PresVu Eyedrop: चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. जसजसं वय वाढतं तसतसं दृष्टीसंबंधित अनेक समस्या उद्भवतात, त्यामुळे चष्मा लावणं किंवा त्यासंबंधी उपचार घेणं हे गरजेचं होऊन जातं. पण, आता ही समस्या दूर करणारे औषध मिळाल्याचा दावा एका औषधनिर्मिती करणार्‍या कंपनीने केला आहे.

औषध नियामक एजन्सीने या आठवड्यात ‘प्रेस्वू’ला (PresVu) मंजुरी दिली, हा देशातील पहिला आयड्रॉप आहे, जो ४० ते ५५ वयोगटातील लोकांना चष्म्याशिवाय वाचन करण्यात मदत करेल.

प्रेस्वू आयड्रॉप (PresVu Eyedrop)

एन्टोड (Entod) फार्मास्युटिकल्सने लाँच केलेले हे ड्रॉप्स पुढील महिन्यापासून सुमारे ३५० रुपयांना केमिस्टकडे उपलब्ध होतील. यामध्ये पिलोकार्पिन (pilocarpine) आहे, जे प्रिस्बायोपिया (presbyopia) यावर उपचार करतात. प्रिस्बायोपिया म्हणजेच वयोमानानुसार होणारी स्थिती, ज्यात आपल्या डोळ्यांना जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्याची शक्ती कमी होते. या उपचारामुळे डोळ्यातील बाहुलीचा (Pupils) आकार कमी होतो, ज्यामुळे वस्तू जवळून स्पष्टपणे पाहण्यास मदत होते. कंपनीचा दावा आहे की, हा आयड्रॉप जवळच्या अंधूक दृष्टीसाठी (blurry near vision) एक सोपा पर्याय आहे आणि यावर कॉन्टॅक्ट लेन्स, चष्मा आणि डोळ्यांची शस्त्रक्रिया हे इतर पर्याय आहेत. पण, हा लहानसा आयड्रॉप तुमचा चष्मा कायमचा घालवू शकतो का? चला, तज्ज्ञांकडून जाणून घेऊ या.

हेही वाचा… नवरात्रीत कतरिना कैफच्या हातावर दिसला काळा पॅच, याचा कोणत्या आजाराशी आहे संबंध? तज्ज्ञांनी केला खुलासा

नवीन फॉर्म्युलेशन प्रिस्बायोपियाच्या सर्व केसेससाठी नाही

प्रो. एस. एस. पांडव, प्रमुख, ॲडव्हान्स्ड आय सेंटर, पीजीआयएमईआर (PGIMER), चंदीगड, स्पष्ट करतात की, पिलोकार्पिन (Pilocarpine) हे एक जुने औषध आहे, जे डोळ्यांच्या लक्ष केंद्रित करण्याच्या शक्तीवर प्रभाव टाकण्यासाठी ओळखले जाते आणि ते फक्त काही निवडक लोकांसाठीच उपयुक्त ठरू शकते. प्रिस्बायोपियाच्या सर्व केसेससाठी याची शिफारस केली जाऊ शकत नाही. “या विशेष फॉर्म्युलेशनमध्ये कमी डोस (1.25%) वापरला जातो, ज्यामुळे दुष्परिणाम (side effects) कमी होतात. मात्र, हे पूर्णपणे टाळता येत नाही. हे दुष्परिणाम कमी आणि छोट्या कालावधीसाठी सहन करण्यायोग्य आहेत, पण पिलोकार्पिनच्या दीर्घकालीन वापरामुळे डोळ्यातील स्नायू, लेन्स आणि रेटिनासारख्या इतर संरचनांवर वाईट परिणाम होऊ शकतात, त्यामुळे याचा वापर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली काळजीपूर्वक करून पाहावा,” असं डॉ. पांडव म्हणतात. काही केसेसमध्ये डोळ्यांमध्ये जळजळ, डोकेदुखी आणि डोळ्यातून पाणी येणे याची नोंद करण्यात आली आहे.

अनेकांची संगणकावर पाहण्याची (computer vision) क्षमता सुधारेल

डॉ. एस. पी. एस. ग्रेवाल, जे अमेरिका स्थित नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या फेनबर्ग मेडिकल स्कूलमध्ये नेत्रविज्ञानाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत, ते म्हणतात की, नवीन औषधे विकसित होण्यापूर्वी १९६० आणि १९७० च्या दशकात काचबिंदूच्या उपचारांसाठी पिलोकार्पिन हे प्राथमिक औषध होते. “हे आयरीस स्फिंक्टर स्नायूंना सक्रिय करते, ज्यामुळे एक छोटा छिद्र (pinhole effect) तयार होतो आणि दृष्टीची खोली (depth) वाढते. “हे सिलियरी स्नायू संकुचित करतो, ज्यामुळे जवळच्या वस्तूवर लक्ष केंद्रित करताना डोळ्यांच्या लेन्सचा आकार बदलतो.”

डोळ्यांची स्पष्टता व्यक्तीनुसार बदलते, त्यामुळे सर्वच रुग्णांना वाचताना अगदी स्पष्टच दिसेल असं नाही आणि यामुळे त्यांना कायमची चष्म्यापासून मुक्तीही मिळेल असंही होणार नाही. संगणक वापरताना अनेकांच्या डोळ्यांच्या दृष्टीमध्ये सुधारणा होईल, कारण ती मध्यम दृष्टी (intermediate vision) आहे; परंतु तरीही दुसरं काही वाचण्यासाठी त्यांना चष्मा लावावा लागेल”, असंही ते म्हणाले.

हेही वाचा… पोळी शिळी झालीय मग फेकून देताय? ‘हे’ आरोग्यदायी फायदे पाहून व्हाल अवाक

याशिवाय मोनो-फोकल लेन्स इम्प्लांटसह मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेतून गेलेल्या रुग्णांमध्ये या औषधाचा मर्यादित उपयोग आहे. “हे फक्त डोळ्यांच्या तपासणीनंतर, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे, कारण इतर दृष्टीच्या त्रुटी आणि आजारांची तपासणी करणे आवश्यक आहे. काही रुग्णांमध्ये रेटिनल डिटेचमेंटचा (retinal detachment) धोका असू शकतो. पिलोकार्पिनचा दीर्घकाळ वापर केल्यानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रियेत काही अडचणी येऊ शकतात,” अशी चेतावणी डॉ. ग्रेवाल देतात.

ड्रॉप्सचा अल्पकालीन प्रभाव असतो

डॉ. अशोक शर्मा, एमएस, नेत्रविज्ञान, पीजीआय, चंदीगड म्हणतात की, ड्रॉप्सचा अल्पकालीन प्रभाव असतो. “जर एखाद्या रुग्णाने सकाळी एक ड्रॉप वापरला तर त्याचा परिणाम साधारणतः चार ते सहा तास टिकतो. दुपारी आणखी एक ड्रॉप घेतल्यास, रुग्णाची जवळची दृष्टी दिवसभरासाठी सुधारते. त्यामुळे हा कायमस्वरूपी उपाय आहे असे नाही,” असं ते पुढे म्हणाले. चष्मा कायम लावावा लागणारच आहे.