तूप : घृतम् आयु:।
‘सहस्रावीर्यं विधिभिर्घृतं कर्मसहस्राकृत्’
ज्याच्या आहारात थोड्या फार प्रमाणात तूप रोज आहे तो निरोगी आयुष्य दीर्घकाळ जगतो. सर्व प्रकारच्या स्निग्ध पदार्थांत तूप हे सर्वश्रेष्ठ आहे. शरीराची दर क्षणाला झीज होत असते. ती भरून यायला शरीरात स्निग्धता लागते. सात धातूंपैकी मज्जा हा धातू सर्वात श्रेष्ठ धातू होय. त्याच्या शरीरातील ठिकठिकाणच्या कार्यास तुपाची मदत मोठी होते.
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे तूप हे आयुष्यवर्धक व मधुर रसाच्या पदार्थात श्रेष्ठ आहे. त्याची तुलना फक्त सुवर्णाशी होऊ शकते. शरीराला तुपामुळे स्थैर्य मिळते. बुद्धी, धारणाशक्ती, स्मरणशक्ती टिकवणे व वाढवणे याकरिता तूप माफक प्रमाणात घेतल्यास खूप मोठा उपयोग होतो. घृत हे शीत गुणाचे असून वात व पित्त विकारात काम करते.
अग्निमांद्या किंवा भूक न लागणे या विकारात अग्निवर्धन होते. शीतपित्त व गांधी उठणे या विकारात तुपात कालवून मिरेपूड लावली तर अंगाची खाज लगेच कमी होते. आम्लपित्त विकारात नियमाने सकाळी व सायंकाळी पंधरा ग्रॅम तूप घ्यावे. काँग्रेस गवताची अॅलर्जी, अंगाची आग होणे, तळपाय, तळहात किंवा डोळ्यांची जळजळ या विकारांत तसेच झोप न येणे, झोप उशिरा येणे, जळवात या विकारात तळपायाला, तळहाताला व कानशिलाला तूप चोळावे. त्याप्रमाणे खिशाला परवडेल तर पोटात घ्यावे. स्त्री-पुरुषांचे अंग बाहेर येणे या विकारात सकाळी व रात्री जेवणाच्या अगोदर वीस ग्रॅम तूप घ्यावे. तसेच योनी, गुदभागी तुपाचा बोळा ठेवावा.
गहू-तांदुळाचं औषधी महत्त्व तुम्हाला माहितेय का?
स्त्रियांच्या धुपणी विकारांत कृश स्त्रियांकरिता तूप हा मोठा दिलासा आहे. पोटातील आतड्यांना व्रण असल्यास तो सुधारून उलट्या, पित्तकाळातील पोटदुखी कमी होण्याकरिता निव्वळ तुपाचा आश्रय करावा. कृश व्यक्तींनी कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी यावर थोडे तूप गरम पाण्याबरोबर घ्यावे.
ज्यांचा कोठा रुक्ष आहे, शौचाला कठीण होते, खडा होतो त्यांनी रोज रात्री एक कप गरम दुधाबरोबर एक चमचा तूप घ्यावे. कान सतत वाहणे, कानात आवाज येणे, कान कोरडे पडणे, डोळे रूक्ष होणे, डोळ्यांचा वाढता नंबर, डोळ्यांत लाल रेषा येणे, डोळे वारंवार तळावणे या विकारांत रसायनकाली म्हणजे सकाळी वीस ग्रॅम तूप खावे.
