बऱ्याच महिला मासिक पाळीच्या काळात गोड पदार्थ खातात. चॉकलेट्स, केक, पेस्ट्री, क्रीम बिस्किटे यांसारख्या पदार्थांना प्राधान्य देतात. मूड स्विंग्स होऊ नये किंवा एनर्जेटिक वाटावे यासाठी गोड पदार्थांना प्राधान्य देतात. परंतु, मासिक पाळीच्या काळात केवळ गोड पदार्थ खाऊन चालत नाही, योग्य ऊर्जा आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी योग्य राखण्यासाठी पुरेसे प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स पदार्थांचाही आहारात समावेश असणे आवश्यक असते. मासिक पाळीच्या दरम्यान कोणते पदार्थ खावेत, कोणती फळे खावीत, याविषयी आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी काही नियम सांगितले आहेत. ते जाणून घेणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
बऱ्याच महिलांना मासिक पाळीच्या काळात थकवा येतो, सतत मूड बदलत राहतात, याकरिता पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. रक्तातील प्रथिने आणि ग्लुकोज यांचे प्रमाण योग्य राखणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ गोड पदार्थ, डार्क चॉकलेट्स खाऊन चालत नाही.
मासिक पाळीच्या दरम्यान कोणते पदार्थ खावेत?
मासिक पाळीच्या दरम्यान ‘क्रॅम्प्स’ येत असतात, चीडचीड होत असते तेव्हा व्हॅनिला आईस्क्रीम, ब्राऊनी असे पदार्थ परिणामकारक ठरतात. परंतु, हे पदार्थ रक्तातील इन्सुलीच्या पातळीवरही परिणाम करतात. त्यामुळे ज्या महिला मधुमेह, मधुमेहपूर्व अवस्थेत आहे, त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. मासिक पाळीच्या काळात अननसाचे सेवन करावे. अननसामुळे क्रॅम्प्स कमी होतात. टरबूजाच्या सेवनामुळे पोटातील जळजळ कमी होते. आले, बीट, लिंबू-लिंबूपाणी यांचे सेवन करावे. त्यातून ऊर्जा मिळते, तसेच लिंबू पाण्यामुळे मूड बदलणे कमी होते.
हेही वाचा : काय चांगले ? लवकर उठणे की रात्री जागणे; काय सांगतात तज्ज्ञ…
मासिक पाळीच्या दरम्यान गोड पदार्थांचे मर्यादित सेवन करावे
मासिक पाळीच्या काळात अनेकांना गोड पदार्थ खावेसे वाटतात. परंतु, तज्ज्ञांच्या मते, गोड पदार्थांचे सेवन मर्यादित करावेत. “जास्त साखरेमुळे शरीरातील जळजळ वाढू शकते. मासिक पाळीच्या काळात आधीच शरीरातील जळजळ वाढलेली असते. शर्करायुक्त पदार्थ मर्यादित ठेवल्यामुळे शरीरातील जळजळ कमी होऊ शकते,” असे गोयल म्हणतात.
साखर जी ऊर्जा निर्माण करते जी जास्त काळ टिकत नाही आणि साखरेमुळे भुकेवरती परिणाम होतो. भूक मंदावते. त्यामुळे पौष्टिक पदार्थ खाल्ले जात नाहीत. साखर किंवा गोड पदार्थ यांचे मर्यादित सेवन करून आहारात पुरेसे प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स पदार्थ यांचा समावेश करावा.
‘हे’ पदार्थ मासिक पाळीच्या काळात खा
अननस
अननसामुळे पीरियड क्रॅम्प्स कमी होतात. अननसामध्ये नैसर्गिक दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे क्रॅम्प्सची तीव्रता कमी करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, अननसामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात, विशेषत: व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
टरबूज
टरबुजामध्ये पोषक घटक अधिक असतात. तसेच ते अँटिऑक्सिडेंट आहे. टरबुजामुळे शरीरातील जळजळ कमी होते. तसेच ते डीहायड्रेट करते.
आले
आले हा मसाल्यातील एक पदार्थ आहे. अनेक जणी आल्याचा चहा पिण्यास प्राधान्य देतात. आल्यामुळे क्रॅम्प्स कमी होतात. आले हे वेदनाशामक आहे. त्यामुळे जेवणात आल्याचा वापर केल्यास मासिक पाळीच्या काळात वेदना कमी होण्यास मदत होते.
बीटरूट
बीटरूटमध्ये आढळणारे बीटा-कॅरोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स गर्भाशयात ऑक्सिजनयुक्त रक्ताचा प्रवाह वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे जळजळ कमी होते आणि मासिक पाळीच्या क्रॅम्प्सची तीव्रताही कमी होते. बीटरूटमुळे लोहही मिळते. रक्तवाढीसाठी बीटरूट आवश्यक आहे.
लिंबू
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे शरीराचा दाह कमी होतो. ऊर्जा मिळते. रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. पोटातील वेदना कमी होण्यास लिंबू मदत करते. डिहायड्रेशन होण्याची शक्यता या काळात अधिक असते. त्यामुळे लिंबू पाणी, सरबत यांचे सेवन करावे.
डॉ. गोयल यांच्या मते साखर किंवा गोड पदार्थ मर्यादितच खावेत. पौष्टिक पदार्थ, फळे खाण्यास या काळात प्राधान्य द्यावे.