लसूण, लिंबू आणि शेंगदाणे तिन्हीचे गुणधर्म वेगवेगळे. पण तिन्ही आपल्या तब्येतीसाठी अतिशय फायदेशीर आहेत. तिघांचे गुणधर्म आणि उपयोग तपशीलवार जाणून घेऊया.
लसूण
लसूण ही पाच रस असलेली मधुर, लवण, तिखट, कडू व तुरट अशी समजली जाते. पण आपल्या वापरात असलेल्या लसणीत फक्त तिखट रसच आहे. इतर रस त्याच्या डेखात, काडीत व वरच्या टरफलात असतात. लसणीमध्ये एक विशेष तेल आहे. चटकन उडून जाणाऱ्या या तेलात नाना विकारांचा विशेषत: कफ व वातप्रधान विकारांचा सामना करण्याचे सामर्थ्य आहे.
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे लसूण उष्ण, तीक्ष्ण, स्निग्ध, गुरू, बुळबुळीत, सर, बल्य व वृष्य गुणांची आहे. आधुनिक शास्त्राप्रमाणे लसूण उत्तेजक, कुजणे क्रिया थांबवणारी, कफघ्न, मूत्रल, कृमिघ्न आहे. आधुनिक शास्त्रज्ञ हृद्रोग, फुप्फुस व मूत्रपिंडाच्या काही विकारांत लसणीची फार प्रशस्ती करतात. लसणीतील तेल फुप्फुस, मूत्रपिंड व त्वचेत काम करते. श्वसननलिकांतील कफ शिथिल करणे व कफाची दुर्गंधी कमी करणे ही कामे लसूण करते. सायटिका, पाठदुखी, तोंड वाकडे होणे, अर्धांगवात, संधिवात, मांड्यांचे जखडणे या विकारांत लसूण उपयुक्त आहे. आधुनिक शास्त्राप्रमाणे लसूणसिद्ध दूध व लसणीचा वाटून लेप वातविकारावर उत्तम उपाय आहे. मात्र पित्तप्रकृतीच्या रोग्यांना वगळून इतरांकरिता लसूण चांगली हे सतत लक्षात हवे. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना लसूण द्याायची तर अळणी जेवण सांगावे.
आयुर्वेद ग्रंथाप्रमाणे लसूण वातानुलोमन व कफनाशकाचे काम करते. लसूण योग्य तऱ्हेने वापरली तर शरीर पुष्ट होते. वजन वाढते, शुक्रधातू, अस्थी व रक्तवर्धक अशी लसणीची विशेष कार्ये आहेत. लसूण बुद्धी व धारणशक्ती वाढवते. डोळे, स्वर व वर्ण विकारांत उपयुक्त आहे. हृदयरोग, जुनाट ताप, पोटदुखी, पोटफुगी, वायुगोळा, अजीर्ण, जांघाड्यातील दुखावा, हर्निया प्रोस्टेट ग्रंथी, मोडलेली हाडे, अरुची, खोकला, कफ, शोषविकार, क्षय, कफप्रधान मूळव्याध, कफप्रधान त्वचाविकार, कृमी, जंत, समस्त वातविकार इत्यादींकरिता लसूण फारच उपयुक्त आहे.
लसूण कच्ची, त्याचा रस, वाळवून केलेले चूर्ण, ताकात भिजवून व तुपावर परतून अशा विविध प्रकारे लसूण उपयुक्त आहे. लसूण वापरताना तोंड येणे, डोळ्यांची, शौचास व लघवीची आग होत नाही याची काळजी घ्यावी लागते. त्याकरिता तारतम्याने दूध, तूप, ताक, लिंबू, मध यांचा अनुपान म्हणून वापर करावा.
अजीर्ण, अपचन, पोटात वायू धरणे, हर्निया, प्रोस्टेट, भूक नसणे, कफप्रधान मूळव्याध या विकारांत ताकात कुस्करून लसूण खावी. ज्यांना वजन वाढवायचे आहे किंवा मोडलेली हाडे जुळून यावयास हवी त्यांनी लसूण तूप किंवा दुधाबरोबर घ्यावी. क्षय किंवा शोष विकारांत लसूणसिद्ध दूध उत्तम टॉनिक आहे. सायटिका, खांदा जखडणे, गुडघेदुखी या विकारांत लसणीचा वाटून लेप उत्तम काम देतो. मात्र पुरळ येणार नाही याची काळजी घ्यावी.
