Exam Studying at Night: इयत्ता १० वी, १२ वी, १५ वी आणि त्यानंतरच्या इतर अनेक महत्त्वाच्या परीक्षांच्यावेळी आदल्या रात्री पूर्ण वेळ जागून तुमच्यापैकी अनेकांनी अभ्यास केला असेल. रात्री उशिरापर्यंत जागे राहून परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स काढणे हे चित्र आजही अनेक भारतीय घरांत दिसून येते. विद्यार्थ्यांसह त्यांची आईदेखील रात्रभर जागी राहून त्यांना काही ना काही खायला देत असते. अशाप्रकारे रात्रभर अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी दुसऱ्या दिवशी परीक्षा देण्यासाठी तयार असतो, पण अशाप्रकारे रात्रभर जागून परीक्षेचा अभ्यास करणे तुमच्यासाठी खरंच फायदेशीर पद्धत आहे का? या विषयावर काही तज्ज्ञ डॉक्टरांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे, ती जाणून घेऊ…

अनेक विद्यार्थी वर्षभर अभ्यास न केल्याने पालकांना दाखवण्यासाठी म्हणून परीक्षेच्या आदल्या रात्री पूर्णवेळ जागून अभ्यास करताना दिसतात. संपूर्ण रात्रभर जागून अभ्यास करणे फायदेशीर ठरत असल्याचे काही विद्यार्थांचे मत असू शकते. पण, त्यांना परीक्षेत १०० टक्के मिळवण्यासाठी रात्रीच्या शांत झोपेला प्राधान्य दिले पाहिजे.

परीक्षेच्या आदल्या रात्री अभ्यास करणे खरंच फायदेशीर असते का? (Tips for studying night for exams)

या विषयावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकच्या ट्रस्टी आणि फिजीशियन डॉ. सायमन ग्रँट म्हणाल्या की, रात्री उशिरापर्यंत जागणे याला”क्रॅमिंग” असे म्हटले जाते, पण हा सामान्यतः अभ्यास करण्याचा प्रभावी मार्ग नाही.

स्मृतीचे कार्य व्यवस्थितरीत्या सुरू राहण्यासाठी झोप फार महत्त्वाची असते. पुरेशी झोप न मिळाल्यास मेंदूला अल्पकालीन आठवणींना दीर्घकालीन आठवणींमध्ये रूपांतरित करण्यासाठी अडचणी येतात, असेही डॉ. ग्रँट म्हणाल्या.

More Stories On Health : केस २१ दिवस नियमितपणे धुतल्याने कोंड्याची समस्या दूर होते का? डॉक्टर काय सांगतात, वाचा

डॉ. सायमन ग्रँट यांच्या मते, झोपेची कमतरता संज्ञानात्मक कार्यांवरदेखील नकारात्मक परिणाम करते. जसे की लक्ष देणे, समस्यांवर समाधान शोधणे आणि गंभीर विचार करणे; यामुळे शैक्षणिक कामगिरी कमी होऊ शकते.

त्या पुढे म्हणाल्या की, एकच रात्र जागून अभ्यास करण्यापेक्षा रोज थोडा थोडा अभ्यास केल्यास याने माहिती लक्षात ठेवण्यास मदत होते. उशिरापर्यंत जागे राहिल्याने तुमच्या सर्कैडियन रिदममध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्तीवर विपरित परिणाम होतो. तणावाची पातळी वाढते, यासह विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

तुम्ही रात्रभर जागून अभ्यास केल्यास काय परिणाम होतात?

डॉ. ग्रँड म्हणाल्या की, झोपेच्या अभावामुळे लक्ष, सतर्कता, एकाग्रता, तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांवर गंभीर परिणाम होतो. त्यांच्या मते, झोप कमी होण्याचा संबंध तणाव, चिडचिडेपणा, चिंता आणि नैराश्य यांसारख्या मूड विकारांशी आहे.

अपुरी झोप तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत करू शकते, ज्यामुळे तुम्हाला विविध आजार होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारखे चयापचय विकारदेखील होऊ शकतात. इतकेच नाही तर शारीरिक वाढ आणि भूक नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकांच्या कार्यातही बिघाड निर्माण होऊ शकतो.

अपुऱ्या झोपेमुळे उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका यांसह हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार बळावण्याची जोखीम अधिक असते. तुम्ही रोज अशाप्रकारे उशिरा झोपत असल्यास कर्करोग, अल्झायमरसारख्या आजारांना बळी पडू शकता. इतकेच नाही तर तुमचे आयुर्मान कमी होण्यासह गंभीर आरोग्य स्थिती उद्भवण्याची शक्यता असते.