिरिक्त पोषक सत्व सुद्धा काही वेळा चरबीच्या स्वरूपात साठवली जातात. हेपॅटोलॉजिस्ट सल्लागार डॉ हरीकुमार नायर यांनी जागतिक यकृत दिनाच्या निमित्ताने इंडियन एक्सस्प्रेससाठी लिहिलेल्या लेखात साखरेचा यकृतावर होणारा परिणाम सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. नायर सांगतात की, “साखर आणि इतर गोडाच्या पदार्थांमध्ये मुख्यतः स्टार्च (कार्बोहायड्रेट) असतात जे शरीराद्वारे ग्लूकोजमध्ये रूपांतरित केले जातात. जे लोक शारीरिक व्यायाम करत नाहीत आणि बैठी जीवनशैली जगतात, त्यांच्यात हेच स्टार्च फॅट्समध्ये बदलण्याचे प्रमाण जास्त असते. साखरेच्या अतिसेवनामुळे वजन वाढू शकते आणि लठ्ठपणा येऊ शकतो, ज्याचा यकृतासारख्या अंतर्गत अवयवांवरही परिणाम होऊ शकतो. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होण्यामागे सुद्धा हे कारण ठरू शकते.”

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फॅटी लिव्हरसारखा आजार होण्यासाठी हे गरजेचे नाही की तुम्ही फक्त स्निग्ध पदार्थांचे सेवन करत आहात. काही वेळा खूप जास्त कार्ब्सयुक्त गोडाचे सेवन हे नुकसानदायक असू शकते. अलीकडील काळात भारतीयांमध्ये ही समस्या खूप वाढली आहे.

साखरेचे सेवन नुकसानदायक असूनही का करावेसे वाटते?

साखरेचे सेवन शरीरात डोपामाइन सोडण्यास चालना देते, जे एक “फील-गुड” हार्मोन आहे. त्यामुळे, तणाव किंवा नैराश्याने त्रस्त लोकांना डोपामाइन वाढीसाठी गोड खाण्याची इच्छा होऊ शकते. हे शर्करायुक्त अन्न शरीरात चरबीच्या रूपात साठवले जाते जे यकृताला हानी पोहोचवते. फॅटी लिव्हरसारख्या आजारामुळे त्वचेचे विकार जसे की सोरायसिस किंवा कर्करोगासारखे दुर्धर आजार सुद्धा होऊ शकतो. आहारातील अति गोड पदार्थांमुळे आतड्यातील जीवाणूंवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. हे जीवाणू आतड्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. आतड्यांच्या आरोग्यात बिघाड आल्यास शरीरात फ्री रॅडिकल्सचा संचार वाढतो जो यकृताच्या कर्करोगाचे कारण ठरू शकतो.

फळांमुळे फॅटी लिव्हरचा विकार होऊ शकतो का?

फळांमध्ये साखरेचे रेणू फ्रुक्टोजच्या स्वरूपात असतात. अर्थात प्रत्येक फळातील फ्रुक्टोजचे प्रमाण वेगळे असते, द्राक्षे, संत्री, टरबूज इत्यादी रसाळ फळांमध्ये फ्रुक्टोज जास्त असते; तर पेरू, सफरचंद, किवी यांसारख्या फळांमध्ये फ्रुक्टोज कमी असते. सामान्यतः फळे ही चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक मानली जातात पण त्यांच्या अतिसेवनामुळे यकृतातील फ्रुक्टोजचे फॅट्समध्ये रूपांतर होते, ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते. याशिवाय बाजारात विकल्या जाणाऱ्या खालील हवाबंद डब्यांमध्ये सुद्धा साखर मिसळलेली असते.

  1. केचप/ टोमॅटो सॉस
  2. दही
  3. तृणधान्ये
  4. ओट्स
  5. चॉकलेट पावडरसारखी पेयं (बूस्ट, बोर्विटा, हॉर्लिक्स)
  6. पीनट बटर
  7. ब्रेड (मिल्क किंवा फ्रुट ब्रेड)
  8. बिस्किट

‘साखरेचा कर’ महत्त्वाचा का आहे?

२०१६ मध्ये ‘साखरेचा कर’ लागू करणारा यूके हा जगातील पहिला देश होता. पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन साखरेवर कर लागू करण्यात आला होता. २०१६ पासून, इंग्लंडमधील खाद्य उद्योगाने पॅकेज केलेले अन्न तयार करण्याच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल केले करून साखरेचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला होता. भारतातसुद्धा अलीकडेच, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने हेल्थ ड्रिंकच्या श्रेणीतून बोर्नव्हिटा काढून टाकण्याची शिफारस केली होती. हे हेल्थ ड्रिंक नसून यात साखरेचे प्रमाण जास्त असल्याचे यावेळी सांगण्यात आले होते.

हे ही वाचा<< तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?

निरोगी यकृतासाठी साखरेचे सेवन कमी करण्यासह आपण ‘या’ १० गोष्टींकडे लक्ष द्याच

  1. नियमित व्यायाम करा आणि सक्रिय जीवनशैली जगा. नियमित एरोबिक व्यायाम ही फॅटी यकृताचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी पद्धत आहे.
  2. मद्यपान कमी करा. विशेषत: ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल यांसारख्या मेटाबॉलिक सिंड्रोम आहेत त्यांनी मद्यपान करणे धोकादायक ठरू शकते.
  3. संतुलित आहार घ्या: कमी चरबीयुक्त आणि जास्त फायबरयुक्त आहार घ्या. मिठाई आणि लाल मांस टाळावे.
  4. शरीराचे बॉडी मास इंडेक्स नियंत्रणात ठेवा. आदर्श BMI राखल्यास यकृताच्या रोगाचा धोका कमी होतो.
  5. हर्बल सप्लिमेंट्स घेणे टाळा.
  6. हिपॅटायटीस बी प्रतिबंधक लसीकरण करून घ्या
  7. HBV आणि HCV यासारख्या विषाणूंमुळे यकृत सोरायसिस आणि यकृत कर्करोग होऊ शकतात हे विषाणू रक्त व वीर्यातून पसरू शकतात त्यामुळे सुरक्षित शरीरसंबंध ठेवावे.
  8. ४० व्या वर्षापासून यकृताच्या आजाराची तपासणी.
  9. वजन कमी करण्याच्या गोळ्या आणि सोशल मीडियावर प्रचार केलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणे टाळा.
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating sugar fruits ketchup effect on liver can white sugar cause liver cancer skin disease why tax in sugar is important doctor explains svs