Healthy Midnight Snacks Option: डाएट करायचं म्हणून संध्याकाळी लवकरच खाऊन घेतल्यावर अचानक रात्रीची कधीकधी इतकी कडकडून भूक लागते की अस्वस्थ वाटू लागतं. अशावेळी काही पटकन न सुचल्यावर जे समोर दिसेल ते खावं अशी इच्छा होतेच. मग काय बिस्किट, फरसाण, चिप्स, काहीही पोटात ढकललं जातं. हीच समस्या लक्षात घेऊन आज आम्ही आपल्याला सोशल मीडियावर ट्रेंड होणारा एक मिडनाईट स्नॅक्सचा पर्याय त्याच्या आरोग्यदायी फायद्यांसह सांगणार आहोत. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड, मुंबईच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ रिया देसाई यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितल्याप्रमाणे, रात्री उशिरा खाण्याची सवय शरीराला लावण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळेच साखर, सोडियम युक्त पर्याय निवडण्याऐवजी अगदीच भूक लागलीच असेल तर कमी कार्ब्स असणारे, कमी साखर व मीठ असणारे पर्याय निवडायला हवेत. आता या निकषांमध्ये बसणारा नेमका पदार्थ कोणता व त्याचा फायदा काय हे पाहूया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोषणतज्ज्ञ सोनिया नारंग यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत ओव्याच्या पराठ्याची एक रेसिपी सांगितली आहे. सोनिया यांच्या म्हणण्यानुसार हा पराठा ओवा, आलं आणि तूप वापरून बनवायचा आहे. हा पराठा पचनासाठी उत्तम असून इन्सुलिनच्या वाढीस प्रतिबंध करू शकतो, असेही सोनिया यांनी सांगितले आहे. सोनिया यांनी म्हटले की, “या रेसिपीमध्ये मीठ जाणूनबुजून टाळले आहे. आपण रात्रीच्या जेवणाच्या वेळीच मळलेल्या कणकेचा छोटा गोळा बाजूला काढून ठेवू शकता आणि जर तुम्हाला एखाद्या रात्री उशिरा भूक लागलीच तर हा हा हेल्दी पराठा खाऊन भूक भागवू शकता. या व्यतिरिक्त दही (योगर्ट), फळे, सुकामेवा असेही पर्याय आपण खाऊ शकता. तुम्ही तुमच्या शरीरासाठी कोणता पर्याय अनुकूल आहे? काय खाल्ल्याने आपल्याला चांगली झोप लागू शकते? हे ओळखायला हवे.

आलं, ओवा आणि तुपाचा पराठा कसा बनवावा?

पराठ्याचा खरंच फायदा आहे का?

नारंग यांच्या या व्हिडीओतील पर्याय खरोखरच आपल्या भूक व आरोग्यासाठी उत्तम आहे का याविषयी जाणून घेण्यासाठी इंडियन एक्सस्प्रेसने झायडस हॉस्पिटल, अहमदाबाद येथील मुख्य आहारतज्ज्ञ श्रुती के भारद्वाज यांच्याशी संवाद साधला. श्रुती यांनी सांगितले की, बारीक कापलेल्या आल्याचे तुकडे, ओवा व तुपाचा पराठा हा रात्रीची भूक कमी करू शकतो. चवीलाही उत्तम असलेला हा पराठा यातील घटकांमुळे पचनास हातभार लावतो. विशेषतः ओवा हा त्याच्या पाचक गुणधर्मासाठी ओळखला जातो ज्यामुळे अपचन व सूज कमी होण्यास मदत होऊ शकते.

आता दुसरा पदार्थ म्हणजे, तूप. अर्थातच तूप चवीमध्ये मोठं योगदान देणारा घटक आहे. शिवाय तूप हे निरोगी फॅट्स शरीराला पुरवते आणि पोट भरल्याची भावना वाढवू शकते, तुपामध्ये असणारे ब्युटीरेट आतड्यांच्या आरोग्यास समर्थन देते आणि पचनास मदत करू शकते असेही भारद्वाज म्हणाल्या.

हे ही वाचा<< अल्सरचा त्रास, पोटही बिघडतंय? जिरं, ओवा व ‘या’ मसाल्याचा वापर देईल चुटकीसरशी आराम; खाण्याची योग्य पद्धत वाचा

भारद्वाज यांच्या मते, ज्युलिएन केलेले (बारीक चिरलेले) आले चवीला एक मस्त तिखट जोड देतेच पण त्याचे आरोग्य फायदे सुद्धा अनेक आहेत. आल्यात दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे पोटाला शांत करण्यास, पचन सुधारण्यास आणि चयापचय वाढवण्यात मदत करू शकतात.

पराठे खाताना एवढं विसरू नका!

तूप,आले व ओव्याचा पराठा हा फायदेशीर असला तरी प्रमाणातच खावा. तुमचे एकूण जेवण, वेळ यानुसार आपण प्रमाण ठरवावे. रात्री उशिरा खाल्ल्याने अनेकदा झोपेतही व्यत्यय येऊ शकतो त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. म्हणूनच लालसा, भूक, व वेळ लक्षात ठेवूनच पराठा खावा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghee on parantha health benefits can ajwain ginger roti help you digest food fast loose weight dietician shares recipe video svs