Glutens Effects On Body: वजन, रक्तदाब, रक्तातील साखर यासारख्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून सोशल मीडियावर अनेक डाएट फॅड ट्रेंड होत असतात. यातीलच एक भाग म्हणजे ग्लूटेन फ्री आहार. सेलिआक आजार किंवा ग्लूटेनची संवेदनशीलता असणाऱ्या मंडळींना ग्लूटेनयुक्त आहार टाळण्याचा सल्ला दिला जातो. पण या व्यतिरिक्त केवळ सोशल मीडियाचा ट्रेंड म्हणून ग्लूटेन युक्त पदार्थ आहारातून पूर्णपणे वगळावेत का? असे केल्यास त्याचा आरोग्यावर काय व कसा प्रभाव होऊ शकतो? यामुळे काही नुकसान होऊ शकते का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

ग्लूटेन फ्री आहार आरोग्यावर काय परिणाम करू शकतो?

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथील क्लिनिकल आहारतज्ज्ञ फिओना संपत यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, ग्लूटेन युक्त पदार्थ आहारातून वगळल्याने आपण संतुलित पोषणापासून दूर जाता. यामुळे कॅलरीजच्या अतिरिक्त सेवनाची शक्यता सुद्धा वाढते. “सामान्यत: ग्लूटेन-फ्री पदार्थांचे पर्याय हे प्रक्रिया केलेले आणि रिफाईंड केलेले असतात, त्यात आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो. ग्लूटेनयुक्त पदार्थांची समान चव आणि पोत मिळविण्यासाठी बर्‍याच पदार्थांवर प्रक्रिया करताना त्यात कॅलरी, शर्करा आणि घातक फॅट्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे वजन वाढणे आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.”

ग्लूटेन फ्री आहाराच्या हट्टापायी आपण काय गमावताय?

ग्लूटेन फ्री आहारामुळे तुम्ही प्रथिनांचे फायदे गमावू शकता. अनेकांना माहीत नसलेली बाब म्हणजे ग्लूटेन एक प्रोटीन आहे. त्याशिवाय ग्लूटेन हा फायबर, खनिजे आणि जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट्सचा निरोगो स्रोत आहे. हे एक प्रीबायोटिक म्हणून काम करते व आतड्यांच्या आरोग्यसाठी आवश्यक चांगले बॅक्टेरिया शरीराला पुरवते. डॉ.संपत सांगतात की, “गव्हाच्या कोंड्यापासून मिळणारे प्रीबायोटिक कार्बोहायड्रेट अरेबिनॉक्सिलन ऑलिगोसॅकराइड, कोलनमध्ये बायफिडो बॅक्टेरियाला सक्रिय करते, ज्याची आतड्यांना निरोगी ठेवण्यात मदत होऊ शकते.”

हृदयाचे विकार किंवा मधुमेहींना ग्लूटेन टाळायलाच हवे का?

डॉ अरुण कुमार सी सिंग, डायरेक्टर, एंडोक्राइनोलॉजी आणि डायबेटोलॉजी, मेट्रो हार्ट इन्स्टिट्यूट विथ मल्टीस्पेशालिटी, फरीदाबाद यांच्या माहितीनुसार , “ज्यांना हृदयरोग किंवा मधुमेहाचा धोका आहे त्यांना संपूर्ण धान्य आवश्यक आहे कारण ते कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतात आणि रक्तातील साखर नियंत्रित करू शकतात. ग्लूटेन युक्त आहार टाळल्याने होणारे सर्वात मोठे नुकसान म्हणजे शरीराला बी व्हिटॅमिनचा पुरवठा कमी होणे. शिवाय तुम्ही लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारख्या प्रमुख मिनरल्सचे सेवन कमी करता.”

ग्लूटेन-फ्री अन्न म्हणजे वजन कमी?

आहारातून ग्लूटेन काढून टाकल्याने वजन कमी होणे किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि चयापचय विकारांचे धोके कमी होण्याची हमी मिळत नाही. खरं तर, पुरेशी फळे आणि भाज्या समाविष्ट असलेल्या संतुलित आहाराशिवाय, कोणताही अन्य डाएट वजनावर परिणाम करतच नाही. ग्लूटेन टाळताना तुम्ही सावध न राहिल्यास इतर धान्याच्या पिठाचे पर्याय तुमच्या कार्ब्सच्या सेवनात वाढ करून उलट वजन वाढवू शकतात.

हे ही वाचा<< विराट कोहलीच्या आहारात ९० टक्के उकडलेले पदार्थ! तज्ज्ञ सांगतात, तेल, मसाल्याचा वापर बंद करावा का? उलट.. 

काही लोक योग्य वैद्यकीय कारणा शिवाय ग्लूटेन-फ्री राहण्याचा पर्याय निवडतात. यामुळे होणारे तोटे आपण पाहिलेत. त्यामुळे आता तुम्हाला खरोखर ग्लूटेन-मुक्त आहाराची गरज आहे का हे जाणून घेण्यासाठी नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.

Story img Loader