Gurmeet Choudhary Follow Boiled Food Diet : टीव्ही, सीरियल, मालिकांमध्ये काम करणे वाटते तितके सोपे नसते. एखाद्या भूमिकेसाठी कधी वजन कमी तर कधी वजन वाढवावेही लागते. यादरम्यान व्यायाम करणे, डाएट करणे, खाण्या-पिण्याच्या अनेक गोष्टींबाबत सावध राहावे लागते. तर ‘रामायण’ मालिकेतून लोकप्रियता मिळवून ‘खामोशियां’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता गुरमित चौधरी (Gurmeet Choudhary) देखील केवळ त्याच्या तंदुरुस्तीबद्दलच नाही तर त्याच्या आहाराबद्दलदेखील कठोर आहे.

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्याशी त्यांच्या यूट्यूब चॅनेल ‘भारती टीव्ही’च्या संभाषणात अभिनेत्याने सांगितले की (Gurmeet Choudhary), फूडी असल्यामुळे कठोर आहाराचे पालन करणे कठीण जायचे. ‘मी एक फूडी आहे आणि मला अन्नाचे सेवन करणे सोडावे लागले. जवळजवळ साखर, चपाती, भात, भाकरी खाऊन दीड वर्ष झाले आणि हे अन्न सोडणे अजिबात सोपे नाही. पण, तुम्ही साकारत असलेल्या प्रत्येक भूमिकेसाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयार व्हावे लागते’ असे तो म्हणाला.

अभिनेता गुरमित चौधरीने (Gurmeet Choudhary) सांगितल्याप्रमाणे तो ‘साखर, चपाती, भात, भाकरी’चे सेवन गेले दीड वर्ष अजिबात करत नव्हता. मग त्याऐवजी तो नक्की काय खायचा याबद्दल सांगताना तो म्हणाला की, “मी दीड वर्ष फक्त एकाच प्रकारच्या आहाराचे सेवन केले, ते म्हणजे फक्त उकडलेले पदार्थ आणि या अन्नाला अजिबात चव नव्हती. पण, नंतर-नंतर हे पदार्थ मला चवदार वाटू लागले. आता माझी भूक एवढी वाढली आहे की, जर मी काही अयोग्य खाल्ले तर ते मला अजिबात शोभणार नाही; असे तो भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना म्हणाला.

वर्षभर फक्त उकडलेले अन्न खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने बंगळुरूच्या एस्टर व्हाईटफील्ड हॉस्पिटलच्या मुख्य क्लिनिकल डायटीशियन वीणा व्ही यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्या म्हणाल्या की, आहारातील विविधता आणि समतोल यावर अवलंबून वर्षभर फक्त उकडलेले अन्न खाल्ल्याने शरीरावर विविध परिणाम होऊ शकतात.

पण, याची सकारात्मक बाजू पाहिलीत तर यामुळे चरबीचे सेवन कमी होते, पचनास मदत करते आणि शरीरातले अतिरिक्त तेल काढून वजन व्यवस्थापनास मदत होते. तसे बघायला गेल्यास उकडलेले अन्न सहज पचते, पण दुसरीकडे फक्त उकडलेले अन्न खाल्ल्याने एखाद्या व्यक्तीला पोषक तत्वांची कमतरता जाणवू शकते. विशेषतः बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सारखी जीवनसत्त्वे जी पाण्यात विरघळणारी असतात, जोपर्यंत उकळलेले पाणी सूप म्हणून घेतले जात नाही तोपर्यंत असे त्यांनी स्पष्ट केले. तर निरोगी चरबीच्या कमतरतेमुळे चरबी-विरघळणारे जीवनसत्त्वे ‘ए, डी, ई आणि के’चे शोषण कमी होऊ शकते, त्यामुळे योग्य नियोजन आणि विविध प्रकारच्या उकडलेल्या भाज्या, प्रथिने, संपूर्ण धान्य आणि निरोगी चरबीच्या पर्यायांचा समावेश करणे दीर्घकालीन आरोग्य समस्या टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.

वर्षभर उकडलेले अन्न खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

चरबीचे सेवन कमी : उकडलेल्या अन्नामध्ये कोणतेही तेल किंवा फॅट्स जोडण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे कॅलरींचा वापर कमी होतो आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारते.

पचन सुधारते : उकडलेले अन्न मऊ असते, त्यामुळे ते पचायला खूप सोपे असते. उकडलेले अन्न सेन्सेटीव्ह किंवा कमकुवत पचनसंस्था असलेल्या लोकांसाठी योग्य आहे.

आजाराचा धोका कमी होतो : अन्न उकडल्यामुळे अन्नातील हानिकारक जीवाणू, परजीवी आणि इतर विषारी द्रव्ये नष्ट होतात, त्यामुळे अन्नजन्य आजाराचा धोका कमी होतो.

वजन व्यवस्थापन होते : उकडलेले अन्न, विशेषत: भाज्या आणि लिन प्रोटिन्स (lean proteins), नैसर्गिकरित्या कॅलरीजमध्ये कमी असतात, वजन कमी करण्यास किंवा व्यवस्थापनास समर्थन देतात.

मात्र, दि किमशेल्थ त्रिवेंद्रमच्या क्लिनिकल न्यूट्रिशनच्या ग्रुप कोऑर्डिनेटर जयश्री एन एस यांनी सांगितले की, कच्च्या भाज्यांचे सेवन करणे अधिक फायदेशीर आहे. कारण उकडलेल्या अन्नामुळे काहीवेळा सूक्ष्म पोषक घटकांचे नुकसान होऊ शकते आणि विशेषतः जास्त अन्न उकडल्याने जीवनसत्त्वे कमी होऊ शकतात. हे टाळण्यासाठी कच्च्या सॅलेड्सचे सेवन करण्याचे त्यांनी सुचवले आहे. कारण कच्चे सॅलेड्स सर्व मायक्रोन्युट्रिएंट्स आणि फायबर अन्नात टिकवून ठेवतात, जे उकडल्यामुळे निघून जाऊ शकतात.

Story img Loader