उंच व्यक्तीची नकळतच चांगली छाप पडते, त्यामुळे आपण छान उंच असावे असे प्रत्येकाला वाटते. पण, आपली उंची आपल्या हातात नसून ती पूर्णपणे आपल्या आई-वडिलांच्या उंचीवर अवलंबून असते असा अनेकांचा समज असतो; तर काही प्रयत्न केले तर उंची वाढवता येते असे काही तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी आपला आहार, लाईफस्टाईल, व्यायाम या गोष्टी महत्त्वाच्या असतात. बरेच लोक कमी उंचीमुळे त्रस्त असतात. उंची वाढवण्यासाठी ते विविध औषध उपचार आणि वेगवेगळे उपायदेखील करतात, मात्र उंची वाढत नाही. पौष्टिक आहार न घेतल्यामुळे उंची न वाढण्याची समस्या निर्माण होते. आपल्या शारीरिक विकासासाठी पौष्टिक आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. मात्र, आहारात नियमित अंडी खाल्ल्याने उंची वाढते का? या संदर्भात हैदराबाद येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. भावना पी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
अंड्यांमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात, जे उंची वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंड्यांमध्ये राइबोफ्लेविन, बायोटिन आणि लोह असतात, यामुळे आपली उंची झटपट वाढण्यास मदत होते. डॉ. भावना सांगतात, अंडी उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांचे समृद्ध स्त्रोत आहे, जे स्नायूंच्या विकासासाठी आणि वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन डी सारखी महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजेदेखील असतात, जे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करतात. हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पोषक, पुरेशा प्रमाणात कॅल्शियमचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात, जे उंचीच्या क्षमतेसाठी आवश्यक आहेत.
बऱ्याच लोकांना त्यांच्या दिवसाची सुरुवात करताना नाश्त्याला अंडी लागतात. अंड्यात रिबोफ्लेविन आणि सेलेनियमसारखे आवश्यक पोषक घटक असतात, जे शरीराच्या विविध कार्यांना समर्थन देतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अंड्याचा पांढरा भागदेखील कमी चरबी आणि कोलेस्ट्रॉल मुक्त आहे, ज्यामुळे त्यांचे वजन किंवा कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करू पाहणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे. याव्यतिरिक्त, अंड्यांमधील जीवनसत्त्वे आणि खनिजे, जसे की लोह, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन बी १२ शरीराच्या निरोगी कार्यांना समर्थन देतात, ज्यामुळे वाढीस हातभार लागतो, असे डॉ. भावना म्हणाल्या.
अंडी खाणे आणि उंची वाढणे याचा थेट संबंध नाही.
अपोलो स्पेक्ट्रा येथील मुंबईच्या आहारतज्ज्ञ फौजिया अन्सारी यांनी सांगितले की, अंडी शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, मात्र अंडी खाणे आणि उंची वाढणे याचा थेट संबंध नाही. अंडी किंवा कोणत्याही प्रकारचे अन्न, भाज्या किंवा फळे आपल्याला झटपट उंच करू शकत नाहीत. तुमची उंची आनुवंशिकता, पौष्टिक आहार आणि शारीरिक क्रियाकलाप यावर अवलंबून असते.” डॉ. भावना यांनी अन्सारी यांचे समर्थन केले आणि शेअर केले, “वाढ ही पालकांच्या जनुकांवर आणि गर्भधारणेदरम्यान हाडांच्या आरोग्यासाठी आणि गर्भाच्या वाढीसाठी चांगले पोषण आणि चांगल्या संतुलित पोषणासह शारीरिक हालचालींवर अवलंबून असते.” ठराविक वयानंतर तुमची उंची वाढणे थांबते, कारण उंची वाढण्यास जबाबदार असलेल्या हाडांमधील वाढीच्या प्लेट्स बंद होतात.
हेही वाचा >> जेवणाच्या वेळेवरून ठरते वजनाचे गणित; दुपारचे जेवण कधी करावे, १२, १ की २? जाणून घ्या नाश्ता, लंच आणि डिनरची योग्य वेळ
नियमित व्यायाम केल्यानं उंची वाढू शकते
“लक्षात ठेवा, तुम्ही ऑनलाइन पाहता त्या प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका किंवा तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही ऑनलाइन पाहत असलेले हे हॅक किंवा व्हिडीओ अनेकदा खरे नसतात, ज्यामुळे अनेकांमध्ये आणखी गैरसमज निर्माण होऊ शकतात,” असे अन्सारी म्हणाल्या. त्यामुळे संशोधन असे सूचित करते की सायकलिंग, योगासने आणि स्ट्रेचिंग यांसारख्या शारीरिक क्रियाकलापांमध्ये नियमितपणे व्यस्त राहिल्यास उंची काही इंच वाढण्यास मदत होते.