Side effects of not brushing your teeth for a month : शरीराच्या स्वच्छतेसोबतच आपल्या तोंडाची आणि दातांची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. गावाकडे दात स्वच्छ करण्यासाठी बहुतांशी कडुनिंबाच्या काड्यांचा वापर केला जातो. मात्र, आता बहुतांश भागांमध्ये टूथपेस्ट आणि टूथब्रशचा वापर केला जातो. रोज अंघोळ केली नाही तरी रोज सकाळी ब्रश नक्कीच केला जातो. परंतु, असे अनेक लोक आहेत की, ज्यांना ब्रश करायला फारच कंटाळा येतो. अशा परिस्थितीत हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे की, जर एखाद्या व्यक्तीने महिनाभर ब्रश केला नाही, तर काय परिणाम होईल?

तुमच्या दातांच्या स्वच्छतेकडे जास्त काळ दुर्लक्ष केल्यास तुमच्या एकूणच आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तोंडात लाखो जीवाणू असतात आणि नियमित ब्रश न केल्यास हे जीवाणू वाढू शकतात आणि त्यामुळे श्वासाची दुर्गंधी किंवा दात पडणे यापलीकडे अनेक समस्या उद्भवतात.पीतमपुरा येथील क्राऊन हब डेंटल क्लिनिकच्या प्रोस्थोडॉन्टिस्ट डॉ. नियती अरोरा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

नियती अरोरा सांगतात, “तुम्ही ब्रश करणे बंद केल्यास पहिला बदल म्हणजे दातांवर मऊ प्लेक जमा होणे. हा जीवाणूंनी भरलेला थर हिरड्यांना त्रास देतो आणि त्यामुळे जळजळ होते. मग या फुगलेल्या हिरड्यांना स्पर्श केल्यास किंवा सौम्य ब्रश केल्याने अतिशय सहजपणे रक्तस्राव होतो.” तसेच एक आठवड्यात दात कमकुवत होण्यास सुरुवात होते. तसेच प्लेक तयार झाल्यामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. त्यामुळे तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने केवळ दातांचे आरोग्यच खराब होत नाही, तर आपल्या एकूण आरोग्यावरही दुष्परिणाम होऊ शकतो.

हृदयाच्या समस्या

दात न घासल्याने विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि ती रक्तप्रवाहातून हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधतात. त्यामुळे रक्तवाहिन्या बंद होणे आणि स्ट्रोक होण्याचा संभव असतो.

तोंडाची दुर्गंधी

महिनाभर ब्रश न केल्यास तोंडातून खूप वास येऊ लागेल; जे अगदीच सामान्य आहे. या दुर्गंधीमुळे तुम्हाला इतरांशी बोलणेही कठीण होईल. त्याशिवाय दातांचेही खूप नुकसान होते.

दातांवर थर जमा होईल

महिनाभर दात न घासल्यास दातांवर अस्वच्छतेचा एक जाड थर जमा होईल, जो कितीही वेळा ब्रश केला तरी उतरणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला डेंटिस्टची मदत घ्यावी लागेल. साहजिकच हा थर जमा होताच दातांचा पांढरा रंगही निघून जाईल.

मधुमेह

दात न घासल्याने हिरड्यांमधील जळजळ वाढते आणि शरीराची क्षमता कमकुवत होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते; ज्यामुळे जीवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते.

गर्भधारणेतील गुंतागुंत

दातांचे खराब आरोग्य हे अकाली प्रसूती आणि बाळाचे कमी वजन यांच्याशी जोडलेले आहे. नियमितपणे दात न घासल्याने गंभीर दीर्घकालीन धोके उदभवू शकतात.

हेही वाचा >> लवकर उठण्यापेक्षा उशिरा उठणे चांगले? वाचा न्यूरोलॉजिस्ट काय सांगतात

त्यामुळे हाडांची लक्षणीय झीज होऊ शकते; ज्यामुळे दात सैल होतात आणि तुमच्या दातांची संरचना बिघडून, दात गळून पडतात. क्रॉनिक पीरियडॉन्टायटिस ही हृदयाशी संबंधित समस्या आहे आणि ती मधुमेह, संधिवात व गर्भधारणेदरम्यानची गुंतागुंत यांसारख्या आरोग्य समस्यांशी जोडली गेली आहे.