Foamy Urine causes : शरीर विविध आजारांचे संकेत आपल्याला वेगवेगळ्या लक्षणांच्या माध्यमातून देत असते. यातील अनेक लक्षणं आपल्याला लघवीच्या माध्यमातूनही ओळखता येतात. जसे की, कावीळची लक्षणं अनेकदा लघवीच्या रंगावरून ओळखली जातात. अगदी त्याचप्रकारे काही आजारांची लक्षणंदेखील लघवीच्या माध्यमातून दिसून येतात. लघवीतून फेस येणं ही गोष्ट सामान्य असली तरी ती वारंवार होत असल्यास हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. परंतु, लोक हे सामान्य असल्याचे समजून दुर्लक्ष करतात.
याच विषयावर आज द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना फंक्शनल मेडिसिन प्रॅक्टिशनर डॉ. शर्ली कोह यांनी सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. शर्ली कोह म्हणाल्या की, लघवीतून फेस येणं ही सामान्य गोष्ट असली तरी तुम्ही शरीर हायड्रेट ठेवलं पाहिजे. लघवीला झाल्यास ती रोखण्याचा प्रयत्न करू नका, शक्य तितक्या लवकर ती पास करा, यामुळे फेस येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
पण, इतकी काळजी घेऊनही लघवीतून वारंवार फेस येऊ लागल्यास हे शरीरातील प्रथिनांच्या कमतरतेमुळे होऊ शकते. अशावेळी तुम्ही डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे.
यावर मीरा रोडमधील वोक्हार्ट हॉस्पिटल्समधील कन्सलटंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. आशुतोष बघेल म्हणाल्या की, लघवीतून कधी ना कधी फेस येणे सामान्य असू शकते, परंतु लघवीमध्ये वारंवार फेस येत असेल तर हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
सामान्यपणे लघवीच्या जलद प्रवाहामुळेही फेस तयार होतो. तसेच प्रोटीन्युरिया किंवा मूत्रपिंडाच्या समस्या, शरीरातील प्रोटीनची कमतरता, यामुळेही लवघीमध्ये वारंवार फेस येण्याची समस्या जाणवू शकते, असेही डॉ. बघेल म्हणाल्या.
डॉ. शर्ली कोह (@drshirleykoeh) यांनी शेअर केलेली पोस्ट
निर्जलीकरणामुळेही खूप गडद रंगाची आणि फेसयुक्त लघवी होऊ शकते. “काही दुर्मीळ प्रकरणांमध्ये, कोलोवेसिकल फिस्टुला किंवा UTIs (मूत्रमार्गाचा संसर्ग) यांसारख्या समस्यांमुळेही असे होऊ शकते. सूज, थकवा किंवा लघवीच्या रंगातील बदल यांसारख्या लक्षणांसह लघवीतून वारंवार फेस येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका,” असेही डॉ. बघेल यांनी नमूद केले.
अधिक चांगल्या आणि प्रभावी उपायासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण डॉक्टर तुमच्या स्थितीचे मूळ कारण समजून घेत त्याचे मूल्यांकन करू शकतात. निरोगी जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करा. यासाठी पुरेसे पाणी पिऊन हायड्रेट राहा, मिठाचे सेवन कमी करा, निरोगी आहाराचे सेवन करा, कारण या प्रतिबंधात्मक उपायांच्या माध्यमातून तुम्हाला लघवी संबंधित आजारांपासून दूर राहता येऊ शकते, असेही डॉ. बघेल म्हणाले.
(टीप- वरील बातमी आरोग्यतज्ज्ञांनी माहितीच्या आधारे लिहिली आहे, परंतु कोणतेही उपाय करण्याअगोदर डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.)