Eye Pupil: हे सर्वज्ञात आहे की, जेव्हा आपण एखादी आवडणारी गोष्ट पाहतो किंवा आपल्या प्रिय व्यक्तीला पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होतात. पण, जर ते विनाकारण घडत असेल तर तुमचे शरीर तुम्हाला काहीतरी सांगत असेल.

तुमच्या डोळ्यांच्या बाहुल्यांच्या गुणधर्मातील (आकार, आकारमान आणि प्रतिसाद) बदल तुमच्या मानसिक स्थितीबद्दल काही संकेत देऊ शकतात. मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मेहेझबीन डोर्डी यांनी indianexpress.com ला सांगितले की, डोळ्यांच्या गुणधर्मांद्वारे कोणत्या मानसिक आरोग्य समस्या दर्शविल्या जाऊ शकतात.

“तणाव किंवा चिंता वाढल्यावर डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होऊ शकतात, तर मानसिक आरोग्यावर परिणाम करणारी काही औषधे बाहुल्यांना मोठं किंवा लहान करू शकतात. याव्यतिरिक्त, बाहुल्यांचा हळू किंवा असममित प्रतिसाद म्हणजे काही मेंदू संबंधित समस्या असू शकतात,” असे डोर्डी यांनी सांगितले.

डोर्डी यांच्या मते, डोळ्यांच्या गुणधर्मांमधून काही अधिक समस्यादेखील दिसू शकतात :

चिंता आणि तणाव : चिंता किंवा तणावामुळे बाहुल्या मोठ्या होऊ शकतात.

औषधांचा वापर : स्टिम्युलंट्समुळे (Stimulants) बाहुल्या मोठ्या होऊ शकतात, तर ओपिओइड्समुळे (opioids) बाहुल्या लहान होऊ शकतात.

मेंदूशी संबंधित आजार : मेंदूच्या जखमा डोळ्यातील बदलांद्वारे दर्शवू शकतात. काही वेळा, मल्टीपल स्क्लेरोसिस (multiple sclerosis) देखील यामुळे सूचित होऊ शकते.

ऑटिझम स्पेक्ट्रम विकार : मुलामध्ये डोळ्यांची अनियमित हालचाल असेल तर ते ऑटिझम स्पेक्ट्रमवर असू शकतात.

बाहुल्यांच्या आकारात होणारे बदल हे मानसिक स्थितीतील बदल दाखवू शकतात; जसे की थकवा, उत्तेजना किंवा मानसिक दबाव.

तथापि, हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की हे फक्त संभाव्य संकेत आहेत आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी ते निश्चित निदानाचे मार्ग नाहीत. पण, “सावध राहणं” हे खेद करण्यापेक्षा नेहमीच चांगलं असतं; जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या गुणधर्मात काही बदल दिसले, तर तुम्ही आरोग्यतज्ञांचा सल्ला घ्या.

मानसिक आरोग्याच्या स्थितीमुळे डोळ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो का?

“बाहुल्यांच्या आकारात किंवा प्रतिसादात होणारे बदल डोळ्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होण्याऐवजी हे मुख्यतः मेंदूशी संबंधित किंवा मानसिक स्थितीचे संकेत असतात. तथापि, मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या गंभीर न्यूरोलॉजिकल समस्यांमुळे कधीकधी दृष्टी समस्या उद्भवू शकतात,” असे दोर्डी म्हणाल्या.

जरी या स्थिती डोळ्यांच्या गुणधर्मावर प्रभाव टाकू शकतात, तरीही खूप कमी वेळा यामुळे अंधत्व किंवा मोठ्या दृष्टीच्या समस्यांचा सामना करावा लागतो.