ज्यांना दीर्घायुषी व्हायचे आहे त्यांनी रोज दोन-तीन पाकळ्या नियमित खाव्या. त्यांचे सातही धातू उत्तम तऱ्हेने पोसले जातील. विशेषत: म्हातारपण लांब राहील, दृष्टी सुधारेल, त्वचेवर सुरकुत्या येणार नाहीत. केस गळणार नाहीत, स्मरणशक्ती सुधारेल. आवाज स्पष्ट राहील. याकरिता लसूण थंड ऋतूत, पावसाळा व हिवाळ्यात जरूर खावी, लसणीच्या जोडीला तूप, मध, आले रस घेतल्यास वजन निश्चित वाढते.
आयुर्वेदीय औषधात लसणीचा प्रामुख्याने वापर लसणादी वटी व पाराशुद्धीकरिता केला जातो. बाजारात व्यापारी लोकांनी उगाचच एककांडी लसूण- काश्मीरमध्ये होणाऱ्या लसणीचे बंड माजवून ठेवले आहे. ती प्रचंड महाग असते. गुणाने आपल्याकडे मिळणारी लसूण किती तरी श्रेष्ठ असते.
लिंबू
प्राचीन काळापासून लिंबाच्या अनेक प्रकारांचा वापर, त्यांच्या उपलब्धतेनुसार चालू आहे. आताचे कागदी लिंबू हे सर्वश्रेष्ठ पाचक व वातानुलोमक आहे. तोंडाला रुची नसली तर किंचित लिंबूरसाने लगेच चव येते. कणभर मीठ, लिंबू व जोडीला आले तुकडा यामुळे जुलाब, अरुची, अग्निमांद्य या विकारांतील ‘अन्न नकोसे वाटणे’ या तक्रारीवर आराम पडतो. लिंबाच्या पाचक रसामुळे पिष्टमय पदार्थ उदा. बटाटा, भात, हरभरा, डालडातील मिठाई, जड मांसाहार यांचा आमाशयाला भार होत नाही. पोट डब्ब होऊन राहत नाही. लिंबूरस नियमित घेतल्याने आहार वाढतो. अग्निमांद्य, अजीर्ण, आव, वातामुळे पोटदुखी, पोटफुगी, वायगोळा या विकारांत लिंबूरस, आलेरस व किंचित मीठसाखर असे मिश्रण गरम करून जेवणाअगोदर घ्यावे. कोणत्याही जुलाबात लिंबूसाखर, मीठ यांचे सरबत ‘जगमान्य’ आहे. इलेक्ट्रॉल पावडरीपेक्षा लिंबू हजारपट चांगले. डोकेदुखी विकारांत साखरेचे प्रमाण वाढवून लिंबाचे सरबत घ्यावे. वात व कफप्रधान आम्लपित्तात लिंबूरस उपयोगाचा आहे. केसांतील खवडे, नायटा, कोंडा या विकारांत लिंबूरस किंवा त्याच्या सालीचे चूर्ण केस धुण्याकरिता उपयुक्त आहे. आसाम व पूर्वांचल राज्यांमध्ये आपल्याकडील कागदी लिंबापेक्षा काही वेगळ्याच जातीची लिंबे मिळतात. ती झाडे तिकडील जंगलात निसर्गत: उगवत असतात, वाढत असतात.
कुपथ्य : बहुतेक सर्व त्वचाविकार, हातापायाची व डोळ्यांची आग होणे, कंडू विकार, सोरायसिस, मूळव्याध, भगंदर, मलावरोध, कान वाहणे, गरमी, परमा, तोंडातील उष्णता व फोड, गांधी उठणे, जखमा, ताप, महारोग, हाडांचे विकार, संधिवात, गुडघेदुखी, कंबर व पाठदुखी, अतिकृशता या विकारांत लिंबू वर्ज्य करावे.
