ऑर्कुटपासून सुरू झालेला सोशल मीडिया, गुगल सर्च इंजिन, ऑनलाईन गेमिंगचं जग आणि अगदी पॉर्न इंडस्ट्रीही आता पूर्वीसारखी राहिलेली नाहीये. सायबर स्पेस गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदलत गेली आहे. त्याचा बदलण्याचा आणि माणसांवर प्रभाव टाकण्याचा वेग इतका तुफान आहे की कालपर्यंत जे ‘इन’ होतं ते आता ‘आऊटडेटेड’ झालेलं आहे. या वेगाशी दोन हात करणं सगळ्यांना शक्यच नाही, पण निदान नेमकं बदलतंय काय हे तरी आपण समजून घेऊ शकतो.
गेल्या काही वर्षांतल्या माझ्या अभ्यासात मला जाणवलेला मोठा बदल म्हणजे सायबर स्पेस ग्राहक म्हणून लहान मुलं, टीनएजर्स यांना टार्गेट करतंय आणि मुलांबरोबर घडणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होते आहे. ‘सायबर सिक्युरिटी’ हा स्वत्रंत विषय आहे; पण निदान ग्राहक म्हणून लहान मुलांना कशा पद्धतीने टार्गेट केलं जातंय हे समजून घेतलं पाहिजे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत गेमिंग प्लॅटफॉर्म्स वेगळे, पॉर्न बघायचं असेल तर ‘तसल्या’ वेगळ्या साईट्स बघाव्या लागत. शिवाय त्या लपून छपून बघाव्या लागत. पण गेल्या काही वर्षांत हे चित्र झपाट्याने बदलत गेलं आहे. कसं ? तर कालपर्यंत गेमिंग आणि पॉर्न यांचा जवळचा संबंध आहे असं आपण म्हणत होतो, तर आता गेमिंग आणि पॉर्न हातात हात घालून आपल्या कोवळ्या वयातल्या मुलांना टार्गेट करू बघतायत असंच म्हणावं लागेल. आता पॉर्न बघायचं तर ‘तसल्या’ वेगळ्या साईट्सवर जायची गरज नाही, लपून छपून बघायचीही गरज नाही. कारण आता पॉर्न इंडस्ट्रीच मोठ्या प्रमाणावर गेमिंगमध्ये आणि सोशल मीडियावर, लाईव्ह स्ट्रीमिंग अॅप्समध्ये उतरली आहे आणि ही प्रचंड काळजी करावी अशी गोष्ट आहे.
आणखी वाचा: Mental Health Special: मुलांचा स्क्रीन टाईम पालकांमुळेच वाढतोय का?
कालपर्यंत गेमिंगमध्ये पॉर्न शिरलेलं नव्हतं का?
तर होतंच. गेम्समधल्या ॲनिमेटेड स्त्री व्यक्तिरेखांचे देह, त्यांची मापं, त्यातली नग्नता काही अंशी होतीच. पण आता पॉर्न इंडस्ट्रीइतकंच हे सगळंही उघडं वाघडं होत समोर येतंय. आणि यात काळजी करण्याची गोष्ट अशी की, या सगळ्या गेमिंग पॉर्न इंडस्ट्रीचा प्रमुख ग्राहक वर्ग प्री टीन आणि टीनएजर तरुण तरुणी आहेत.
‘माईंड गीक’ आणि ‘पॉर्न हब’सारख्या हार्डकोअर पॉर्न कन्टेन्ट तयार करणाऱ्या कंपन्या आता ‘व्हिडीओ गेमिंग पॉर्न’ या प्रकारात उतरल्या आहेत. जापनीज ॲनिमे (एक प्रकारची ॲनिमेशन कॅरेक्टर्स, ज्यांचा उगम जपानचा आहे.) मोठ्या प्रमाणावर ॲनिमेटेड पॉर्नमध्ये वापरली जातात आणि त्यातच आता गेमिंग आणि पॉर्न एकत्र झाल्यामुळे आपण कार्टून बघतोय, गेमिंग करतोय की पॉर्न बघतोय हे कळेनासं होतं इतकं हे गंभीर प्रकरण आहे.
