Fatty liver Signs And Treatment: मागील काही कालावधीत फॅटी लिव्हरच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. यापूर्वी केवळ अतिमद्यपान करणाऱ्यांना छळणारा हा त्रास आता अगदी मद्याला स्पर्श न केलेल्या व्यक्तींना सुद्धा सर्रास होत आहे. जगभरातील लाखो लोकांना जडलेला हा विकार हा प्रामुख्याने जीवनशैलीच्या बिघाडामुळे होतो. लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिरोधकता, उच्च कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब यासारखे अन्य विकार या फॅटी लिव्हरमुळे आणखी बळावतात. पण याही पेक्षा फॅटी लिव्हरबाबर एक चिंताजनक बाब म्हणजे याची प्रगती ही ‘मूक’ पद्धतीने होत असते. जोपर्यंत हा विकार अत्यंत गंभीर स्थितीत पोहोचत नाही तोपर्यंत याची लक्षणे पटकन लक्षातही येत नाहीत.
डॉ पुनित सिंगला, संचालक आणि विभाग प्रमुख, इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर ट्रान्सप्लांट आणि एचपीबी सर्जरी, मॅरेंगो एशिया हॉस्पिटल्स, गुरुग्राम यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, आपण आपल्या शरीराविषयी जागृत असाल आणि थोडं बारकाईने निरीक्षण केलं तर या विकाराची काही सूक्ष्म चिन्हे आपणही ओळखू शकता. थकवा, ओटीपोटात वेदना, वजन अचानक कमी होणे ही काही सामान्य लक्षणे अन्यही आजारांचे संकेत असू शकतात पण म्हणून दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. योग्य निदान होण्यासाठी संबंधित चाचणी करून घेणे आवश्यक आहे.
फॅटी लिव्हरची प्राथमिक लक्षणे कशी ओळखाल?
लघवीचा गडद रंग: फॅटी लिव्हर असल्यास शरीरात बिलीरुबिन तयार होते ज्यामुळे लघवीचा रंग गडद होऊ शकते. यकृताचे कार्य बिघडत असल्याचा हा संकेत असू शकतो.
अचानक वजन कमी होणे: फॅटी यकृत रोग चयापचय विकाराचे कारण ठरू शकतो त्यामुळे अनेकदा भूक व वजन कमी होऊ शकते.
सतत विनाकारण थकवा जाणवणे किंवा काही करण्याची इच्छा न होणे
त्वचेत बदल: तुम्हाला त्वचेला खाज सुटणे, लाल चट्टे उमटणे, रक्तवाहिन्या कोळ्याच्या जाळ्यासारख्या दिसणे, त्वचा पिवळसर होणे ही लक्षणे जाणवू शकतात.
ओटीपोटात त्रास: ब्लोटिंग म्हणजेच पोट फुगल्यासारखे वाटणे, उजव्या पोटाच्या वरच्या भागात वेदना जाणवणे.
पोटावर फॅट्स: जर तुमच्या पोटावर चरबी असेल आणि बॉडी मास इंडेक्स (BMI) ३० पेक्षा जास्त असेल तर हे निश्चितपणे फॅटी लिव्हरचे लक्षण असू शकते.
वाढलेले कोलेस्टेरॉल आणि बीपी: यकृत कोलेस्टेरॉल नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे यकृताचे बिघडलेले कार्य कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर थेट परिणाम करू शकते. जर तुम्हाला नव्याने उच्च कोलेस्टेरॉलचे निदान झाले असेल, तर तुमच्या यकृताची कार्यक्षमता तपासून पाहणे गरजेचे आहे. तसेच काही अभ्यासात असेही दिसून आले आहे की, फॅटी लिव्हरने ग्रस्त असलेल्यांना उच्च रक्तदाबाचा धोका असू शकतो.
सतत खात राहण्याची इच्छा/सवय : जेवून झाल्यावरही सतत भूक लागणे, साखर किंवा चरबीयुक्त अन्न पाहताच खाण्याची इच्छा होणे हे यकृत खराब होण्याचे प्रारंभिक लक्षण असू शकते. जर्मन डायबिटीज सेंटरवर आधारित संशोधकांनी शोधून काढले की ज्या व्यक्तींनी सॅच्युरेटेड फॅटने भरलेले पदार्थ खाण्याची सवय असते त्यांच्या शरीरात चरबी जमा होण्याचे तर प्रमाण जास्त असते. यामुळे यकृताच्या चयापचयाच्या कार्यामध्ये बदल होऊ शकतो.
आता वाचूनही तुम्हाला ही लक्षणे किरकोळ वाटू शकतात पण त्यांच्याकडे नीट लक्ष न दिल्यास यकृत बिघडण्याची स्थिती उदभवू शकते. खबरदारी म्हणून अशावेळी रक्त तपासणी आणि अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घ्यावे.
हे ही वाचा<< एव्हरेस्ट फिश करी मसाल्याविरुद्ध मोठी कारवाई; जास्त सेवनाने शरीराचे किती व कसे नुकसान होते?
फॅटी लिव्हर आजार कसा थांबवता येईल?
सुदैवाने, जीवनशैलीतील बदल फॅटी यकृत रोग टाळण्यासाठी कामी येऊ शकतात. फळं, भाज्या, पातळ प्रथिने आणि संपूर्ण धान्यांनी युक्त संतुलित आहाराचे सेवन केल्यास फॅटी लिव्हर होण्याचा धोका कमी होतो उंची व वयानुसार वजन योग्य असल्यास यकृतातील चरबीचे प्रमाण कमी करण्यात मदत होते. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल यासारख्या अंतर्निहित परिस्थिती सुद्धा नियंत्रणात असतील यासाठी प्रयत्न करायला हवे.