सध्या प्रत्येकाचे आयुष्य हे ‘९ ते ५’ या कामाच्या वेळेमध्ये गुंतून पडले आहे. दिवसभर कामात व्यग्र राहिल्याने अनेकांचे त्यांच्या जेवण, पोषक आहार याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे दिवसभर काम करण्यासाठी पुरेशी किंवा आवश्यक तितकी शक्ती, ऊर्जा व्यक्तीकडे राहत नाही. त्यातल्या त्यात चहा किंवा कॉफी यांसारख्या कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन केल्यानंतर तात्पुरती भूक भागते. आलेली झोप जाऊन काम करण्याची ऊर्जा मिळते. मात्र, हा अगदीच तात्पुरता उपाय झाला.
मात्र, दिवसभर व्यक्ती उत्साही राहण्यासाठी किंवा त्याला काम करण्याची भरपूर ऊर्जा मिळावी यासाठी पोषक आहार घेणे, पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी असे कोणते पाच पदार्थ आहेत की, जे तुम्हाला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देऊ शकतात याची माहिती पोषण तज्ज्ञ [nutritionist] लवनीत बात्रा यांनी दिली आहे, असे द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून कळते.
“९ ते ५ ही कामाची वेळ सांभाळताना आपले बऱ्याचदा आहाराकडे दुर्लक्ष होते; ज्यामुळे आपल्या आरोग्याची हेळसांड होऊ शकते. मात्र, पोषक आहार घेतल्याने तुमच्या शरीराला उत्तम ऊर्जा मिळेल आणि तुमचे आरोग्यदेखील सुधारण्यास मदत होईल,” असे पोषण तज्ज्ञ लवनीत बात्रा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर म्हटले आहे.
१. ताक
आहारामध्ये ताक सेवनाचा सल्ला बात्रा यांनी दिला आहे. याचे कारण म्हणजे ताक एक नैसर्गिक प्रो-बायोटिक आहे. तसेच ताकामध्ये व्हे प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आहारात ताकाचा समावेश केल्याने, शरीरातील ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यास मदत होते. “इतकेच नाही, तर ताक पिण्याने आपली भूक भागवते आणि शरीर हायड्रेट राहते,” असे बात्रा म्हणतात.
२. पुदिन्याचा चहा
पुदिन्याचा चहा हा आपल्या नेहमीच्या चहा, कॉफीसाठी एक उत्तम पर्याय आहे. चहा, कॉफीच्या अतिसेवनाने होणाऱ्या पित्ताला शांत करण्यासाठी, तसेच अन्नाचे पचन चांगले होण्यास पुदिन्याचा चहा उपयोगी असतो. “आपल्याला दिवसभर ताजेतवाने ठेवण्यासाठी, अस्वस्थता टाळण्यासाठी तसेच पोटाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पुदिन्याचा चहा फायदेशीर ठरतो.” असे बात्रा म्हणतात. दुपारी जेवणानंतर येणारी झोप घालविण्यासाठी पुदिन्याचा चहा पिणे उपयुक्त ठरू शकते.
हेही वाचा : ग्रीन टी पिण्याने वजन अन् चरबी कमी होत नाही? नेमके काय म्हणतात आहारतज्ज्ञ जाणून घ्या..
३. केळी
केळ्यामध्ये पोटॅशियम व नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते. केळ्याचे सेवन केल्याने व्यक्तीला सतर्क ठेवण्यासाठी, तसेच शरीराला ऊर्जा देण्याचे काम होते. सकाळच्या वेळात किंवा दुपारी मधल्या वेळेत जर केळे खाल्ले, तर त्याने तुम्हाला संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा मिळते.
४. भाजलेले चणे
भाजलेल्या चण्यांमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे भाजलेले चणे खाल्ल्याने शरीराला पोषण आणि ऊर्जा मिळते. तसेच बराच वेळ पोट भरल्यासारखे राहते आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे मधल्या वेळेत काहीतरी कुरकुरीत खावेसे वाटले, तर असे भाजलेले चणे खाणे सर्वांत चांगला पर्याय आहे, असे बात्रा म्हणतात.
५. पिस्ता
पिस्तामध्ये हेल्दी फॅट्स, प्रथिने व अँटिऑक्सिडंट्स असतात. पिस्त्यामधील असे पौष्टिक घटक आपल्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यास उपयुक्त असतात. तसेच रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवण्यास साह्य होते. त्यामुळे मधल्या वेळेत भूक लागल्यास तुमच्या आरोग्याची काळजी घेणारा म्हणून सुक्या मेव्यातील पिस्ता हा पौष्टिक घटक तुम्ही बिनधास्त खाऊ शकता.