Guava Papaya Fruits and Leaf Benefits औषधाविना उपचार- सर्वसाधारणपणे असा समज असतो की, आजारी पडल्यावरच फळे खायची असतात. प्रत्यक्षात मात्र फळांमध्ये इतके विविध प्रकारचे गुणधर्म आहेत की, निरोगी राहायचे असेल तर फळांचे सेवन आवर्जून केले पाहिजे.
पपई
पपई हे खऱ्या अर्थाने भारतीय फळ नव्हे, पण आज सर्वत्र सदासर्वदा मिळणारे, अतिशय रुचकर व पोट भरू शकणारे फळ म्हणून ते उपयोगात आहे. जेवणानंतर दोन फाका खाल्ल्या की, फळ खाल्ल्याचे समाधान मिळतेच. शिवाय या फळांचा पाचक म्हणून प्रमुख गुण आहे. फळांमध्ये पाचक म्हणून पपईचा क्रमांक खूप वरचा आहे.
पपईच्या पानांचा रस कृमिघ्न
पपईच्या झाडाचे मूळ, पाने, बिया, कच्ची पपई, पपईचा चीक व पिकलेली पपई सर्वच औषधी गुणांचे आहेत. पपईच्या मुळांचा काढा मूतखड्यावर उपयुक्त आहे. मुळे नेहमी मिळणे शक्य नाही. त्यामुळे वाया गेलेल्या पपईच्या मुळाची जाळून राख करावी. पाण्यात मिसळून नियमित घ्यावी. पपईच्या पानांच्या रसात कृमिघ्न गुण आहेत. त्यामुळे त्याचा रस लहान प्रमाणात घेतल्यास नाडीचा वाढलेला वेग कमी होतो. शरीरातून घाम व लघवी जास्त प्रमाणावर शरीराच्या बाहेर पडतात. स्थूल व्यक्तींनीच याचा प्रयोग करावा. कृश व्यक्तींनी याचा उपयोग करू नये.
आमाशयासाठी उपयुक्त
पपईचा चीक पचनसंस्थेचे कार्य, विशेषत: आमाशयाचे कार्य सुधारण्याकरिता उपयुक्त आहे. याच्या वापराने आमाशयातील साठलेला कफ विरघळतो. गोल व लांबट जंतांकरिता ताज्या पपईचा चीक काढून त्याची वाळलेली पूड पन्नास ते शंभर मिलिग्रॅम या डोसमध्ये लहान बालकांकरिता व मोठ्यांकरिता एक ग्रॅम हा डोस वापरावा.
यकृत, प्लीहा यांची जुनाट सूज कमी होण्यासाठी पपईच्या चिकाचा उपयोग साखरेबरोबर करावा. येथे डोस किमान पाच ग्रॅम असावा. जीर्ण इसब, गजकर्ण, नायटा, अर्बुद, कफप्रधान कठीण गळू या विकारात पपईच्या चिकाचा बाह्योपचार लेप म्हणून उपयोग होतो. ताज्या पपईचा चीक अनेक औषधांत आतड्यांची सूज कमी करण्याकरिता वापरतात.
पिकलेली पपई गर्भवतीने खाऊ नये
कच्ची पपई पोटात दिल्यास बाळंतिणीस दूध सुटते. बाहेरून लेप लावल्यास स्तनाच्या दुधाच्या गाठी कमी होतात. रक्तातील प्लेटलेट काऊंट कमी असल्यास पपईच्या मोठ्या हिरव्या पानांचा रस प्यावा. पिकलेल्या पपईचे फळ खावे. पिकलेली पपई गर्भवतीने खाऊ नये. कारण गर्भाशयाचा संकोच करून गर्भपात करण्याचा गुणधर्म पपईत आहे. हा गुण गेली अनेक वर्षे भारत व इतर उष्ण कटिबंधातील खेडोपाडीच्या स्त्रियांना माहीत आहे. याचा उपयोग होण्याकरिता पपई मोठ्या प्रमाणावर दीर्घकाळ खावी लागते. पपई उष्ण आहे का नाही हा वादग्रस्त विषय आहे. पण पपई पौष्टिक व पाचक अशा दोन्ही गुणांची आहे. पपईमधील चीक किंवा पेप्सीन काढून घेतल्यास पपई पाचक ठरू शकते.
पेरू
हे पौष्टिक फळ आहेच, याला बहुबीज असेही नाव आहे. पेरूच्या पानांचा काढा स्त्री-पुरुषांचे अंग बाहेर येणे, योनी किंवा गुदभ्रंश या विकारात फार उपयुक्त आहे. याच्या पानांच्या काढ्याची पट्टी किंवा या काढ्यात शिजवून सिद्ध केलेल्या तेलाची पट्टी योनी किंवा शौचाच्या जागेवर ठेवली तर बाहेर येणारी इंद्रिये आक्रसतात आणि शस्त्रकर्म टळते.
गरिबांकरिता टॉनिक
पेरू हे गरिबाकरिता टॉनिक आहे. कमी बियांचा व आत लाल रंग असलेला चवदार पेरू केव्हाही चांगला. पेरूमुळे खोकला बळावतो. अलाहाबाद, कानपूर, लखनौ इकडे कितीही पेरू- अमरूद खाल्ले तरी खोकला कफ होत नाही. हा तेथील हवेचा परिणाम आहे.
फणस
‘आम्ही खातो गरे तुम्ही खा आठोळ्या’ पण आठोळ्यांची उपवासाची रस भाजी भन्नाट होते. हे किती लोकांना माहिती आहे? मग फणसाच्या आठोळ्यांचे पीठ शारीरिक श्रम करणाऱ्यांकरिता मोठे टॉनिक आहे. कोकणासारख्या प्रदेशात पूरक अन्न म्हणून प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांकरिता आठोळ्यांचे पीठ व फणसपोळीचा वापर जरूर करावा. कापा फणस कडक व कमी गोड; बरका फणस गोड पण पातळ गरे असणारा. फणसाच्या गऱ्याचा सुधारसासारखा उत्तम पाक होतो. मधुमेहींनी फणस टाळावा.