Viral Video : सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. पुरेसे पाणी पिऊनही शरीराला पाण्याची कमतरता भासते; ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उदभवते. वाढलेल्या तापमानामुळे भरपूर घाम येतो आणि शरीरात द्रवपदार्थ प्रमाणापेक्षा कमी होतात. यालाच डिहायड्रेशन म्हणतात. याविषयी द इंडियन एक्स्प्रेसने सेलिब्रेटी स्पोर्ट्स न्युट्रिशनिस्ट शोना प्रभू यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती दिली. शोना प्रभू सांगतात, “अशा वेळी आपल्या शरीराला ‘इलेक्ट्रोलाइट’ पेयांची आवश्यकता असते. खालील इलेक्ट्रोलाइट पेये आपल्या शरीरास हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात आणि त्यामुळे शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारळाचे पाणी

उन्हाळ्यात नारळाचे पाणी महत्त्वाची भूमिका बजावतात. हे पाणी आपल्या शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम व सोडियम यांसारखे इलेक्ट्रोलाइट्स पुरवतात; ज्यामुळे शरीराला भरपूर पाणी मिळते. कोणत्याही साखरयुक्त पेयांपेक्षा नारळाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक साखर असते; जी आपल्याला त्वरित ऊर्जा देते.

लिंबू पाणी

लिंबू पाणी हे लोकप्रिय पेय आहे. उन्हाळ्यात अनेक जण लिंबाचा रस, पाणी आणि त्यात साखर व मीठ घालून घरगुती पेय बनवतात. हे पेय फक्त तहानच भागवत नाही, तर आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट्सही पुरवते; ज्यामुळे हायड्रेशनची समस्या उदभवत नाही.

ताक

ताक हे दही आणि पाण्यापासून बनविले जाते. त्यात साखर आणि जिरेपूड टाकली की, आणखी चविष्ट वाटते. हे पचनक्रियेसाठी आणि शरीराचे तापमान थंड करण्यासाठी फायदेशीर आहे. घामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात; पण उन्हाळ्यात ताक प्यायल्यामुळे आपल्याला भरपूर इलेक्ट्रोलाइट्स मिळतात.

हेही वाचा : तुमच्या मुलांना कार, बसमधून प्रवास करताना उलट्या होतात का? डाॅक्टरांनी सांगितलेले करा ‘हे’ सोपे उपाय; प्रवास होईल आनंदात

जलजिरा

जलजिरा हे उन्हाळ्यातील एक लोकप्रिय पेय आहे. धणे, जिरे आणि इतर मसाले पाण्यात एकत्रित करून हे पेय बनविले जाते. हे शरीराचे तापमान कमी करते आणि पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर करते. जलजिरा पेय हा शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

या पेयांशिवाय शोना प्रभू यांनी दिवसभर शरीरात पाण्याची मुबलक मात्रा टिकवून ठेवण्यासाठी सांगितलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे :
१. घराबाहेर पडताना पाण्याची बाटली बरोबर घ्या आणि दिवसभर थोडे थोडे पाणी प्या.

२. आपल्या आहारात टरबूज, काकडी व पालक यांसारख्या पाण्याचे प्रमाण अधिक असलेल्या फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

३. साखरयुक्त पेये, कॅफिन व अल्कोहोलचे मर्यादित सेवन करा. कारण- यामुळे लघवीचे प्रमाण वाढू शकते आणि डिहायड्रेशनची समस्या जाणवू शकते.

४. मसालेदार पदार्थांपासून दूर राहा. कारण- यामुळे वारंवार तहान लागते. हे पदार्थ शरीरातील द्रव आणि शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी करू शकतात.

कडाक्याचे उन्हाच पाणी न पिता, खेळाडू खेळत असेल किंव फिटनेसप्रेमी वर्कआउट किंवा व्यायाम करीत असेल, तर डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. शोना प्रभू सांगतात, “वर्कआउट करण्यापूर्वी एक ते दोन ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. वर्कआउटदरम्यानसुद्धा एका ठरावीक वेळेनंतर इलेक्ट्रोलाइट पेय प्यावे. डिहायड्रेशनची कारणे समजून घ्या. चांगले इलेक्ट्रोलाइट पेय निवडा आणि शरीरातील पाण्याची मात्रा वाढवा. त्यामुळे उन्हाळ्यात तु्म्ही निरोगी, उत्साही अन् हायड्रेटेड राहाल.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electrolyte rich drinks in summer is good for health know tips told by expert for avoiding dehydration ndj