“पल्लवी पुढचे काही दिवस आता गणपतीचे आहेत त्यामुळे माझं डाएट मला नीट फॉलो करता येईल असं काही वाटत नाहीये. प्रज्ञाचा मेसेज आला यावरून तिला म्हटलं की असं गणपतीत तू काय काय खाणार आहेस त्यामुळे तुला वाटतंय की तुझं डाएट बिघडणार आहे?
त्यावर तिने मला थेट कॉल केला आणि म्हणाली ,”हे बघ मोदक हा माझा वीक पॉइंट आहे आणि आपण गोड बंद केलंय. म्हणजे मला माहिती आहे की तू मला मोदक खायला नाही म्हणत नाहीस पण मी एकावर नाही थांबू शकत!” प्रज्ञाच्या या वाक्याने मला त्वरित अनेक मोदकप्रेमींपर्यंत पोहोचवलं .
गणपतीच्या दरम्यान जर मोदकाबद्दल लिहिलं नाही तर मग तर मग काय गंमत आहे नाही का! गणपतीचे दिवस म्हटले की मोदक आणि त्याबरोबर विविध प्रकारचे प्रसादाचे पदार्थ आले. सध्या ग्लुटेन फ्री+ शुगर फ्री + फॅट फ्री या सदरातील प्रसिद्ध गोड पदार्थ म्हणजे मोदक! अनेक खाण्याच्या चकचकीत रेस्टॉरंट्स मध्ये स्वीट डम्प्लिंग या नावाने आपल्याला मोदक नव्या पद्धतीने प्रेमाने खाऊ घातले जातात.
आणखी वाचा: खाण्याच्या पदार्थांची एक्स्पायरी डेट तुम्ही पाहता का?
तर सुरुवात करूया मोदकातील कॅलरीज पासून .
१ मध्यम आकाराचा उकडीच्या मोदकामध्ये खालील पोषकतत्त्वं आढळतात.
ऊर्जा : ३५०-४०० कॅलरीज
प्रथिने- ३ ग्राम
कर्बोदके – ७३. ८ ग्राम
फॅट्स -१० ग्राम
उकडीच्या मोदकासाठीचा जिन्नस सोपा आहे . तांदळाचे पीठ , गूळ ,ताजे खोबरे ,वेलची पूड आणि पाणी. जसं शरीरात लोहाचे प्रमाण कमी असणाऱ्यांनी नक्कीच मोदकाचे सेवन करावे. मोदकाचे सारण , तांदूळ पीठ या सगळ्यात असणाऱ्या कर्बोदकांमुळे विशेषतः यात आढळणाऱ्या शर्करेमुळे मोदकाचा ग्लासेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे मोदकावर किमान प्रमाणात तूप घेणे आवश्यक आहे. मोदक उकडताना हळदीचे पान वापरल्यास हळदीच्या पानांचा उत्तम गंध मोदकाला येतोच शिवाय ग्लासेमिक इंडेक्स कमी होऊन मोदक पचायला हलका होऊन जातो.
आणखी वाचा: Health special:आपल्या शरीराला किती कॅलरीज लागतात?
अनेक ठिकाणी टाळून मोदक तयार केले जातात आणि या मोदकांमध्ये गव्हाचे पीठ वापरले जाते. मोदकासाठीचे पारंपरिक सारण आपण करतोच मात्र त्यात खसखस वापरल्यास मधुमेह असणाऱ्या व्यक्तीदेखील मोदक खाऊ शकतात अर्थात त्यासाठी साखरेची पातळी जाणून आहारात मोदकाचा समावेश करावा .
मोदकातील अन्नघटक स्वतंत्रपणे वेगेवेगळ्या पोषकतत्त्वांनी भरपूर आहेत. शिवाय मोदक तयार करण्याच्या प्रक्रियेत पाणी आणि बाष्प यांचाच वापर होत असल्याने त्यातील मुख्य घटक अबाधित राहतात. उदाहरणार्थ – खोबरं.
खोबरं गुळासोबत शिजवल्याने त्यातील लोह , मेडीयम चेन ट्रायग्लिसेराईड्स , ब्युटिरिक ऍसिड यांचे प्रमाण अबाधित राहते. मोदक खाताना तो स्वतंत्र खाणं म्हणून खाल्ल्यास त्याचे शरीराला उत्तम परिणाम मिळू शकतात. मात्र जेवणानंतर किंवा कशाबरोबर तरी खाल्लेला मोदक विनाकारण ऊर्जेचा अतिरेक निर्माण करतो.
अलीकडे अनेक ठिकाणी सुकामेव्याचे मोदक तयार केले जातात. पारंपारिक मोदकांपेक्षा या मोदकांमध्ये ऊर्जेचे प्रमाण जास्त असतेच शिवाय स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट्सचे प्रमाण देखील अधिक असतं. अनेक ठिकाणी दुधामध्ये मोदकाचे सारण शिजवले जाते. पारंपरिक पाक शास्त्राचे नियम योग्य शास्त्रीय बैठकीतून तयार केले गेले आहेत त्यामुळे विनाकारण त्यात उलथापालथ न करणे उत्तम. नाचणीच्या उकडीचे मोदक आणि तांदळाच्या उकडीचे मोदक ऊर्जा आणि ग्लासेमिक इंडेक्स याबाबत उजवेच आहेत.
अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे प्रमाणाचा ! एका मोदकावर भागत नाही असा डंका पिटताना नियमित व्यायाम विसरून चालणार नाही. दिवसभराच्या ऊर्जेतील सुमारे २५% ऊर्जा जर केवळ मोदक खाऊन येत असेल तर त्याच ऊर्जेचा वापर होणेदेखील आवश्यक आहे. त्यामुळे केवळ जेवण- मोदक-झोप असा सरसकट दिनक्रम व्यायाम- खाणं – उत्तम जलाहार – मोदक – व्यायाम- झोप असा बदलायला हरकत नाही. सगळ्यात महत्वाचं मोदकातील ऊर्जेच्या प्रमाणावर अंकुश ठेवायचा असेल तर तळलेला मोदक खाण्यापेक्षा उकडीचा मोदक खाणे कधीही उत्तम!