Energy Drink Side Effects : सध्या परीक्षेचा काळ सुरू आहे, त्यामुळे बरेच विद्यार्थी लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी एनर्जी ड्रिंकचा वापर करतात. जिममध्ये जाणारे तरुण तर सर्रासपणे एनर्जी ड्रिंकचे कॅन पिताना दिसतात. परंतु, सतत एनर्जी ड्रिंक पिण्याच्या सवयीने शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढते आणि ही सवय नंतर व्यसनात बदलते. अशाने तरुणांच्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो.

या विषयावर मोहालीमधील फोर्टिस हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिनचे डायरेक्टर डॉ. विकास भुतानी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. विकास भुतानी म्हणाले की, किशोरवयीन तरुण आणि खेळाडूंमध्ये एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिन, साखरेसह त्यात ग्वाराना, टॉरिन व जिनसेंग यांसारखे उत्तेजक घटक असतात. याच्या सेवनाने सतर्कता, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि ऊर्जेची पातळी वाढवते, परंतु त्याचबरोबर रक्तदाब, हृदयविकार आणि श्वासोच्छ्वासासंबंधित त्रासदेखील वाढतात.

एनर्जी ड्रिंक्समध्ये असते सर्वाधिक साखर

डॉ. भुतानी पुढे सांगतात की, एनर्जी ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्याने शरीरात इन्सुलिन सेंसिटिव्हिटी आणि रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते. जरी एनर्जी ड्रिंक्स व्यायामापूर्वी किंवा नंतर, खेळण्याआधी किंवा नंतर पिण्यास लोकांची पसंती असेल तरी त्यातील अतिरिक्त साखरेच्या प्रमाणामुळे कालांतराने शरीरात जास्त कॅलरीज जमा होऊ शकतात. यामुळे वजन वाढते, इन्सुलिन सेंसिटिव्हिटी जाणवते, संप्रेरकांचे कार्य बिघडते, अशी माहिती पंचकुला येथील अल्केमिस्ट हॉस्पिटलमधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे सल्लागार डॉ. सुधांशू बुडाकोटी यांनी दिली.

याशिवाय एनर्जी ड्रिंक्समधील कृत्रिम गोड घटकामुळे खाण्याची लालसा वाढू शकते. यामुळे कदाचित तृप्तता जाणवत नाही, त्यामुळे एनर्जी ड्रिंक्सच्या माध्यमातून लोक जास्त कॅलरीजचे सेवन करतात, पण तरीही पोट भरल्यासारखे वाटत नाही. मुलांना लहानपणापासूनच अशा पेयांची सवय लावली जाते, त्यामुळे काही काळानंतर त्यांचे वजन वाढते आणि लठ्ठपणा येतो,” असे चंदीगड येथील पीजीआयएमईआर, कार्डिओलॉजी विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. पराग बारवाड सांगतात.

तरुणांनी एनर्जी ड्रिंक्सच्या व्यसनापासून दूर कसे रहावे?

एनर्जी ड्रिंक्समधील जास्त कॅफिन सेवनामुळे हृदयाचे कार्य बिघडते, परिणामी तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने हृदयाची गती वाढते आणि रक्तदाब वाढतो. यावर डॉ. बुडाकोटी सांगतात की, “जास्त प्रमाणात सोडियम आणि कॅफिन घेतल्यास शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. डॉ. भुतानी सांगतात की, फक्त एनर्जी ड्रिंक्सवर जगणाऱ्या रुग्णांमध्ये छातीत धडधडणे, हृदयाची अनियमित गती, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, न्यूरोलॉजिकल आणि वर्तणुकीशी संबंधित बदल आणि स्ट्रोक अशी गंभीर लक्षणं जाणवतात.

एनर्जी ड्रिंक्सचा आतड्याच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो

एनर्जी ड्रिंक्समुळे गंभीर डिहायड्रेशन आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल बिघाडदेखील होतो. त्यातील कॅफिन आणि साखरेमुळे आतड्यांतील बॅक्टेरियाचे संतुलन बिघडते. कॅफिन कोलनला जास्त उत्तेजित करू शकते, ज्यामुळे अतिसार आणि पेटके येण्याची समस्या जाणवू शकते. या ड्रिंक्समधील कृत्रिम आम्ल पोटातील आम्लता वाढवू शकतात, ज्यामुळे छातीत जळजळ, पोटफुगी आणि मळमळ होऊ शकते. यातील जास्त साखरेचे सेवन आतड्याच्या कार्यात बिघाड आणतात, ज्यामुळे न पचलेले कण रक्तप्रवाहात जाऊ शकतात आणि पचन समस्या उद्भवू शकतात,” असे डॉ. भुतानी म्हणतात.

जास्त कॅफिनचे सेवन केल्याने तुम्हाला तात्पुरता उत्साहीपणा जाणवू शकतो, पण त्यामुळे मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम होतात. यामुळे डोकेदुखी, चिडचिडेपणा, चिंता आणि निद्रानाश अशा समस्या जाणवू शकतात, असेही डॉ. भुतानी पुढे सांगतात.

Story img Loader