Heart Health : असं म्हणतात की, हृदयविकाराचा धोका हा पुरुषांना जास्त असतो. पण, जागतिक स्तरावर हृदयविकार हे महिलांच्या मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे. हृदयविकाराचा धोका लक्षात घेता, वेळीच लक्षणे ओळखून नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.

हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन धोका कमी करण्यासाठी महिलांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून त्यांच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आज आपण चार प्रमुख चाचण्यांविषयी जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येक स्त्रीने केल्या पाहिजेत. याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती सांगितली आहे.

रक्तदाब तपासणे

उच्च रक्तदाब हा हृदयरोग आणि स्ट्रोकसाठी धोकादायक आहे. उच्च रक्तदाबाची लक्षणे लवकर दिसत नाहीत. नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे कार्डिओथोरॅसिक, हृदय व फुप्फुस पुनर्रोपण शस्त्रक्रियेचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मुकेश गोयल सांगतात, “वयाच्या विसाव्या वर्षापासून नियमित रक्तदाब तपासणी सुरू केली पाहिजे. वर्षातून एकदा रक्तदाब तपासणी करणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी नियमित तपासणे करणे गरजेचे आहे.

ही चाचणी का महत्त्वाची?

अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयाशी संबंधित समस्या, किडनी खराब होण्याचा धोका आणि स्ट्रोकचा धोका जाणवू शकतो. त्यामुळे निरोगी जीवनशैलीसाठी रक्तदाब (१२०/८० mmHg पेक्षा कमी) असणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : Coconuts Are Not Allowed On Planes : विमान प्रवासात नारळ घेऊन जाण्यावर का आहे बंदी? वाचा नियम, तोटे अन् तज्ज्ञांचे मत

कोलेस्ट्रॉल तपासणे

शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोका टाळता येतो. कारण- खराब कोलेस्ट्रॉल (LDL) वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकचा धोका वाढतो. यथार्थ हॉस्पिटल्स येथील कार्डिओलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. दीपंकर वत्स सांगतात, ” ज्या स्त्रियांना लठ्ठपणा आहे किंवा हृदयविकाराशी संबंधित समस्या आहे, त्यांनी धोका लक्षात घेऊन, वयाच्या विसाव्या वर्षांपासून कोलेस्ट्रॉल तपासणी सुरू करणे गरजेचे आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोणताही धोका नसेल, तर त्यांनी ही चाचणी वयाच्या ४५ व्या वर्षी सुरू करावी आणि दर चार ते सहा वर्षांनी ही चाचणी करीत राहावी.”

ही चाचणी का महत्त्वाची?

उच्च कोलेस्ट्रॉल हे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजाराचे प्रमुख कारण आहे. चाचणीनंतर उच्च कोलेस्ट्रॉल निदर्शनास आले, तर जीवनशैलीतील सकारात्मक बदल किंवा उपचाराद्वारे हा धोका टाळता येतो.

रक्तातील ग्लुकोज तसापणी

मधुमेह हा हृदयविकारासाठी अत्यंत धोकादायक आहे. रक्तातील साखरेची उच्च पातळी हृदयावर नियंत्रण ठेवणाऱ्या रक्तवाहिन्या आणि पेशींचे नुकसान करते. लठ्ठपणा किंवा मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असणाऱ्या लोकांना याचा धोका जास्त असतो. या चाचणीद्वारे मधुमेह किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सची तपासणी वयाच्या विसाव्या वर्षी सुरू केली पाहिजे. जर तुम्हाला कोणताही धोका नसेल, तर तुम्ही दर तीन वर्षांनी ही तपासणी करणे आवश्यक आहे. खूप जास्त धोका असलेल्या लोकांनी वर्षातून एकदा ही चाचणी करणे आवश्यक आहे.

ही चाचणी का महत्त्वाची?

रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने प्री-डायबिटीज, हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे लक्षणे ओळखून लवकर तपासणी करणे, पोषक आहार घेणे आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.

हेही वाचा : शाहरुख खानने स्मोकिंग सोडली; पण आता होतोय ‘हा’ भयंकर त्रास; जाणून घ्या याबाबतची डॉक्टरांची मते

बॉडी मास इंडेक्स (BMI)

व्यक्ती निरोगी आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी बॉडी मास इंडेक्स (BMI) म्हणजेच उंची आणि वजनाची एक सोपी गणना केली जाते. डॉ. वत्स यांच्या मते, लठ्ठपणा हा हृदयविकारासाठी धोकादायक घटक आहे; जो उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, तसेच मधुमेहास कारणीभूत काहे. वयाच्या विसाव्या वर्षापासून बीएमआय (BMI)च्या नियमित चाचणीमुळे लठ्ठपणासारखा समस्या ओळखता येतात.

ही चाचणी का महत्त्वाची?

योग्य वजनामुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. उच्च बीएमआय तपासणी केल्यानंतर नियमित शारीरिक व्यायाम करावा आणि संतुलित आहार घ्यावा, तसेच निरोगी जीवनशैली स्वीकारावी.

डॉ. गोयल सांगतात की, काही विशिष्ट प्रकरणांमध्ये हृदयाचे अनियमित ठोके किंवा हृदयाशी संबंधित इतर समस्या तपासण्यासाठी इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ECG) चाचणी करू शकता. एखाद्या महिलेला छातीत अस्वस्थता जाणवत असेल किंवा हृदयाचे ठोके अचानक वाढल्यास इलेक्ट्रोकार्डिओग्राम चाचणी करावी.