सध्या बाजारात अनेक उत्पादनांमध्ये भेसळ असल्याचे, त्या बनावटी असल्याचे आपल्याला दिसत आहे. मात्र, भेसळ करणाऱ्यांनी ORS म्हणजेच ओरल-रीहायड्रेशन सॉल्ट उत्पादनालादेखील एकटं सोडलेलं नाही, असे कंटेन्ट क्रिएटर रेवंत हिमात्सिंगका ऊर्फ फूड फार्मर याने केलेल्या एका दाव्यामधून समजते. उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट न होण्यासाठी, तसेच शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखण्यासाठी रेवंत हा भेसळ किंवा बनावट नसणाऱ्या ORS ओळखण्यावर अधिक भर देतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भारतातील बहुतांश फार्मसीमधील ORS हे बनावटी असतात! या कंपन्या ORS या ट्रेडमार्क शब्दाचा वापर तर करतात, मात्र ते खरे ORS नाहीत! बनावटी ORS मध्ये प्रचंड प्रमाणात साखर असून, त्यात सोडियमचे प्रमाण हे कमालीचे कमी असते. बनावटी ORS च्या सेवनाने, अनेक मुलांच्या मेंदूला सूज येऊन त्यांना तातडीने ICU मध्ये दाखल करण्याचेदेखील प्रकार घडले आहेत”, असे रेवंत याचे म्हणणे आहे.

इतकेच नाही तर बनावटी ORS वर FSSAI चे प्रमाणपत्र असू शकते. कारण बनावटी ORS अन्नपदार्थ या गटात येते. मात्र, खरे ORS हे औषधांच्या गटात येत असल्याने, त्यावर तुम्हाला “‘WHO फॉर्म्युलावर आधारित” असे लिहिलेले आढळेल.

हेही वाचा : तुम्हीही झोपेतून उठल्यावर डोळ्यांवर पाणी मारताय? ही सवय ठरू शकते हानिकारक! डॉक्टरांनी दिलाय सल्ला

या गोष्टीबद्दल द इंडियन एक्स्प्रेसने घेतलेली अधिक माहिती पाहूया.

अतिसार, उलट्या, मळमळ, चक्कर येणे किंवा जास्त घाम येण्याच्या समस्यांमुळे होणाऱ्या डिहायड्रेशनच्या त्रासासाठी ORS चा वापर केला जातो. “ORS शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि द्रव पदार्थांचे संतुलन राखून, अधिक त्रास होण्यापासून शरीराचे रक्षण करते”, असे मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे क्रिटिकल केअरप्रमुख सल्लागार डॉक्टर अकलेश तांडेकर म्हणतात.

बनावटी ORS का घातक ठरू शकते? [Why is fake ORS a concern?]

बनावटी ORS मध्ये साखरेचे उच्च प्रमाण असते. परिणामी, अतिसार वाढून शरीर अधिक डिहायड्रेट होऊ शकते. “असे होण्यामागे कारण म्हणजे, अति साखर ही आतड्यांमध्ये जास्त पाणी खेचते. त्यामुळे शरीर अधिक पाणी बाहेर सोडते. तसेच, बनावटी ORS मध्ये सोडियमचे प्रमाण कमी असल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी संतुलित राखण्यास अडथळा निर्माण होतो, यामुळे मेंदूला सूज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात”, असेही डॉक्टर तांडेकर म्हणतात. तसेच, अशा बनावटी ORS च्या सेवनाने लोकांच्या आरोग्यास हानी पोहोचते. अशात लहान मुलांचादेखील समावेश आहे. त्यांच्या मेंदूला सूज येऊन त्यांना तातडीने आयसीयूमध्ये भरती करावे लागते, असेही ते पुढे म्हणाले.

“बनावटी ORS मधील घटकांच्या असंतुलित प्रमाणामुळे, शरीरातील पाण्याच्या आणि इलेक्ट्रोलाईट प्रमाणाच्या संतुलनावर परिणाम होतो. ज्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येते”, असे तांडेकर म्हणतात.

हेही वाचा : मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…

रेवंत हिमात्सिंगकाने एक्स [पूर्वीचे ट्विटर] वरून शेअर केलेल्या भेसळ किंवा बनावटी ORS च्या पोस्टला सहमती दर्शवत डॉक्टर तांडेकर सांगतात की, ORS हे अन्न किंवा खाद्यपदार्थांमध्ये न येता, एक औषध किंवा औषधी उत्पादनांमध्ये वर्गीकृत केले जाते. खरे ORS हे सूत्रांचे / फॉर्म्युलेशनचे तंतोतंत पालन करण्यावर आणि उत्पादनाची उच्च गुणवत्ता राखण्यावर भर देतात.

“नेहमी खोक्यावर स्पष्ट माहिती असणाऱ्या, योग्य घटकांची माहिती देणाऱ्या आणि नियामक खुणा असलेल्या उत्पादनाची निवड करावी. खऱ्या ORS उत्पादनावर, उत्पादनाची गुणवत्ता दर्शविणारी योग्य लेबले असतीलच, असा सल्ला डॉक्टर तांडेकर यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake ors harmful for human health how to identify original product what doctor suggest check out dha