डॉ. किरण नाबर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज एका महत्त्वाच्या त्वचारोगावर मला आपणा सगळ्यांचे लक्ष वेधायचे आहे. या आजाराची साथ-सदृश्य परिस्थिती गेले आठ ते दहा वर्षे संपूर्ण भारतामध्ये सुरू आहे. घरोघरी या आजाराचे एक किंवा अधिक रुग्ण आढळत आहेत. आम्हा  त्वचारोग तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांपैकी जवळजवळ दहा ते वीस टक्के रुग्ण या आजाराचे आहेत. यावरून तुम्हाला या आजाराच्या तीव्रतेची जाणीव होईल. या  आजाराला हिंदी मध्ये दाद किंवा दिनाय तर इंग्रजीमध्ये रिंगवर्म व शास्त्रीय भाषेत Tinea किंवा  Dermatophyte  इन्फेक्शन असे म्हणतात. Tinea हे एका किड्याचं लॅटिन नाव आहे. हा किडा कपड्यांना किंवा घोंगडीला गोल भोक पाडतो व ही भोकं त्वचेवरील नायट्यासारखी गोल असल्यामुळे त्यांना Tinea  हे नाव प्राप्त झाले आहे. 

आणखी वाचा: Health Special: पावसाळा आणि पित्तप्रकोप यांचा संबंध काय?

आजाराची कारणे

हा आजार एक प्रकारच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी मुख्यतः एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रत्यक्ष संपर्काने किंवा रुमाल, फणी, टोपी, टॉवेल, नॅपकिन, कपडे यांच्यामार्फत संक्रमित  होते. कधी कधी ही बुरशी प्राण्याकडून माणसाला मिळते किंवा कधीकधी मातीतूनही आपल्या त्वचेवर संक्रमित होऊ शकते. बुरशीचा आजार हा नेहमी ओलाव्यामुळे फोफावतो. त्यामुळे हवामान उष्ण व दमट असते तिथे हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. तसेच जास्त घट्ट व नायलॉनचे कपडे वापरणे,  घट्ट जीन्स वापरणे, स्थूलपणामुळे जांघेत घाम साठून राहणे यामुळे  हा आजार वाढीस लागतो. तसेच ज्या व्यक्तींचे पाण्यामध्ये काम जास्त असते उदाहरणार्थ गृहिणी, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, माळी, धोबी तसेच ज्यांना आपल्या कामासाठी सतत बाहेर फिरावे लागते अशांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. 

आणखी वाचा: Health Special : तुम्ही रोज पेनकिलर घेत आहात ? वेदनाशामक औषधांचे ‘हे’ दुष्परिणाम माहीत आहेत का?

पूर्वी हा जंतू साध्या मलमांना दाद द्यायचा. आता हा जंतू देखील हटवादी झाला आहे व कधी कधी तर तोंडावाटे घ्यायच्या बुरशीविरोधी औषधांनादेखील हा दाद देत नाही. त्वचारोगांना आपण द्यावे तेवढे महत्त्व देत नाही व त्यामुळे असा काही आजार झाल्यास आपण डॉक्टरकडे न जाता थेट औषधाच्या दुकानातून मलम  आणतो. दुकानदार काही डॉक्टर  नसतो व त्याला रुग्णाच्या  आजाराबद्दल काही  कल्पना  नसते.  पण रुग्णाच्या आग्रहाखातर ज्या मलमामध्ये बरीच औषधे एकत्र आहेत ते मलम दुकानदार अशाव्यक्तीला देतो. त्याला वाटते यातील कुठल्यातरी औषधाने रुग्णाला बरं वाटेल. पण अशा प्रकारच्या मिश्रणामध्ये स्टिरॉइड  हमखास असते व बहुदा ते फार तीव्र स्वरूपाचे असते. असे मलम लावल्यावर रुग्णाला सुरुवातीला बरे वाटते. कारण स्टिरॉइडमुळे त्या भागावरील पुरळ तसेच खाज कमी होते. पण स्टिरॉइड त्वचेची रोगप्रतिकारशक्ती  कमी करतं व त्यामुळे प्रत्यक्षात तेथील बुरशीचे जंतू मात्र जास्त फोफावतात. काही दिवसांनी रुग्ण ते मलम वापरायचं बंद करतो. त्यानंतर हा नायटा खरं तर आधीपेक्षा जास्त प्रमाणात वाढतो व त्यानंतर परत जरी ते मलम लावले तरी त्याचा उपयोग होत नाही.  किंबहुना आता त्या मलमाचे विविध दुष्परिणाम दिसू लागतात. तिथली त्वचा पातळ होते. या त्वचेवर स्ट्रेचमार्क येतात. तिथे रक्त जमा होते. कधी कधी जखमा देखील होतात. 

