Benefits of Grains in Diet: आपल्या रोजच्या आहारात असणारे वेगवेगळे अन्नघटक आपल्या रोजच्या पोषणात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. गहू, तांदूळ हे प्रामुख्याने सगळ्यांच्या आहारात असतात. पण या धान्यांच्या बरोबरीने ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी धान्यं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. यांची गुणवैशिष्ट्यं, त्यापासून तयार होणारे पदार्थ, ते कोणत्या ऋतूत खावेत त्याबद्दल आपण बारकाईने माहिती करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून या धान्यांचा तुमच्या आहारात समावेश करू शकाल. ही धान्यं अगदी सहजी बाजारात उपलब्ध आहेत पण त्यांची उपयुक्तता दुर्देवाने आपल्याला कळलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्वारी

गहू हे प्रमुख अन्न म्हणून जगभर वापरले जाते. त्या तुलनेत ज्वारीचा वापर कमी आहे. दक्षिण भारतात विशेषत: आपल्या महाराष्ट्रात त्याचे पीक व वापर मोठ्या प्रमाणावर आहे. उत्तर भारतातले लोक तुलनेने धिप्पाड, उंच व मांसमेद जास्त असलेले. त्याचे कारण त्यांच्या आहारात गहू भरपूर. गव्हामध्ये ज्वारीच्या-बाजरीच्या तुलनेत मांसवर्धक पदार्थ जास्त आहेत. गव्हाच्या तुलनेत ज्वारी-बाजरीत पाण्याचे प्रमाण कमी आहे. जोंधळा किंवा ज्वारीमध्ये मेंदूला उपयुक्त असा एक भाग आहे. त्यामुळेच ज्यांना बुद्धीचे काम जास्त आहे त्यांनी आपल्या आहारात ज्वारी ठेवावी. ज्यांना श्रमाचे, दणकट काम करायचे आहे त्यांनी गहू वापरावा. ज्वारी तुलनेने शीत गुणाची आहे. त्यामुळे ती पित्तप्रकृतीच्या रुग्णाला मानवते. कफप्रधान विकारात ज्वारी वापरू नये. विशेषत:ज्यांचे पोट नेहमी खुटखुटते, पोटात वायू धरतो, संडासला जास्त वेळ लागतो, वारंवार जावे लागते, त्यांनी ज्वारी वर्ज्य करावी. मात्र ज्यांना गहू मानवत नाही, संडासला चिकट होते, मळाला घाण वास मारतो त्यांनी जेवणात ज्वारीचा वापर करावा, सोबत ताक घ्यावे. ज्वारी गव्हाच्या तुलनेत रूक्ष आहे. चवीने मधुर व काही प्रमाणात तुरट रसाची आहे. काविळीमध्ये अग्निमांद्य असताना, ज्वारी वापरावी. ज्वारीमध्ये काही प्रमाणात साखर आहे, पण त्याचा उपद्रव स्थूल किंवा मधुमेही व्यक्तींना होत नाही. उलट शरीरात कॅलरी किंवा उष्मांक न वाढवता ताकद देणारे व पोटभरीचे अन्न म्हणून ज्वारी व शूकधान्याकडे मधुमेहींनी अधिक लक्ष द्यावे. मधुमेही, स्थूल व्यक्ती, मूळव्याध, भगंदर या विकारांनी ग्रस्त व्यक्तींकरिता ज्वारी हेच प्रमुख अन्न असावे.

ओट्स

ओट्स या धान्याचे मूळ उत्पत्तीस्थान ब्रिटन व अमेरिकेत आहे. ‘सुजलां सुफलां’ भारतात याची उत्तम लागवड होऊ शकत नाही. तरीपण ज्यांना धष्टपुष्ट शरीर मिळवायचे आहे, ज्यांना आपली मुलेमुली ताकदवान व्हावीशी वाटतात व ज्यांच्याजवळ खर्च करण्याकरिता पैसे आहेत त्यांनी आपल्या आहारात निर्दोष खाद्यान्न म्हणून याचा वापर जरूर करावा. मात्र हा वापर सातत्याने न करता थोडा खंड ठेवून करावा. ओट्स धान्याची लापशी किंवा पॉरिज मेंदूला तरतरी देते. रात्री थोडे धान्य भिजत टाकून सकाळी त्याचे कढण करून प्यावे. त्याने पोट साफ होते. रात्री या धान्याचा काढा घेतल्यास खोकला थांबतो. उत्तम झोप लागते. ओट्स धान्याचा अतिरेकी वापर केल्यास शरीरावर फोड, पुरळ येते. रक्त व पित्तातील तीक्ष्ण गुण अधिक वाढवणे हे ओट्स धान्याचे प्रमुख कार्य आहे. कृश व शीत प्रकृती असणाऱ्या व मेंदूचे काम जास्त असणाऱ्या कारकून मंडळींकरिता ओट्स हे उत्तम बौद्धिक टॉनिक आहे. ओट्समध्ये वसा किंवा चरबी भरपूर प्रमाणात असते. कृश व्यक्तींकरिता त्यामुळे ओट्सचा वापर सुचवावासा वाटतो.

बाजरी

बाजरीचे सर्व गुणधर्म ज्वारीसारखेच आहेत. बाजरी खूप उष्ण आहे. ज्यांना ज्वारीची भाकरी खाऊन थंडीसारखी संडासाची बाधा होते त्यांनी बाजरीची भाकरी किंवा ज्वारी-बाजरी मिसळून खावी. जलोदर किंवा उदर विकारात बाजरी अवश्य वापरावी. सर्व धान्यांत बाजरी तुलनेने खूप हलकी, रूक्ष आहे. त्यामुळे कफविकार, सर्दी, खोकला, दमाग्रस्त रुग्णांनी व स्थूल व्यक्ती यांनी आहारात बाजरीचाच वापर करावा. रक्ती मूळव्याधीच्या रुग्णांनी आहारात बाजरी वापरू नये.

