शरीर फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. मात्र अनेकांना वर्कआउट करताना दम्याची लक्षणे दिसून येतात. दमा हा श्वसनासंबंधित आजार आहे ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण येते. आता दम्याची लक्षणे दिसत असलेल्या व्यक्तीला व्यायामादरम्यान किंवा नंतर श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यात काही रुग्णांना खोकला, छातीत जडपणा, श्वास घेण्यास अडचण आणि घशात घरघर अशी गंभीर लक्षणे जाणवतात. यावर सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या पल्मोनरी मेडिसिन कन्सल्टंट डॉ. ऋचा मित्तल यांनी म्हटले की, अशा प्रकारच्या दम्याच्या रुग्णांमध्ये व्यायामादरम्यान फुप्फुसातील वायूमार्ग संकुचित किंवा अरुंद होतो. असे व्यायाम सुरू केल्यानंतर साधारण १० ते १५ मिनिटांनंतर होते. बहुतांश रुग्णांमध्ये ही लक्षणे जवळपास एका तासानंतर निघून जातात.
या परिस्थितीत व्यायाम करणे टाळा
खूप थंड, कोरड्या हवेत व्यायामासाठी बाहेर जाणे टाळा, ज्यामुळे लक्षणे आणखी वाईट होऊ शकतात. जर तुम्हाला धूळ किंवा इतर कसली अॅलर्जी असेल तर प्रदूषित हवेत व्यायाम करणे टाळा. जर तुम्ही अशा दिवसांतही घराबाहेर जात असाल तर परिणाम कमी करण्यासाठी व्यायाम करताना तोंडावर सैल मास्क किंवा स्कार्फ घालणे चांगले ठरेल.
दम्याची औषधे (इनहेलर) नियमितपणे वापरा
यात सामान्यत: दिसणारी ही लक्षणे रोखण्यासाठी तुम्ही व्यायाम करण्यापूर्वी १० ते २० मिनिटे आधी ‘क्विक-रिलीफ’ किंवा ‘रिलीव्हर’ इनहेलर वापरणे गरजेचे आहे. ज्या रुग्णांना वारंवार अशी लक्षणे दिसतात त्यांनी नियमित कंट्रोलर औषधांचा, अर्थात इनहेलरचा, वापर करणे आवश्यक आहे. यामुळे व्यायामादरम्यान तुम्हाला दम्याची लक्षणे दिसण्याची शक्यता कमी होते.
व्यायाम करण्यापूर्वी वॉर्म अप करा
डॉ. मित्तल यांनी पुढे म्हटले की, तुम्ही कठीण व्यायाम प्रकार सुरू करण्यापूर्वी वॉर्म अप करणे गरजेचे आहे. यामुळे आरोग्यासंबंधित कोणतीही मोठी अडचण येत नाही.
व्यायामादरम्यान जाणवणाऱ्या दम्याच्या लक्षणांवर उपचार करता येतात. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही व्यायाम करू शकत नाही. तुम्हाला दम्याचा त्रास असेल तरीही तुमच्या आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय करून तुम्ही दम्याची लक्षणे नियंत्रणात ठेवू शकता. जेव्हा तुमचा दम्याचा त्रास वाढतो तेव्हा व्यायाम करणे टाळा, असा सल्ला डॉ. मित्तल यांनी दिला आहे.