पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच उत्तराखंडमधील देहराडून) येथे ३८ व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन केले. या कार्यक्रमातील भाषणादरम्यान मोदींनी भारतातील वाढत्या लठ्ठपणाच्या पातळीबद्दल आणि फिटनेसच्या महत्त्वाबद्दल भाष्य केले. त्यानंतर, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडिया पोस्टमध्ये लठ्ठपणाशी लढण्यासाठी चार प्रमुख टिप्स सांगितल्या आहेत.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी अक्षयने सांगित्या खास टिप्स
अक्षयने ट्विटमध्ये म्हटले की, हे अगदी खरं आहे!! मी गेल्या अनेक वर्षांपासून हेच सांगत आहे. पंतप्रधानांनी स्वतः ते अगदी योग्य पद्धतीने मांडले आहे हे मला खूप आवडले. आरोग्य आहे तर सर्वकाही आहे. लठ्ठपणाला लढा देण्याचे सर्वात मोठे हत्यार (साधन)
१. पुरेशी झोप
२. ताजी हवा आणि सूर्यप्रकाश
३. प्रक्रिया केलेले अन्न टाळा, तेलाचा वापर कमी करा. चांगले देशी तूप वापरा.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे…
४) हालचाल करा, व्यायाम करा. कोणत्याही प्रकारचे वर्कआऊट करा, पण करा. नियमित व्यायाम तुमचे जीवन बदलेल. याबाबतीत माझ्यावर विश्वास ठेवा आणि व्यायाम करा. जय महाकाल @narendramodi”
वजन व्यवस्थापनात ‘या’ चार गोष्टी कसे योगदान देतात हे समजून घेण्यासाठी द इंडियन एक्स्पेसने तज्ज्ञांशी संवाद साधला.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी खरंच या चार गोष्टी उपयूक्त ठरतात का? तज्ज्ञ काय म्हणाले
चेन्नई येथील द क्लेफ्ट अँड क्रॅनियोफेशियल सेंटर आणि श्री बालाजी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या नोंदणीकृत आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, “पुरेशी झोप, नियमित शारीरिक हालचाल, ताज्या हवेत राहणे आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळणे हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत, कारण ते चयापचय नियंत्रित करण्यास, भूक नियंत्रित करण्यास आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत करतात.”
झोप
दीपलक्ष्मी यांच्या मते, “चांगल्या गुणवत्तेची झोप ही भूकेच्या हॉर्मोन्सचे घरेलिन आणि लेप्टिनचे योग्य संतुलन सुनिश्चित करते. जास्त खाणे टाळण्यास मदत करते. झोपेचा अभाव उच्च-कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा वाढवतो आणि इन्सुलिन प्रतिरोधकतेस (insulin resistance) कारणीभूत ठरतो, ज्यामुळे वजन व्यवस्थापन कठीण होते.”
नियमित शारीरिक हालचाल
दीपलक्ष्मी यांनी सांगितले की, “नियमित शारीरिक हालचाल केल्याने कॅलरीज (ऊर्जा) वापरल्या जातात आणि चयापचय सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. “हे इन्सुलिन संवेदनशीलता (insulin sensitivity) वाढवते, शरीरात फॅट्स साठवून ठेवणे कमी करते आणि एंडोर्फिन (हॉर्मोन) सोडते, जे तणाव पातळी कमी करण्यास आणि भावनिक झाल्यास खाणे टाळण्यास मदत करते. शारीरिक हालचालीमुळे स्नायूदेखील बळकट होतात, ज्यामुळे विश्रांतीदरम्यान शरीराचा चयापचय दर वाढतो, ज्यामुळे विश्रांतीच्या वेळीदेखील जास्त कॅलरी वापरल्या जातात.”
ताजी हवा आणि सूर्यप्रकाश
ताजी हवा आणि सूर्यप्रकाश वजन व्यवस्थापनास कशी मदत करतो असे विचारले असता त्या म्हणाल्या, “त्यामुळे व्हिटॅमिन डीची पातळी वाढते, जी चांगल्या फॅट्स चयापचयाशी संबंधित असते. कोवळ्या उन्हात वेळ घालवणेदेखील शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देते, कॉर्टिसोल (फॅट्स जमा होण्यास प्रोत्साहन देणारा ताण संप्रेरक) ची पातळी कमी करते आणि सर्केडियन लय नियंत्रित करून झोपेची गुणवत्ता सुधारते.”
प्रक्रिया केलेले अन्न टाळा
दीपलक्ष्मी यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, “प्रक्रिया केलेले अन्न आणि अस्वास्थ्यकर फॅट्स (unhealthy fats) खाणे टाळल्याने वजन कमी होण्यास मदत होते. “अत्याधिक प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये बहुतेकदा साखर, अस्वास्थ्यकर फॅट्स (unhealthy fats) आणि पोषणमुल्य नसलेल्या कॅलरीजचे (empty calories) प्रमाण जास्त असते, ज्यामुळे जास्त कॅलरीजचे सेवन केले जाते आणि दाहकता वाढते आणि तृप्ततेची भावना कमी होते. देशी तूप, काजू आणि बिया यांसारख्या पदार्थांचे सेवन केल्यास फायबर आणि निरोगी फॅट्सयुक्त संपूर्ण पदार्थ निवडल्याने पोट भरण्यास मदत होते, रक्तातील साखरेची पातळी स्थिर होते आणि जास्त अन्न खाणे टाळता येते.”