शेंगदाणे
प्रोटिन किंवा प्रथिन असणाऱ्या पदार्थांत भुईमुगाचे स्थान फार वरचे आहे. ऑलिव्ह तेलाचे एक काळ फार मोठे स्तोम माजले होते. त्या तुलनेत भुईमूग वातानुलोमन, व्रणरोपण, वर्णप्रसादन व पौष्टिक गुणाचे आहे. दूध, सोयाबिन या पदार्थांतही भरपूर प्रोटिन आहेत, पण भुईमूग नीट चावून खाल्ला किंवा भाजून खाल्ला तर अंगी चटकन लागतो. दूध व सोयाबिन तुलनेत शेंगदाणे खाणे परवडण्यासारखे टॉनिक आहे. तुम्ही-आम्ही शेंगदाण्यांना ‘मराठी बदाम’ असे गमतीने संबोधितो.
शेंगदाण्याच्या स्वयंपाकात वापर रुची आणणे याकरिता होतो. सर्व खाद्यातेलांत सर्वांना आवडणारे, परवडणारे असे हे गोडेतेल आहे. मलावरोध, मलावष्टंभ, खडा होणे, पोटात वायू धरणे इत्यादी तक्रारींत खूप चूर्णे, लॅक्सेटिव्ह, सोनामुखी जमालगोटा इत्यादी घेण्यापेक्षा पुढील पद्धतीत गोडेतेल प्यावे. सात ते पंधरा दिवसांत गुण दिसतो. तीन चमचे गोडेतेल, थोडेसे मीठ, थोडी चिंच, कोळून त्याचे पाव कप पाणी असे एकत्र मिश्रण उकळावे. आटवावे. तेल उरल्यावर गाळून सकाळी रिकाम्यापोटी व सायंकाळी पाच वाजता घ्यावे. प्रत्येक वेळी चहासारखे हे तेल ताजे तयार करावे. वायगोळा कमी होतो. खडा मोडतो. भूक चांगली लागते.
शेंगदाण्याचे तेल, किंचित मीठ असे मिश्रण कालवून पायाच्या बोटांतील भेगांमधील चिखल्यांना घासून लावावे. चिखल्या रात्रीत बऱ्या होतात.
शेंगदाणे पित्तकारक आहे. त्वचाविकार, इसब, गजकर्ण, नायटा, सोरायसिस, आम्लपित्त शीतपित्त, पोटदुखी, अल्सर, मूळव्याध, भगंदर, जखमा, कावीळ, जलोदर या विकारांत खाऊ नये. मधुमेह विकारात रक्तातील साखर खूप वाढली असल्यास शेंगदाणे वर्ज्य करावे. शेंगदाण्यांच्या देठात खूप खूप पित्त असते. ती देठे काढली असल्यास, शेंगदाणे पित्त वाढवत नाही.
फार पूर्वी अतिशय गोड चवीचे देशी, पांढऱ्या वर्णाचे शेंगदाणे मिळायचे. त्या शेंगांच्या टरफलांना वर सुरकुत्या असावयाच्या. ते शेंगदाणे खाऊन पित्त होत नसे. त्या प्रकारच्या शेंगांचे प्रति एकरी पीक भरपूर येत नाही म्हणून शेतकरी त्याची लागवड करीत नाहीत.
अमृतधारा
पुदिना अर्क किंवा मेन्थॉल क्रिस्टल, ओवा फूल व भीमसेनी कापूर यांच्या समभाग मिश्रणातून अमृतधारा नावाचे एक अजोड ‘लाइफ सेव्हिंग ड्रग’ एका मिनिटात तयार होते. जुलाब, अतिसार, हगवण, सर्दी याकरिता हे अमृतधारा औषध आहे.
हृदयरोगावर रामबाण!
हृदरोगी व आमांश या विकारांनी ग्रस्त असणाऱ्यांनी नियमित लसूण खाल्ली तर अॅन्जिओग्राफी, बायपास सर्जरी व हार्ट अॅटॅक यांची फिकीर करायची गरज नाही. रक्तवाहिन्यांत जागोजागी असलेले अडथळे लसणीतील तेल दूर करते. चमका, निस्तेज चेहरा, रातांधळेपणा, उचकी, दमा या विकारांत लसूण नियमित खावी. उपयोग होतो.
© IE Online Media Services (P) Ltd