“कॅमोमाइल – बोलायलाच किती अवघड आहे गं..आणि काय करायचं नेमकं याचं”? शिवांगीने थोडं कुतूहलाने विचारलं.
“फुलं गरम पाण्यात उकळून नंतर पाणी प्यायचं”
“दिवसात गुलाबाच्या पाकळ्या रात्री कॅमोमाइल – मला साधारण फ्लोरल डाएट सुरु आहे असंच वाटतंय”.
यावर आम्ही दोघीही हसलो .
मी म्हटलं आहे खरंच फ्लोरल डाएट. मुद्दा हा आहे की तुला बरं वाटायला हवं.
शिवांगी असं म्हणाली आणि माझ्या डोक्यात फुलं आणि त्यांच्या आहारातील उपयोगाबद्दलचं विचारचक्र सुरु झालं.
फुलांचे रंग आणि त्यात असणाऱ्या विविध पोषकतत्वांबद्दल सध्या खूप संशोधन सुरु आहे. वेगवेगळ्या फुलांच्या अर्कामध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे शरीराचे तापमान आणि पचन संस्थेचे आरोग्य उत्तम राखले जाते. आज त्याचबद्दल थोडंसं जाणून घेऊ.
आणखी वाचा: Health Special: वेदना झोपेला आणि झोप वेदनेला म्हणजे काय?
जास्वंद
गणपतीला आवडणारं फूल म्हणून जास्वंदाचं महत्त्व आहे. त्याबरोबरच टपोऱ्या देखण्या फुलांच्या पाकळ्यांमध्ये अनेक पोषकतत्त्वे आहेत. जास्वदांमध्ये बीट कॅरोटीन,क जीवनसत्त्व आणि अँथोसायनिन यांचं मुबलक प्रमाण असतं.जास्वंदाच्या फुलाचा चहा किंवा पाणी उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना अत्यंत फायदेशीर आहे. केवळ शारीरिक नव्हे तर मासिक स्वास्थ्यासाठी जास्वदांचे पाणी उपयुक्त आहे. ज्यांना पोटात जळजळ किंवा अति तिखट पदार्थ खाल्ल्यांनंतर काहीतरी थंड प्यावंसं वाटतं त्यांनी जास्वदांचे पाणी जरूर प्यावे.
आणखी वाचा: Health Special: ‘हा’ आहे हॅपी डाएटिंगचा फंडा
गुलाब
गुलाबाच्या पाकळ्या अनेक आहारतज्ञांच्या आवडत्या आहेत. त्यांचे वर्षानुवर्षे आहारशास्त्रातील उपयोग देखील प्रसिद्ध आहेत . कोरड्या गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये जीवनसत्त्व क, अ , इ आणि कॅल्शिअम यांचे उत्तम प्रमाण आढळून येते. अलीकडेच केलेल्या संशोधनानुसार गुलाबाच्या पाकळ्यातील अत्यल्प प्रमाणात लोह असल्याचे देखील आढळून आले आहे. ज्यांना पोटाचे विकार आहेत त्यांनी गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात भिजवून ते पाणी दिवसातून किमान एक वेळा प्यावे. गुलाबाच्या पाकळ्यांचा आहारात समावेश केल्यास चेहऱ्यावरील मुरुमे कमी होण्यास आणि तजेलदार त्वचा कायम राखण्यास मदत होऊ शकते.
शेवंती
एपीजेनीन , क्लोरोजेनिक ऍसिड , ल्युटीओनिन या बायोऍक्टिव घटकांमुळे यकृताचे स्वास्थ्य राखण्यासाठी शेवंतीचे फूल महत्वाचे आहे . दिवसातून एकदा शेवंतीच्या फुलाचे पाणी प्यायल्यास पचनक्रिया सुधारते. शरीरातील इन्शुलिन चे प्रमाण कमी करण्यासाठी देखील या फुलांच्या पाण्याचा वापर केला जातो. पिवळ्या शेवंतीच्या फुलाचा अर्क वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे मात्र अति सेवनामुळे खूप थकवा येणं किंवा पोटाचे आरोग्य बिघडणं असे परिणाम देखील काही लोकांमध्ये आढळून आलेले आहेत.
दांडेलीओन
पिवळसर रंग असणाऱ्या या फुलामध्ये पोटॅशिअम आणि काही स्निग्धांशाचे प्रमाण मुबलक आढळते. शरीरातील कोलेस्टेरॉल आणि विशेषतः ट्रायग्लिसेराईड्स चे प्रमाण कमी करण्यास या फुलांच्या चहाचा उपयोग होतो. तसेच डोळ्यांचे विकार कमी करण्यासाठी दांडेलीओन फुलाचा अर्क अत्यंत उपयुक्त आहे . विशेषतः सध्या स्क्रीन -टाइम वाढल्यामुळे सातत्याने संगणकासमोर काम असणाऱ्या व्यक्तींनी दिवसातून किमान १ वेळा या फुलांचे पाणी जरूर प्यावे.
कॅमोमाइल
कॅमोमाइल चहा गेली अनेक वर्षे वजन कमी करण्यासाठी प्यायला जातो . परंतु हे फूल गुलाबाच्या फुलांइतकेच मानवी शरीराला गुणकारक आहे. झोपेच्या तक्रारी असणाऱ्यांसाठी कॅमोमाइल वरदान आहे.मानसिक ताण किंवा शारीरिक ताण कमी करण्यासाठी देखील कॅमोमाइल परिणामकारक आहे. झोपेच्या गोळ्या घेणाऱ्यांनी कॅमोमाइल चहा नक्की पिऊन पाहावा. मात्र कॅमोमाइलचे प्रमाण दिवसातून १ कप इतकेच मर्यादित असायला हवे.
हे झालं काही महत्त्वाच्या फुलांबद्दल !
नेहमीच्या आहारात किमान एकदा यापैकी कोणत्याही फुलाचा समावेश केल्यास आरोग्यवर्धक परिणाम होऊ शकतो. फुलांचा चहा किंवा पाणी कसे तयार करावे. एखाद्या फुलाच्या ५ ते ६ पाकळ्या पाण्यात उकळाव्यात आणि ते पाणी प्यावे. लहान फूल असेल तर ३-४ फूल पाण्यात उकळून पाणी प्यावे. शक्यतो या पाण्यात साखरेचा किंवा गुळाचा वापर करू नये.