Amla Benefits Cholesterol Control: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आहे. मानवाच्या शरीरात दोन पद्धतीचे कोलेस्ट्रॉल असतात. यामध्ये LDL म्हणजेच लो डेंसिटी लिपोप्रोटीन याला वाईट कोलेस्ट्रॉल मानलं जातं, तर दुसरीकडे HDL म्हणजेच हाई डेंसिटी लिपोप्रोटीन शरीरातील चांगलं कोलेस्ट्रॉल असतं. LDL नेहमी कमी असलं पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. LDL कोलेस्ट्रॉल शरीरासाठी हानिकारक आहे आणि यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात. पण, आवळा खाल्ल्याने ‘खराब कोलेस्ट्रॉल’ झपाट्याने कमी होऊ शकतो का, संशोधन काय सूचित करते, जाणून घेऊया…

वेगवेगळ्या फळांमध्ये आवळा खूप फायदेशीर फळ मानलं जातं. आवळ्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. आवळ्यामध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स भरपूर असतात. यात कॅल्शिअमही भरपूर असतं. आवळ्यामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटसारखं काम करतं. याने फ्री रॅडिकल्स, अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-मायक्रोबिअल तत्व वाढतात, ज्यामुळे इम्यून सिस्टीमचा प्रभाव वाढतो व तुमचा अनेक आजारांपासून बचाव होतो.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, आवळ्याचे नियमित सेवन केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल लक्षणीयरीत्या कमी होते तर एचडीएल (हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन) कोलेस्ट्रॉल वाढते, ज्याला सामान्यतः “चांगले” कोलेस्ट्रॉल म्हणतात. एचडीएल रक्तप्रवाहातून एलडीएल फिल्टर करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. आवळ्याचे दाहकविरोधी गुणधर्म धमनीची जळजळ कमी करण्यास मदत करतात.

आवळ्याचे सेवन कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किती प्रमाणात करावे?

ताजा आवळा : दररोज १-२ आवळ्याचे सेवन करावे.

आवळ्याचा रस : २०-३० मिली (सुमारे २ चमचे) आवळ्याचा रस सकाळी रिकाम्या पोटी पिणं जास्त फायदेशीर ठरतं.

आवळा पावडर : आवळा पावडर १-२ चमचे (३-६ ग्रॅम) कोमट पाण्यात किंवा मधात मिसळून, दिवसातून एकदा किंवा दोनदा पिणं फायदेशीर ठरतं.

अशाप्रकारे काही महिन्यांपर्यंत नियमित आवळ्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येऊ शकतो, असे संशोधकाचे म्हणणे आहे.

परंतु एक बाब लक्षात ठेवा, आवळा सामान्यतः सुरक्षित असला तरी जास्त प्रमाणात सेवन केल्याने काही लोकांना आम्लता किंवा पोटात अस्वस्थता होऊ शकते. मधुमेह असलेल्या लोकांनी नियमितपणे आवळा घेतल्यास त्यांच्या साखरेच्या पातळीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. आवळ्यामध्ये सौम्य रक्त पातळ करणारे गुणधर्म असतात, म्हणून रक्त पातळ करणारे पदार्थ घेणाऱ्या व्यक्तींनी नियमित आवळ्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.