अमेरिकेतल्या ‘नॅशनल सेंटर फॉर सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन’ने केलेल्या पाहणीत २०१७ मध्ये ७८० गेम्समध्ये मोठ्या प्रमाणावर नग्नता आढळून आली होती, तर २०१८ मध्ये हा आकडा १६०० गेम्सपर्यंत पोचलेला होता. गेमिंगमध्ये पॉर्न आणि नग्नता झपाट्याने घुसली आहे आणि त्याचे दुष्परिणाम मानसिक, भावनिक आणि सामाजिक पातळीवर सोसावे लागू शकतात. हे गेम्स, व्हिडीओ गेम्स, पॉर्न गेम्स, सेक्स गेम्स, सेक्स स्टिम्युलेटर अशा वेगवेगळ्या नावांनी प्रमोट केले जातात. चूज युअर हॉटी, बिल्ड हर अँड देन फक हर, ३D पॉर्न गेम अशीही काही नावं वापरली जातात. एक लक्षात घेतलं पाहिजे, ते म्हणजे यात फक्त गेम्स नसतात, तर लैंगिक हिंसेचे खेळ असतात. किंवा अनेकदा स्त्रियांच्या शोषणाचे हे खेळ असतात. ग्राफिक्समुळे हे सगळं प्रचंड आकर्षक वाटण्याची दाट शक्यता असते. मुलांना कार्टून्स वाटून ते पॉप अप लिंक्सवर क्लिक करतात आणि थेट या गेम्सपर्यंत जाऊन पोचतात. तर टीनएजर्सना यात कसलं तरी विलक्षण थ्रिल काही वेळा सापडतं.
आणखी वाचा: Mental Health Special: ‘या’ कारणांमुळे मुलं होत आहेत एकलकोंडी
मुळात अशा प्रकारात गेमिंगबरोबर पॉर्न बघायची चटक लागण्याची शक्यता अधिक असते, पण त्याचबरोबर मुलांची लैंगिकतेकडे बघण्याची दृष्टी चुकीच्या पद्धतीने विकसित होण्याची फार जास्त शक्यता असते. अशा गेम्स पॉर्नच्या साईट्सवरचं ट्रॅफिक दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. १० ते १८ वयोगटातल्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून हा नवा ग्राहक टिपण्याच्या प्रयत्नात पॉर्न इंडस्ट्री आहे का अशी शंका यावी, इतकं गेमिंग पॉर्न आक्रमकपणे पसरतंय.
ऑगमेंटेड आणि व्हर्चुअल रिअॅलिटी तंत्रज्ञान जसजसं वापरात येणार आहे तसतसा या गेमिंग पॉर्न प्रकारचा प्रभाव वाढत जाणार आहे. पॉर्न आणि गेमिंग या दोन्ही इंडस्ट्रीचा आकार अक्राळविक्राळ आहे. झपाट्याने वाढणारा आहे. पोर्नोग्राफी इंडस्ट्री गेमिंगपासून व्हर्च्युअल रिॲलिटीपर्यंत फोफावत चालली आहे. ती थांबणार नाही. तसा कुठलाही उद्देश या बाजारांचा नाहीये. वर म्हटल्याप्रमाणे लहान मुलं आणि तरुणतरुणी हेच प्रमुख ग्राहक आहेत.
व्हर्च्युअल रिॲलिटी अनुभवण्यासाठी आता महागडी गॅजेट्स लागतात, सगळ्यांना ती परवडणारी नाहीयेत, म्हणजे सध्या परवडणारी नाहीयेत. पण आपण हे विसरता कामा नये की तंत्रज्ञान झपाट्याने सर्वसामान्यांच्या हातात येतं. स्मार्ट फोन आले तेव्हा तेही प्रचंड महाग होते, मोबाईल आला तेव्हा इनकमिंगसाठीही आपण पैसे मोजलेले आहेत. आजच्याइतका डेटा स्वस्त नव्हता. आणि ही फार जुनी गोष्ट नाहीये. गेल्या दहा वर्षांतली आहे. त्यामुळे आज जरी व्हर्च्युअल रिॲलिटी ॲडल्ट कन्टेन्ट सगळ्यांना परवडणार नाही, आणि काही मोजक्यांपुरतंच हे सगळं मर्यादित राहिलं असं वाटत असलं तरीही हे सगळं आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये कधी येऊन पोचेल हेही आपल्याला समजणार नाही. आणि या सगळ्या गदारोळात पालक म्हणून आपण जागरूक असणं, ऑनलाईन गेमिंगमध्ये आपलं मूल नक्की काय आणि कोणत्या प्रकारचे गेम्स खेळतंय, ते गेम्स खेळणं खरंच जरुरीचं आहे का, मूल किती काळ गेम्स खेळतंय, ऑनलाईन लाईव्ह चॅट्समध्ये कुणाच्या संपर्कात आहे या सगळ्या बाबतीत सजग राहण्याचे दिवस आहेत.