वरई

‘वरी, नाचणी, भात पिकवतो कोकणचा प्रांत!’ वऱ्याचे तांदूळ पिष्टमय पदार्थातील सर्वात उष्ण पदार्थ आहे. त्वचाविकार, फोड, अंगाची आग, इसब, गजकर्ण, नायटा, सोरायसिस, डोळ्यांचे विकार, रक्ती मूळव्याध, शीतपित्त, गांधी, मधुमेह, जखमा, अल्सर, आम्लपित्त या विकारात वऱ्याचे तांदूळ वर्ज्य करावे. त्याऐवजी राजगिरा उपासाकरता वापरावा. कफ प्रवृत्तीच्या रुग्णांना वऱ्याचे तांदूळ चालतात.

नाचणी

दर आठवड्याला एखादा तरी रुग्ण असा भेटतो की जो मी ‘नाचणी खाऊ का’ असे विचारतो. रोगी माणसाकरिता नाचणी चांगली ही सर्वांना माहीत असणारी माहिती आहे. पण नाचणी ही सर्वांनाच पौष्टिक आहे, अशी एक चुकीची समजूत आहे. पिष्टमय पदार्थ किंवा स्टार्च असणाऱ्या पदार्थात भात, वऱ्याचे तांदूळ या वर्गात नाचणीचा क्रमांक शेवटचा आहे. नाचणी ही आजारातून उठणाऱ्या रुग्णांकरिता ‘पचावयास हलके’ म्हणून उत्कृष्ट अन्न आहे. नाचणी खाऊन अपचन, अजीर्ण, पोटात वायू धरणे, पोटदुखी, आमांश या तक्रारी कधी होत नाहीत. त्याचबरोबर नाचणीचा नियमित वापर करून वजनही वाढत नाही. नाचणी ही आमाशय, पच्यमानाशय व पक्वाशय या ठिकाणी कोणताही बोजा न टाकता पोटभरू काम करते. चणा, हरभरा, उडीद, पोहे, शेंगदाणे, बटाटा हे पदार्थ शरीर बृंहण करण्याचे कार्य करतात. ते काम नाचणी करणार नाही. नाचणी पोटाला त्रास न देता जीवनरक्षणापुरते पिष्टमय पदार्थ शरीराला पुरवते. नाचणीचा विशेष उपयोग आमांश, अजीर्ण, उदरवात, जुनाट ताप या पुन:पुन्हा त्रास देणाऱ्या रोगांत होतो. नाचणीचे पेज किंवा भात खाऊन उत्तम ‘क्षुद्बोध’ होतो. नेमकी भूक उत्पन्न होते.


नाचणीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नाचणीला कधीही कीड लागत नाही. दोन-तीन वर्षांचे नाचणीचे धान्य स्वादासकट चांगले टिकते. नाचणीचे सत्त्व पूर्वी घरोघर लहान बालकांना देण्याचा प्रघात होता. नाचणी पित्तशामक, थंड, तृप्तीकारक व रक्तातील तीक्ष्ण, उष्ण हे फाजील दोष कमी करते. कंबर खूप दुखत असेल तर नाचणीची पेज घ्यावी. मंड म्हणजे खूप पातळ पेज त्यामुळेच हिंदी भाषेत ‘मंडुआ’ असे नाव आहे.


स्थूल व्यक्तींनी शक्यतो भाताऐवजी नाचणी वापरावी. चरबी वाढणार नाही. वजन कमी होत राहील. गोवर व कांजिण्या तसेच नागीण विकारात पथ्यकर म्हणून नाचणीच्या पिठाची भाकरी खावी. लवकर ताकद भरून येते. फोड फोडण्याकरिता नाचणीच्या पिठाचे पोटीस उपयुक्त आहे. नाचणीच्या तुसाच्या राखेचा उपयोग केस धुण्याकरिता साबणाऐवजी करावा.


अतिस्थूल व्यक्तींनी वजन कमी करावयाचे ठरविल्यास नाचणीची भाकरी किंवा भात व लोणी काढलेले ताक यासारखा आहार नाही. निश्चयाने वजन कमी होते. मात्र मनावर ताबा हवा. जोडीला खात्रीचा मध असला तरी एनर्जी राहून वजन नक्की कमी होते. मधुमेही व्यक्तींनी नाचणी खाऊ नये. त्यामुळे रक्तशर्करा वाढतेच. क्षमस्व!

मधुमेहींसाठी ज्वारी

माझ्या प्रदीर्घ वैद्यकीय सल्लामसलतीचा अनुभव असा आहे की, मधुमेही माणसांना गहू व भात वर्ज्य करून, ‘सकाळी ज्वारी, दुपारी जोंधळा व रात्रौ शाळू’ असाच प्रमुख अन्नाचा आग्रह केला तर मधुमेह लगेच नियंत्रणात येतो, औषधी कमी लागतात, वैद्या-डॉक्टरांना दूर ठेवता येते. मधुमेही व्यक्तींनी नाष्ट्याकरिता ज्वारीच्या लाह्या, ज्वारीची उकड खावी. उकड करताना पाणी चांगले उकळावे, मोठे बुडबुडे आले की थोडे थोडे ज्वारीचे पीठ टाकावे, शिजले की त्यात चवीकरिता किसलेले आले, ताक व कढीलिंबाची पाने टाकावी. उप्पिटापेक्षा अशी उकड मस्त होते. जय जय ज्वारी माता!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grains in daily diet know health benefits of jwari sorghum bajra nachani oats vari psp