चौरस आहाराकरिता कडधान्ये
उष्णतेने केस गळत असल्यास, केसात खवडे, चाई, उष्णतेचे फोड होत असल्यास कृश व्यक्तींनी नियमित तूप खावे. कुरूप या विकारात कुरूप कापण्यापेक्षा शंभर वेळा पाण्यात धुऊन तयार केलेले तूप नियमितपणे कुरूपाला घासून लावावे. शांत झोपेकरिता, झोपण्यापूर्वी तळपाय, कानशिले, कपाळपट्टी यांना चांगले जिरवावे. वात, गुल्म किंवा पोटात फिरता वायुगोळा या विकाराकरिता जेवणाच्या सुरुवातीला तूप चमचाभर खाऊन जेवण सुरू करावे. जेवण संपताना पुन्हा एक चमचा तूप घ्यावे. वारंवार लघवी होणे- रात्री बऱ्याच वेळा लघवीकरिता उठावे लागत असल्यास व मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे विकार नसल्यास याचप्रमाणे जेवणाअगोदर व जेवण संपताना एक चमचा तूप खावे.
कृश माणसाला खूप घाम येणे, चक्कर येणे, वजन घटणे, थोड्याशा कामाने थकवा येणे, काम करणे नकोसे वाटणे, पायात गोळे येणे, मुंग्या येणे, लिखाणकाम जास्त केल्याने डोके हलके होणे या तक्रारीत दिनचर्येला सुरुवात करताना अनशापोटी तूप खावे. कृश माणसाच्या छातीत दुखणे, टी.बी. विकार, थुंकीतून रक्त पडणे, वारंवार बारीक ताप येणे, कडकी, जुनाट ताप या विकारात नियमितपणे तूप खावे.
शरीरातील कोणतीही जखम बाहेरची व आतड्यातील भरून यावयास तुपाची मोठी मदत होते. मधुमेह कमी प्रमाणात असल्यास व रक्तदाब विकार नसल्यास महारोगापासून किरकोळ कोणत्याही जखमांकरिता तुपाचा वापर पोटात घेणे, जखमेला बाहेरून लावणे, याकरिता करावा. जखमेवर तूप हे मोठे रामबाण औषध आहे. डोकेदुखी विकारात रोज व रात्रौ व सकाळी दोन थेंब तूप नाकात टाकावे. तोंड येणे, तोंडात असणे या विकारात जिभेला तूप लावावे. फोड बरे होतात.
किरकिर करणारी मुले, कडकी, पुन:पुन्हा बारीक ताप येणे, बारा-पंधरा वर्षांची मुले वयाच्या मानाने लहान वाटणे, अग्निमांद्या, जीर्णज्वर या बालविकारात तूप व मिरेपूड असे मिश्रण नियमाने रोज सकाळी घ्यावे. सहा सप्तकात गुण येतो. तीन महिन्यांत बालकाची प्रकृती सुधारते. समस्त त्वचाविकारात (मधुमेह सोडून) तुपाचा पोटात घेण्याकरिता व खाज, आग थांबवण्याकरिता उपयोग आहे. विशेषत: सोरायसिस विकारात अवश्य उपयोग करावा.
समस्त विषविकारात पोटात घेण्याकरिता तुपासारखा उपाय नाही. विषाच्या दहा गुणांविरुद्ध लढा द्यावयास तुपाचे दहा गुण आहेत. चुकीच्या औषधांचे शरीरावर, डोळ्यांवर, त्वचेवर, केसांवर, किडनीवर दुष्परिणाम झाल्यास रसायनकाळी (सकाळी) उत्तम दर्जाचे तूप नियमित घ्यावे.
शरीरातील सर्वश्रेष्ठ असे ओज, त्याचे रक्षण व वर्धन तुपाच्या सेवनाने होते. स्वप्नदोष, दुर्बलपणा, हस्तमैथुनामुळे आलेले दोष, नपुंसकता, गमावलेला आत्मविश्वास, धास्ती, अस्वस्थ मन, कंपवात या धातुक्षयाच्या तक्रारीत तूप जरूर वापरावे. तुपामुळे टिकाऊ स्वरूपाचा गुण मिळतो. नागीण विकारातील विलक्षण आग बाह्याोपचाराकरिता व पोटात घेण्याकरिता तूप वापरून दोन-चार दिवसांत गुण येतो. रक्तवाहिन्या शिथिल झाल्या, त्यांचा जोम कमी झाला, शरीर रूक्ष झाले व त्यामुळे पांडुता आली तर तुपाचा आसरा घ्यावा. गुण येतो.
