लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे जण आज गेमिंगमध्ये अडकलेले दिसतात. अगदी साठी आणि सत्तरीच्या आज्या आणि आजोबाही कँडी क्रशवर कोण कुठल्या लेव्हलवर खेळतो आहे याची जोशात चर्चा करताना दिसतात. अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी वेळ घालवण्याचं गेमिंग हे मोठं माध्यम बनलेलं आहे. मुलांच्या जगात तर मोबाईल गेम्स फार लहान वयात शिरतात आणि त्याविषयी काळजी वाटण्याऐवजी आमची मुलं किती मस्त गेमिंग करतात हे अनेक पालक कौतुकाने सांगत असतात. जेव्हा मुलांचं वर्तन बदलायला लागतं, ती अभ्यासात मागे पडायला लागतात अचानक आपल्या मुलांचा वेळ गेमिंगमध्ये जातोय हे लक्षात येतं आणि पालक घायकुतीला येतात पण तोवर त्यांनी केलेल्या कौतुकाचा जो काही परिणाम व्हायचा असतो तो झालेला असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नियमित गेमिंग करणाऱ्या काही मुलामुलींशी कामाच्या निमित्ताने बोलणं होतंच. त्यातला एक जण म्हणाला, “रोज अर्धा तास या बोलीवर मी सुरुवात केली होती आणि आठ तासांवर कधी गेलो माझं मलाही समजलं नाही. गेमिंग करता यावं यासाठी घरी खोटं बोललो, अभ्यास बुडवला, क्लासेसला दांड्या मारल्या, झोप मोडीत काढली. आता वाटतंय, मी किती गोष्टींना मुकलो. नापास व्हायला लागलो तेव्हा जाग आली. पण तोवर उशीर झाला होता. आजही गेमिंगची इच्छा अनेकदा उफाळून येते. मी गेमिंगच्या व्यसनापासून पूर्णतः सुटू शकेन असं मला वाटत नाही.”

आणखी वाचा: मुलं ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात का अडकतात?, ‘ही’ आहेत कारणं

या मुलाचं बोलणं ऐकत असताना एखादा अल्कोहोलिक किंवा ड्रग ॲडिक्ट माझ्याशी बोलतोय असं वाटतं होतं. आपण ‘स्लिप’ होऊ नये याची काळजी घेत जगणारे कितीतरी चेहरे सहज समोर आले आणि पोटात कालवलं. लहान मुलांना गेमिंगसाठी परवानगी देताना हजारदा विचार केलाच पाहिजे, आणि १४-१५ वर्षांच्या पुढच्या म्हणजे टीनएजर मुलामुलींना ‘माहितीपूर्ण निवड’ कशी केली पाहिजे हे शिकवलं पाहिजे. इंटरनेटच्या जगात ‘माहितीपूर्ण निवड’ फार गरजेची असते. गेमिंग करताना, पुढे जाऊन गेमिंग करण्याची इच्छा का बळावते आणि गेमिंग करणारा त्यात का आणि कसा अडकत जाऊ शकतो हे मुलांना माहित असलं पाहिजे.

गेमिंगच्या ॲडिक्शनचे काही ड्रायव्हिंग फोर्सेस आहेत. म्हणजे अशा गोष्टी, ज्यामुळे पुन्हापुन्हा गेमिंग करावंसं वाटतं राहतं आणि पुढे जाऊन मेंदू त्याची सक्ती करायला लागतो. हे लक्षात घेतलं पाहिजे की गेमिंग हे जरी मनोरंजनाचं साधन असलं तरी तो एक व्यवसाय आहे. २०२२ च्या आकडेवारीनुसार गेमिंगची जागतिक बाजारपेठ २३० बिलियन डॉलर्सच्या आसपास होती. ती झपाट्याने वाढते आहे. इतकी प्रचंड मोठी उलाढाल ज्या ज्या व्यवसायात सुरू असते, ते व्यवसाय म्हणजेच गेम्स उभे करताना ग्राहकांनी पुन्हापुन्हा गेम्स खेळले पाहिजेत या मूलभूत तत्त्वावरच ते आधारित असतात. फक्त एकदा एक गेम खेळून ग्राहक निघून गेला आणि परत फिरकलाच नाही तर तो गेम नफा देऊ शकत नाही. याचाच अर्थ ग्राहकाने परतून यायचं असेल, खिळून राहायचं असेल तर त्या पद्धतीचे काही ‘हुक्स’ या गेम्समध्ये बनवताना असणं आवश्यक आहे. आणि ते असतातही.

आणखी वाचा: Mental Health Special: गेमिंग आणि पॉर्नची एकमेकांना संगत?

यातला एक महत्वाचा गळ म्हणजे सतत जिंकत राहण्याची भूक.
सतत जिंकण्याच्या गरजेतून अनेकदा मनोरंजन कमी आणि ताण जास्त तयार होतो. सतत पुढची लेव्हल गाठायची आहे, ती अमुक एक वेळेत पूर्ण झाली नाही तर कुणी दुसरं आपल्या पुढे जाईल ही भीती, मागे पडलो तर काय ही असुरक्षितता तयार होते. सतत जिंकण्याची भूक, स्पर्धा आणि त्यातून निर्माण होणारी असुरक्षितता प्रत्यक्षात ताण कमी करत नाहीत तर वाढवतात. जिंकलो नाही तर? हाय स्कोअर मेंटेन करता आला नाही तर? स्किल्स कमी पडली तर? अशा अनेक कारणांमुळे ताण कमी होण्याऐवजी वाढतो आणि मुलं गेमिंग रिलॅक्सेशनसाठी करत असली तरी ती सतत कावलेली, चिडलेली आणि ताणामुळे दमलेली असतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आपण गेमिंग का करतो आहोत, त्याचे आपल्यावर काय आणि कसे परिणाम होतायेत याकडे बारकाईने बघणं गरजेचं आहे. गेमिंग हे व्यसन आहे हे आता मान्य झालेलं आहे. अशावेळी आपण सहज, वेळ जावा म्हणून किती वेळा गेमिंग करतोय आणि आपल्या मेंदूच्या सक्तीतून, व्यसनातून तर गेमिंग सुरु ठेवलेलं नाहीयेना हे तपासून बघायलाच हवं.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gaming is becoming digital drung among teengagers hldc psp
Show comments