Health Special Pain Management “मॅडम, मला अचानक हा कंबरदुखीचा त्रास सुरू झाला, मी परवा एकदम वाकले आणि मोठं भांड उचललं त्यामुळेच झालं. एरवी माझी तब्येत छान आहे, मला कधीच काही त्रास होत नाही!” अचानक सुरू झालेल्या कंबरदुखीचं निराकरण करण्याचा प्रयत्न एक महिला करत होती. बहुतेक वेळा रुग्ण स्वतःला होणाऱ्या वेदनेचं कारण हे मनामध्ये ठरवून आलेले असतात किंवा ते कारण शोधण्याचा प्रयत्न करत असतात. हे अतिशय स्वाभाविक आहे. याला आम्ही ‘पेशंट पर्स्पेक्टिव’ म्हणतो. रुग्णाचा वेदनेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, वेदनेबद्दल रुग्णाच्या मनात काय विचार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाच रूग्ण स्वतःच्या वेदनेची कारणमीमांसा कशी करतो आहे याकडे आम्ही जाणीवपूर्वक लक्ष देतो. सुरुवातीला सांगितलेल्या उदाहरणात आपल्याला होणारी वेदना ही एपिसोडिक म्हणजे एका विशिष्ट कारणाने होणारी आहे असा ठाम विश्वास रुग्णाला आहे. यामध्ये अजून एक गोष्ट दडलेली आहे ती म्हणजे जोपर्यंत वेदना होत नाही तोपर्यंत आपली तब्येत उत्तम आहे हा समज!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एपिसोडिक वेदना

काही वेळा, काही प्रकारच्या वेदना या खरोखरीच एपिसोडिक असतात. उदाहरणार्थ मार लागल्यानंतर, पडल्यावर किंवा अपघातानंतर होणाऱ्या वेदना. या एका विशिष्ट कारणामुळे उत्पन्न झालेल्या असतात. पण यापैकी कुठलाही विशिष्ट संदर्भ नसताना सुरू होणाऱ्या वेदना उदाहरणार्थ कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी या एका प्रसंगातून निर्माण झालेल्या नसतात.
बहुतेकवेळा या वेदनांमागे एकापेक्षा जास्त घटक असतात. या घटकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून फक्त एका प्रसंगाला वेदनांसाठी कारणीभूत ठरवलं जात.

वाढलेलं वय आणि कॅल्शिअमची कमतरता

वाढलेलं वय, स्नायूंच्या आणि हाडांच्या तब्येतीकडे होणारं दुर्लक्ष, कॅल्शिअमची कमतरता, विटामिन बी आणि डी यांची कमतरता, वर्षानुवर्ष व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, अयोग्य आहार, अयोग्य बसण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धती, खूप काळापासून असलेला मानसिक तणाव, अपुरी झोप, विशिष्ट स्नायूंच्या कार्यातलं असंतुलन यापैकी एक किंवा अनेक घटक हे त्या रुग्णामध्ये आढळून येतात. या घटकांपैकी एक किंवा अनेक घटक हे रुग्णामध्ये आधीपासूनच असतात.
अशावेळी जर रुग्णाने वजन उचललं, अचानक एखादी क्रिया केली, जास्त श्रम झाले तर कंबरदुखी, मानदुखी किंवा गुडघेदुखी यासारख्या वेदना नव्याने सुरू होतात किंवा जागृत होतात. आपल्या वेदनेसाठी फक्त एखादी क्रिया, प्रसंग किंवा हालचाल कारणीभूत आहे असा समज रुग्ण करू घेतात. आधी सांगितलेले घटक विचारात घेऊन वेदनेचा व्यापक विचार केला जात नाही. याचा थेट परिणाम रुग्ण वेदना निवारणासाठी कोणता मार्ग वापरतात यावर होतो.

वेदना, समज आणि गैरसमज

आपल्याला होणारी वेदना ही फक्त एका विशिष्ट कारणामुळे झाली आहे असा समज झाला की मग वेदना बरी होण्यासाठी तात्पुरते उपाय अवलंबले जातात. या तात्पुरत्या उपायांमुळे वेदनेची तीव्रता कमी होते पण त्याचे कायमस्वरूपी व्यवस्थापन शक्य होत नाही. याचा अर्थ रुग्णाला महत्वाचे वाटणारे प्रसंग, क्रिया अर्थहीन असतात अस नाही. बाकी घटकांमुळे आधीच संवेदनशील असणाऱ्या स्नायू आणि हाडांच्या व्यवस्थेला हे निमित्त पुरेसं होत. वेदनेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी अधिक व्यापक विचार आवश्यक आहे. त्यासाठी काय करायला हवं हे बघूया:

  1. नियमित व्यायामाला प्राधान्य द्यावं
  2. डी, बी आणि कॅल्शियम या जीवनसत्त्वांकडे पुरेस लक्ष द्यावं
  3. वजन नियंत्रणात ठेवावं
  4. व्यायामामध्ये वजन उचलणं, लवचिकता वाढवणारे व्यायाम, एरोबिक व्यायाम यांचा समप्रमाणात समावेश करावा
  5. मानसिक ताण- तणाव नियंत्रणात ठेवावा
  6. वजन उचलण्याच्या योग्य पद्धती शिकून त्यांचा अवलंब करावा
  7. पुरेशा प्रमाणात झोप घ्यावी
  8. वेदनेला फक्त तीव्रतेच्या स्वरुपात मोजू नये, वेदनेचा कालावधी, प्रकार, संवेदना, तिचा दिवसाच्या वेळेशी असणारा संबंध या गोष्टींकडे ही लक्ष द्यावं.
  9. वेदना मुक्त होण्याचं उद्दिष्ट तर ठेवावच पण त्यासोबत स्वावलंबी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचं उद्दिष्टही ठेवावं.

जीवनशैली महत्त्वाची

कुठल्याही वेदनेने घाबरून न जाता त्याचा योग्य पद्धतीने विचार करावा. वेदनेचं मूळ शोधताना आपल्या एकंदरीत जीवनशैलीचा आणि आरोग्याशी संबंधित घटकांचा विचार करावा. प्रभावी वेदना व्यवस्थापन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यासाठी आपल्याला आरोग्याच्या सगळ्या पैलूंवर लक्ष देणं आवश्यक आहे.