खराब लाइफस्टाईलमुळे आजकाल लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढण्याची समस्या दिसून येतेय. कोलेस्ट्रॉल ही गंभीर समस्या बनली आहे. शरीरातील कोलेस्टेरॉलचे उच्च प्रमाण तुम्हाला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका निर्माण करू शकते. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे विविध त्रास वा आजार संबंधित व्यक्तीच्या मागे लागण्याची शक्यता आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले आरोग्य राखण्यासाठी योग्य आणि पोषक आहार महत्त्वाचा असतो. हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पोषक आहाराकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.
मानवाच्या शरीरात दोन पद्धतीचे कोलेस्ट्रॉल असतात. त्यामध्ये LDL म्हणजेच लो डेन्सिटी लिपोप्रोटीन याला वाईट कोलेस्ट्रॉल मानले जाते. तर, दुसरीकडे HDL म्हणजेच हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल असते. कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा चिकट पदार्थ आहे; जो चरबीयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे रक्ताच्या नसांमध्ये जमा होतो. जास्त वजन, पुरेसा व्यायाम न करणे, चरबीयुक्त पदार्थ खाणे, अनहेल्दी लाइफस्टाईल आणि धूम्रपान किंवा दारू पिणे यांमुळे उच्च कोलेस्ट्रॉल होतो. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. कोलेस्ट्रॉलवर आयुर्वेदिक उपचार काय आहेत? कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याच उपायांवर गुडगाव येथील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट प्रमुख दीप्ती खातुजा यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
तज्ज्ञ म्हणतात, “खराब कोलेस्ट्रॉल आपल्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या ब्लॉक होऊ लागतात. अंबाडीच्या बिया (फ्लेक्स सीड्स) सुपरफूड असून, या बियांचे तुम्ही सेवन करू शकता. अंबाडीच्या बिया लिग्नॅन्सचा समृद्ध स्रोत आहेत; ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो आणि आरोग्य सुधारू शकते. अंबाडीच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते; ज्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात. त्या दीर्घकाळ सेवन करणे सुरक्षित आहे. आयुर्वेदात अंबाडीच्या बिया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या गेल्या आहेत.”
(हे ही वाचा : शेवग्याच्या शेंगाचे पाणी प्यायल्यानं रक्तातील साखर कमी होते? मधुमेहींसाठी खरंच ठरते वरदान? तज्ज्ञांकडून जाणून घ्या.. )
पोषणतज्ज्ञ सांगतात, “दररोज एक चमचा किंवा पाच ग्रॅम्सने सुरुवात करा. अभ्यासानुसार दररोज एक चमचा (सात ग्रॅम्स) ग्राउंड फ्लेक्स सीड्समध्ये दोन ग्रॅम फायबर असते. त्याचे फायदेशीर परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे या बिया रामबाण उपाय ठरू शकतात. अंबाडीच्या बिया कधीही कच्च्या ठेवू नका. फायटिक अॅसिड नष्ट करण्यासाठी ते नेहमी भाजून घ्या,” असेही त्या नमूद करतात. उच्च रक्तदाब व वजन कमी करण्यासाठी अंबाडीच्या बिया उपयुक्त ठरू शकतात. तसेच या सेवनाने बीएमआय आणि पोटावरील चरबीही कमी होऊ शकते.
अंबाडीच्या बियांमध्ये प्रथिने, फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स चांगल्या प्रमाणात आढळतात. या बिया कोणत्याही खाद्यपदार्थात घालून सेवन केल्या जाऊ शकतात. या बियांमध्ये विशेषतः थायमिन, बी व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त असते; जे ऊर्जा चयापचय वाढवण्यासोबत पेशींच्या कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अंबाडीच्या बियांमुळे LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्याचसोबत चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. म्हणजेच अंबाडीच्या बिया रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात आणण्यास मदत होते.
खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अंबाडीच्या बिया खूप फायदेशीर आहेत. बियांमध्ये फायबरव्यतिरिक्त असे घटक आढळतात; जे पित्त आम्लांना एकत्र बांधण्याचे काम करतात; ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल सहज कमी होऊ लागते. त्यामुळे पचनक्रियाही सुधारते. त्याचप्रमाणे वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या फळांचा आहारात समावेश करू शकता. खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करीत राहून नियमित व्यायामही करीत राहा.