आणखी वाचा: Health Special: वातप्रकोप वाढण्यामागचे महत्त्वाचे कारण काय?

आजाराची लक्षणे

हा आजार तान्ह्या बाळापासून ते वृद्धापर्यंत कोणालाही होऊ शकतो. हा आजार पूर्वी मुख्यत्वे जांघेत किंवा कमरेवर पाहायला मिळायचा. हल्ली हा आजार अंगावर कुठेही पहावयास मिळतो. जांघा, कंबर, बसायचा पृष्ठभाग, काखा , स्त्रियांच्या स्तनाखालील भाग,  पाठ, चेहरा, कान तसेच हात, पाय, व डोक्यावर देखील हा आजार पहावयास मिळतो. संसर्ग झालेल्या जागी प्रथम एक लाल खाजरी पुळी येते व ती काही दिवसातच पुढे पुढे वाढू लागते व गोल लालसर चट्टा तयार होतो. तो बांगडी सारखा किंवा भूमितीतील  कौसासारखा दिसतो. जांघेमध्ये तो हत्तीच्या कानासारखाही दिसतो. त्यामुळे त्याला गजकर्ण असे नाव आहे. या आजारामध्ये बहुतेक वेळा प्रचंड खाज असते. केसातील नायटा हा विशेषतः  लहान मुलांमध्ये बघितला जातो. त्यांचे केस चट्ट्याच्या स्वरूपात जातात व तिथे पांढरे पापुद्रे किंवा खाजऱ्या पुळ्या दिसतात. कधी कधी हातापायाच्या एखाद दुसऱ्या नखालाही नायटा होऊ शकतो व त्यामुळे नखाचा रंग बदलतो व  नख जाड बनते किंवा नख उचकटल्यासारखे होऊन त्याखाली पोकळ जागा तयार होते. ज्यांना हातापायाचा नायटा असतो त्यांना कधी कधी नखांचाही नायटा होऊ शकतो.

काय काळजी घ्यावी?

ओलाव्यामुळे या आजाराला खतपाणी मिळते. त्यामुळे अंग सुके ठेवणे ही आपली प्रार्थमिकता असली पाहिजे. अंघोळीला कोमट पाणी घ्यावे जेणेकरून आंघोळ केल्यावर जास्त घाम  येणार नाही. त्यानंतर सुक्या टॉवेलने अंग पूर्ण कोरडे करावे. अंडरवेअरचा कमरेकडील इलॅस्टिकचा भागहा जास्त रुंद नसावा कारण इलॅस्टिक हे रबर असते व ते घाम शोषत नाही. रात्री झोपताना अंडरवेअर काढून ढिली कॉटनची नाडी असलेली चड्डी वापरावी. अंडरवेअरला अधेमधे इस्त्री मारावी किंवा ती  जास्त गरम पाण्यातून काढावी. घट्ट कपडे, नायलॉनचे किंवा घाम न शोषणारे कपडे, घट्ट जीन्स वापरणे टाळावे. काहीजण अंडरवेअरवर हाफ पॅन्ट व त्यावर फुल पॅन्ट घालून बाहेर पडतात. यामुळे बुरशीला वाढीसाठी पोषक वातावरण मिळते. हे टाळणे आवश्यक आहे. हात पाय धुतल्यानंतर देखील सुक्या टॉवेलने किंवा नॅपकिनने ते पूर्णपणे कोरडे करणे आवश्यक आहे. 