भारतीय आहारशैलीचं सौंदर्यशास्त्र
फिट्स येणे, आकडी, विस्मरण, उन्माद या वातविकारात पोटात तूप घ्यावे. तळहात, पाय, कानशिले यांना तूप घासून लावावे. तोंडावरून वारे जाणे, तोंड वाकडे होणे या विकारात डोळ्यांत तूप टाकावे. नाकात दोन थेंब तूप टाकावे. तळपाय, तळहात, कानशिलांना तूप चोळावे. रक्त पडत असलेल्या मूळव्याधीत गरम दुधात मिसळून तूप घ्यावे. कृश मुलांच्या शय्यामूत्र या विकारात जेवणाच्या सुरुवातीला व शेवटी एक चमचा तूप घ्यावे. फुप्फुसातील जखमा, ऊर:क्षत, थुंकीतून रक्त पडणे, या तक्रारीत नियमित तूप घ्यावे. क्षयाचा जोर कमी होतो. सुकुमार त्वचा, कांती, स्वर सुधारणे याकरिता माफक प्रमाणात नियमित तूप खावे. भाजलेल्या जखमांवर वरून लावण्याकरिता व पोटात घेण्याकरिता तुपाचा यथायोग्य वापर करावा. चांगली दृष्टी, चांगली प्रजा व पुरेशी शरीरसंपत्ती मिळवण्याकरिता जेवणात तसेच सकाळी रिकाम्यापोटी तूप घ्यावे. रोज पंचवीस ते पन्नास ग्रॅम तूप आपले अग्नीचे, पचनशक्तीला धरून उत्तम टॉनिक होऊ शकते.
ज्वारी, बाजरी, नाचणी खा आणि चांगलं आरोग्य कमवा
जुने तूप उन्माद, जुनाट सर्दी, चक्कर, फिट्स येणे, शिरोरोग, कानांचे विकार, डोळ्यांची तक्रार यात उपयोगी पडते. एड्सग्रस्त स्त्री-पुरुषांच्या विकारात गुह्येद्रियांच्या जखमा भरून येण्याकरिता जुन्या तुपाचा बोळा ठेवावा. ज्या स्त्रियांना गर्भ टिकत नाही. पुन:पुन्हा गर्भस्रााव होतो त्यांनी नियमितपणे तूप घ्यावे. त्यामुळे गर्भाशयाची मासानुमास वाढ होते. स्तनाच्या कर्करोगाच्या जखमा भरून येण्याकरिता वाटी वाटी तूप खावे. लाइटचे साइड इफेक्ट कमी होतात.
तूप कोणी खाऊ नये?
रक्तदाब, रक्तात चरबी (सिरमकोलेस्ट्रॉल) अधिक असणे, स्थौल्य, शौचाला चिकट बुळबुळीत होणे, आमांश, शौचाला घाण वास येणे, शरीराला जडपणा येणे, सकाळी उठताना अंग आंबणे, डोळ्यांत मोतीबिंदू होणे, डोळ्यांतून पाणी येणे, जिभेला चिकटा असणे, आवाज बसणे, अर्धांगवध, कावीळ, जलोदर, यकृतवृद्धी, प्लीहावृद्धी, हृदयरोग, विटाळ कमी होणे, लघवी कमी होणे या तक्रारीत तूप वर्ज्य करावे.
(यापूर्वी साप्ताहिक लोकप्रभामध्ये २०१५ साली प्रसिद्ध झालेली वैद्य प. य. वैद्य खडिवाले यांची औषधाविना उपचार ही लेखमालिका पुनर्प्रकाशित करत आहोत)