डॉ. अनघा हेरूर
सध्या संपूर्ण राज्यात मोठय़ा प्रमाणात डोळे येणे अथवा नेत्र संसर्ग होत असल्याचे आढळून येत आहे. नेत्र संसर्ग होण्याची कारणे काय, त्याची लक्षणे कोणती आणि त्यावर कोणते उपाय करावेत, याविषयी आपण माहिती घेऊयात.
डोळा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. वेगवेगळय़ा जंतू संसर्गाचा आपल्या डोळय़ावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जंतू संसर्ग प्रामुख्याने सूक्ष्म जीवांमुळे होतो. उदाहरणार्थ: जीवाणू, विषाणू इत्यादी. पावसाळय़ात आद्र्रता मोठय़ा प्रमाणात वाढते. त्यामुळे विषाणू वाढीसाठी आणि पसरण्यासाठी पोषक वातावरण असते. यामुळे पावसाळय़ात नेत्र संसर्ग लवकर होण्याची अधिक शक्यता असते.
हेही वाचा >>> ढोबळी मिरची खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहितीयेत का? आहारतज्ज्ञांकडून जाणून घ्या …
नेत्र संसर्गाची कारणे :
संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे, स्वच्छतेचा अभाव,
वारंवार डोळय़ांना हात लावणे, दूषित पाण्याचा वापर, लेन्सेसची योग्य काळजी न घेणे.
उपचार:
नेत्र संसर्गाच्या उपचारांसाठी योग्य नेत्रचिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली औषध उपचार घ्यावा लागतो. कारण संसर्ग अनेक प्रकारचे असतात व उपचारांमध्ये भिन्नता आढळू शकते.
उपचारांमध्ये प्रामुख्याने आय ड्रॉप्स व कधीकधी गोळय़ांचा उपयोग करावा लागतो. योग्य ती स्वच्छता राखून व उपचार घेऊन आपण संसर्ग रोखू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत:च्या मनाने किंवा केमिस्टकडून डॉक्टरांना न दाखवता डोळय़ातील ड्रॉप्सचा वापर करू नये, कारण त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. कोणत्याही नेत्र संसर्गाकडे दुर्लक्ष करु नये.
हेही वाचा >>> Health Special: पिंपल्स का व कशी तयार होतात?
डोळय़ांची काळजी कशी घ्याल
* डोळय़ांना सतत हात लावू नये.
* डोळे चोळू नये.
* कधीही दुसऱ्यांचे रुमाल, टॉवेल किंवा सौंदर्यप्रसाधने वापरू नये.
* कधीही दुसऱ्यांचे आय ड्रॉप्स वापरू नये.
* हात स्वच्छ धुवत राहावेत जेणेकरून डोळय़ातून आलेल्या स्त्रावाला हात लागल्याने इतरांना अथवा तुमच्याच दुसऱ्या डोळय़ाला संसर्ग होणार नाही. स्वच्छता पाळा जंतू संसर्ग टाळा.
* संसर्ग झाल्यानंतर जर प्रकाशाचा त्रास होत असेल तर त्यांनी गॉगल वापरा.
नेत्र संसर्गाची लक्षणे डोळे लाल होणे, डोळय़ात खाज येणे, डोळय़ात खूपणे, दुखणे, सतत पाणी येत राहणे, धुरकट दिसणे, डोळय़ात चिकटपणा येणे.