पाय देखील धुतल्यानंतर फक्त पायपुसण्याला न पुसता पायाचा वरचा भाग तसेच बेचक्यातील भाग हा सुक्या नॅपकिननी पुसणे आवश्यक आहे. ज्यांना हा आजार झाला असेल त्यांनी आपला नॅपकिन, टॉवेल वेगळा ठेवावा. तसेच जास्त गरम पाण्यात टाकावा. ज्यांना केसांमध्ये नायटा झाला असेल त्यांची फणी व टोपी इतरांनी वापरू नये. पार्श्वभाग टिश्यू पेपरने किंवा कपड्याने कोरडा करणे आवश्यक आहे. आजकाल तरुणाईचे जीन्स शिवाय चालत नाही. त्यांनी जीन्सला आतल्या बाजूने इस्त्री मारणे आवश्यक आहे. पावसाळ्यात आजचा कपडा उद्या सुकत नाही. त्यामुळे या मोसमात जास्त कपडे ठेवावेत पण कपडे कोरडेच वापरावेत.

पावसात कधीकधी कार्यालयात जातानाच भिजायला होते. अशा वेळी कपड्याचा एक जोड शक्य असल्यास कार्यालयात ठेवावा. अंडरवेअर शक्यतो बॉक्स टाईप वापरावी. मनगटावरील दोरा, कमरेचा करगोटा, गळ्यातील तावीत या गोष्टी काढाव्यात. कारण त्यामध्ये अंघोळीनंतर पाणी राहते. घरातील ज्यांना हा आजार झाला आहे त्यांचे कपडे इतरांच्या कपड्यासोबत न टाकता वेगळे गरम पाण्यातून काढावेत. त्वचेच्या कुठल्याही आजारासाठी डॉक्टरांना व विशेषतः त्वचारोगतज्ञांना न दाखवता थेट औषधाच्या दुकानातून मलमे आणून लावणे टाळावे. कारण त्यामुळे आजार तर जात नाहीच  पण त्या मलमातील स्टिरॉइडमुळे त्वचेवर दुष्परिणाम मात्र दिसू लागतात. नायट्याची साथ बरेच दिवस चालू राहण्याचे व तो हटवादी बनण्याचे हेही एक महत्त्वाचे कारण आहे.

वैद्यकीय उपचार

गेली काही वर्षे नायटा हा एक चिवट व हटवादी आजार बनला आहे. त्यामुळे त्या आजाराचा उपचार हा डॉक्टरांच्या व विशेषतः त्वचारोगतज्ञांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. यामध्ये वरील नमूद केलेली काळजी घेण्यास डॉक्टर सांगतातच, पण त्याबरोबरच बुरशीविरोधक मलमे व तोंडावाटे  घ्यायच्या बुरशीविरोधक गोळ्या किंवा कॅप्सूल दिल्या जातात. गरज भासल्यास मॉईश्चरायजर पण दिले जाते. मलम न चुकता दोन वेळ लावणे आवश्यक आहे व गोळ्याही साधारण  दीड ते तीन महिने सलग घ्याव्या लागतात. गोळ्या बंद केल्यानंतरदेखील पुढे एखादा महिना मलम सुरू ठेवावे लागते. कुटुंबामध्ये जेवढ्या लोकांना हा आजार झाला आहे त्या सगळ्यांनी याचा उपचार एकाच वेळी करणे आवश्यक असते. नाहीतर एकाचा आजार परत दुसऱ्याला होऊ शकतो. 

नायटा हा पूर्वीसारखा फक्त मलमाने बरा होणारा आजार राहिलेला नाही. त्यासाठी डॉक्टरांच्या व गरज भासल्यास त्वचारोगतज्ञांच्या सल्ल्याने व ते सांगतील तेवढ्या कालावधीसाठी औषधोपचार घेणे आवश्यक आहे. मित्र, नातेवाईक किंवा केमिस्टच्या  सल्ल्याने केलेला औषधोपचार  महाग पडू शकतो. कारण चुकीच्या मलमांचा वापर केल्यामुळे योग्य उपचार जास्त काळ करावे लागतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fungal infection skin disease hldc psp
Show comments