Weight Loss After Diwali : दिवाळी हा गोडधोड पदार्थांचा सण असतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक जण कोणताही विचार न करता, तेलकट किंवा गोड पदार्थ बिनधास्त खाताना दिसतात. पण, दिवाळीनंतर मात्र हेच लोक वजन वाढल्यामुळे चिंताग्रस्त होतात. दिवाळीनंतर वाढलेले वजन कसे कमी करावे, याविषयी आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर माहिती सांगितली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सणासुदीच्या काळात खरोखरच वजन वाढते का?

आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत सांगतात, “दररोज अतिरेकी प्रमाणात गोड पदार्थ खाल्ले, तर वजन नक्की वाढू शकतं. तेलकट पदार्थदेखील जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढतं. दिवाळीनंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मुळात ते कशामुळे वाढलं हे समजून घेणं गरजेचं आहे.जर फक्त फराळ खाण्यामुळे आणि अतिरिक्त खाण्यामुळे वजन वाढलं असेल, तर पुन्हा योग्य प्रमाणात जितका आवश्यक आहे तितका आहार घेण्यास सुरुवात करावी.”

दिवाळीनंतर वजन कसे कमी करावे? व्यायाम आणि आहार किती फायदेशीर आहेत?

आहारतज्ज्ञ सावंत सांगतात, “आहाराचं नियोजन करताना तुम्ही योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात खाऊ शकता. तुम्हाला या नियेजनाचा नेहमीच फायदा होऊ शकतो. व्यायाम आणि आहार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फक्त डाएट करीन आणि वजन कमी होईल किंवा मी फक्त व्यायाम करेन आणि आहाराकडे लक्ष देणार नाही, असं म्हणूनसुद्धा चालत नाही. दोन्ही गोष्टी एकत्र कराव्या लागतात; पण लक्षात घ्या अतिव्यायाम, खूप जास्त आहार, अतिपथ्य या बाबीही हानिकारक आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी किमान एक तास व्यायाम आणि उत्तम आहार नियोजन या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.”
अनेक जण वजन कमी करण्यासाठी उपाशी राहतात किंवा दिवसातून फक्त एकदाच जेवण करतात; याचा फायदा होतो का?
सावंत पुढे सांगतात, “वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणं कधीही फायदेशीर ठरत नाही. ज्या वेळेला आपण कर्बोदकं, प्रथिनं व स्निग्धांश यांचा विचार करतो. त्यावेळी हे लक्षात ठेवायला पाहिजे की, एकाच वेळी जेवण केल्यामुळे कधी कधी आपल्याला अत्यंत कमी प्रमाणात पोषक घटक मिळू शकतात; त्यामुळे त्याचा फायदा होण्याऐवजी आरोग्याचं नुकसान जास्त होतं.”

हेही वाचा : Piles in Women : महिलांना ‘या’ कारणांमुळे होतो मूळव्याधीचा त्रास? जाणून घ्या लक्षणे अन् उपचार 

गोड खाणे अचानक बंद केल्यानंतर वजन नियंत्रित राहायला मदत होते का?

सावंत म्हणतात, “गोड खाणं अचानक बंद केल्यानंतर नक्की मदत होते. मुळात गोड खाणं म्हणण्यापेक्षा जर तुम्ही पांढरी साखर पूर्णपणे वर्ज्य केलीत, तर तुमच्या शरीरामध्ये फक्त चांगलेच परिणाम दिसून येतील. असं केल्यानं तुमच्या शरीरातील इन्सुलिनची पातळी सुधारते. त्यामुळे वजनदेखील नियंत्रणात राहतं. त्याशिवाय तुमची विचार करण्याची पद्धत सुधारते, दातांचं आरोग्य उत्तम होतं, केस आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं, तुम्हाला व्यायाम करण्याची ऊर्जा मिळते आणि तुम्हाला व्यायाम करावासा वाटतो.”
सावंत पुढे सांगतात, “सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे आता गोड पदार्थांपेक्षा तुम्ही स्निग्ध पदार्थांकडे लक्ष देणं जास्त आवश्यक आहे. गोड खाणं बंद केल्यानंतर दुष्परिणाम अजिबात होत नाहीत. कारण- ज्या वेळेला तुम्ही साखर बंद करता, त्या वेळेला भारतीय आहाराप्रमाणे जर बघायला गेलं तर तुमच्या आहारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कर्बोदकं असतात आणि त्यामुळे त्यातून मिळणारी साखर ही तुमच्या शरीराला पूरक आणि पोषक असते.”

गोड खाण्याची क्रेविंग कशी थांबवावी?

“जर तुम्हाला वारंवार गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर पहिल्यांदा तुमची रक्त तपासणी करून घ्या. तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारच्या न्युट्रियंट्सची कमतरता आहे का, हे जाणून घ्या.
जर तुम्ही कमी कॅलरीज खात असाल, तर त्यामुळेही तुम्हाला सतत गोड खावेसं वाटू शकतं आणि मुख्यत्वे गोड खाल्ल्यानंतर तुमचे हॅपी हार्मोनसुद्धा उत्तेजित होतात. त्यामुळे गोड खाल्ल्यानंतर तुम्हाला तात्पुरतं खूप चांगलं वाटतं,” असे सावंत सांगतात

दिवाळीनंतर वजन वाढल्याचं टेन्शन घेणाऱ्या लोकांना पल्लवी सावंत सांगतात, “पहिली गोष्ट गोड खाण्याच्या बाबतीत तुम्ही मनावर ताबा ठेवणं फार महत्त्वाचं आहे आणि गोड खाण्याचं प्रमाण कमी असणंदेखील तितकंच गरजेचं आहे. दिवाळीनंतर वजन वाढल्याचं टेन्शन घेऊ नका. कारण- एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर हे मान्य केलं की तुमचं वजन वाढलंय, तर तुम्हाला ते वजन कमी करण्यासाठीही तितक्याच तत्परतेनं आणि तितक्याच परिणामकारक पद्धतीनं त्यावर काम करता येऊ शकतं. त्यामुळे टेन्शन घेऊन वजन कमी करू नका. टेन्शनमुळे तुमच्या खाण्यावर परिणाम होऊ देऊ नका. मन आनंदी असेल, तर आनंदानं योग्य प्रमाणात तुम्ही खाऊ शकता.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating sweet and oily food during festival season leads to weight gain read dietitian told how to lose weight gained after diwali ndj